Article 15 : जातीव्यवस्थेवर खरमरीत भाष्य

संतोष भिंगार्डे 
Friday, 28 June 2019

"बधाई हो', "अंदाधुंद' यांसारखे यशस्वी चित्रपट देणारा अभिनेता आयुषमान खुराना. वास्तववादी, आव्हानात्मक आणि नावीन्यपूर्ण भूमिका स्वीकारून त्याने आपले वेगळे स्थान निर्माण केले. एकापाठोपाठ एक यशस्वी चित्रपट त्याने दिल्याने निर्माते व दिग्दर्शक त्याच्यावर कमालीचा विश्‍वास दाखवत आहेत. खास करून नावीन्यपूर्ण भूमिकांसाठी त्याचा विचार केला जात आहे. बॉलीवूडमध्ये तो भक्कमपणे पाय रोवून आता उभा आहे. आता त्याचा "आर्टिकल 15' हा चित्रपट आला आहे. अनुभव सिन्हा यांनी तो दिग्दर्शित केला आहे. 

"बधाई हो', "अंदाधुंद' यांसारखे यशस्वी चित्रपट देणारा अभिनेता आयुषमान खुराना. वास्तववादी, आव्हानात्मक आणि नावीन्यपूर्ण भूमिका स्वीकारून त्याने आपले वेगळे स्थान निर्माण केले. एकापाठोपाठ एक यशस्वी चित्रपट त्याने दिल्याने निर्माते व दिग्दर्शक त्याच्यावर कमालीचा विश्‍वास दाखवत आहेत. खास करून नावीन्यपूर्ण भूमिकांसाठी त्याचा विचार केला जात आहे. बॉलीवूडमध्ये तो भक्कमपणे पाय रोवून आता उभा आहे. आता त्याचा "आर्टिकल 15' हा चित्रपट आला आहे. अनुभव सिन्हा यांनी तो दिग्दर्शित केला आहे. 

आपल्या राज्य घटनेच्या कलम 15 मध्ये सर्वांना समानतेचा अधिकार आहे. कुणालाही जातीभेद करण्याचा अधिकार नाही. हा हरिजन आणि हा बहुजन, हा खालच्या वर्गाचा आणि तो वरच्या वर्गाचा, हा मागासवर्गीय आणि तो उच्च वर्गीय... असा भेदभाव करता येणार नाही. या चित्रपटात हेच कलमाची आठवण करून देण्याचा प्रयत्न दिग्दर्शकांनी केला आहे. कारण आज आपण कितीही आधुनिक झालो असलो आणि समाजसुधारणेची भाषा करीत असलो तरी काही ठिकाणी आजही जातीभेद केला जातो. खालच्या जातीतील लोकांचे शोषण केले जाते. त्यांना आधुनिक विचारधारेच्या मंडळींकडून चांगली किंवा समानतेची वागणूक दिली जात नाही. अनुभव सिन्हा यांनी या गोष्टींवर परखडपणे आणि खरमरीत भाष्य केले आहे. 

Image result for article 15

गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि जातव्यवस्थेवर हा चित्रपट बोलणारा आहे. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये झगझगीत अंजन घालणारा आहे. ही कथा उत्तर प्रदेशातील लाल गावात घडते. आयपीएस अधिकारी अयान रंजन (आयुष्मान खुराना) हा येथील पोलिस स्टेशनचा चार्ज घेतो. 

या गावात आणि आजूबाजूच्या परिसरात गुन्हेगारी, भ्रष्टाचार बोकाळलेला असतो. याच पोलिस ठाण्यातील काही अधिकारीही यामध्ये गुंतलेले असतात. या गावातील तीन मुली बेपत्ता होतात. तीन रुपये पगार वाढवून मागितल्याने त्यांची हत्या केली जाते. त्याचा तपास अयान करीत असतो. तेव्हा त्याला तेथील समाजव्यवस्था तसेच तेथील जातीय व्यवस्था आदी गोष्टींची माहिती मिळते. ते सगळे ऐकून तोदेखील थक्क होतो. त्यानंतर तो या गुन्ह्याचा तपास कसा करतो... त्याला कोणते अडथळे येतात... दडपण कशाचे येते वगैरे प्रश्‍नांची उत्तरे या चित्रपटात दडलेली आहेत. 

Image result for article 15

दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी चांगल्या विषयाला हात घातला आहे आणि चित्रपट अधिकाधिक रिऍलिस्टिक कसा होईल ते पाहिले आहे. विशेष म्हणजे चित्रपट अतिरंजित होणार नाही याची काळजी घेतली आहे. चित्रपटातील संवाद धारदार आणि खणखणीत आहेत. कलाकारांचा अभिनय लाजबाब. आयुष्मान खुरानाने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका मोठ्या वकुबीने साकारली आहे. त्याची बोलण्याची आणि चालण्याची ढब उत्तम. मनोज पाहवा, कुमुद मिश्रा यांनी शानदार अभिनय केला आहे. 

चित्रपटाचे संगीत आणि सिनेमॅटोग्राफी उत्तम, काही दृश्‍ये सिनेमॅटोग्राफर्सनी छान टिपली आहेत. मात्र तरीही चित्रपटात काही उणिवा जाणवतात. विशेष म्हणजे चित्रपटाच्या पूर्वार्धात काहीच घडामोडी फारशा घडताना दिसत नाहीत. चित्रपट रेंगाळल्यासारखा वाटतो. त्यामुळे काहीशी निराशा पदरी पडते खरी. एकूणच जातीव्यवस्थेवर परखड आणि खरमरीत भाष्य करणारा चित्रपट आहे. विचार करायला लावणारा आहे. 

Image result for article 15


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Review of Hindi Movie Article 15