Angrezi Medium Review : पटकथेत फसलेले ‘मीडिअम’ मनोरंजन

महेश बर्दापूरकर
Friday, 13 March 2020

हिंदी मीडियम’ या पहिल्या भागाच्या तुलनेत अत्यंत कमजोर पटकथा, ताणलेले कथानक, पात्रांची गर्दी आणि अगदीच तकलादू शेवट यांमुळं निराशा करतो.

वडील आणि मुलीतील नात्याचा हळवा आलेख असलेला होमी अदाजानिया दिग्दर्शित ‘अंग्रेजी मीडिअम’ हा चित्रपट भाषा आणि संस्कृतीवर भाष्य करू पाहतो. इरफान, दीपक दोबरियाल आणि राधिका मदन यांच्या अभिनयामुळं हा प्रयत्न काहीसा यशस्वीही होतो. मात्र, ‘हिंदी मीडियम’ या पहिल्या भागाच्या तुलनेत अत्यंत कमजोर पटकथा, ताणलेले कथानक, पात्रांची गर्दी आणि अगदीच तकलादू शेवट यांमुळं निराशा करतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

चित्रपटाची सुरवात उदयपूर शहरात होते. मिठाईचा व्यवसाय करणारा चंपक बन्सल (इरफान) आपल्या पत्नीच्या निधनानंतर मुलगी तारिकाला (राधिका मदन) अत्यंत प्रेमानं आणि मनापासून सांभाळतो आहे, शिकवतो आहे. तारिकाला परदेशात जाऊन शिकण्याची इच्छा आहे. त्यासाठी तिचा काका गोपी (दीपक दोबरियाल) आपल्यापरीनं प्रयत्न करतो आहे. मोठ्या कष्टानं तारिका ब्रिटन शिकण्यासाठी जाणाऱ्या तीन विद्यार्थ्यांच्या यादीत नाव मिळवते, मात्र चंपकच्या हातून नकळत घडलेल्या एका चुकीमुळं तिची संधी जाण्याची शक्यता निर्माण होते. चंपक तारिकाला ब्रिटनला पाठवण्याचा निर्धार करून प्रयत्न सुरू करतो. गोपीच्या मदतीनं तो योजनाही आखतो, मात्र या प्रवासात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तारिका ब्रिटनमध्ये जाते का, तिला तिथं शिकण्याची संधी मिळते का आणि या प्रयत्नांत वडील आणि मुलीचं नातं कसं आकार घेतो याची गोष्ट चित्रपट सांगतो.

Image result for angrezi medium

वडील आणि मुलीचं नातं आणि परदेशात शिक्षण, तिथली संस्कृती चांगली की वाईट अशा दोन समांतर पातळ्यांवर कथा चालते. पहिला भाग छान जमून आला आहे. चंपक आणि तारिकात फुलत जाणारं नातं छान जमून आलं आहे. त्या तुलनेत तारिकाचं ब्रिटनला जाण्याचा प्रयत्न करणं आणि तिथल्या संस्कृतीचं दर्शन हा भाग खूपच वरवरचा झाला आहे आणि ते दाखवण्यासाठी घुसवलेली पात्रं यांमुळं कथेचा ट्रॅक पूर्णपणे घसरतो. अतिशय मेलोड्रॅमिक शेवट अजिबात पटत नाही.

समांतर वेबसिरीज : एकाचा भूतकाळ; तर दुसऱ्याचं भविष्य!

आजारातून बाहेर पडलेल्या इरफानचं दोन वर्षांनंतरचं दर्शन सुखावह आहे. आपल्या नैसर्गिक अभिनयानं त्यानं चित्रपट काही प्रमाणात सुसह्य केला आहे. त्यानं साकारलेला हळवा, मुलीच्या शिक्षणासाठी झटणारा, त्यासाठी अनेक दिव्यं पार करणारा बाप अगदी परफेक्ट असून, त्याच्या चाहत्यांसाठी ही पर्वणीच आहे. राधिका मदननं भूमिकेचा पकडलेला लो-टोन, बोलण्याची पद्धत जमून आला आहे. वडिलांवर प्रेम करणारी आणि नंतर निर्धारानं स्वयंपूर्ण होऊ पाहणारी मुलगी तिनं उत्तम साकारली आहे. हरहुन्नरी गोपीच्या भूमिकेत दीपक दोबरियालनं धमाल केली आहे. करीना कपूर, डिंपल कापडिया, पंकज त्रिपाठी, रणवीर शौरी अशी कलाकारांनी फौज मात्र दिग्दर्शकानं समांतर कथांच्या गर्दीत वाया घालवली आहे. एकंदरीतच, मोठ्या अपेक्षा असताना अगदीच ‘मीडिअम’ मनोरंजन करणारा हा चित्रपट इरफानसाठी पाहा.

स्टार - ३


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Review of Hindi movie Angrezi Medium