ShubhMangal Zyada Saavdhan Review : ‘अवघड’ विषयाची धमाल मांडणी!

महेश बर्दापूरकर
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

वाचा कसा आहे शुभमंगल ज्यादा सावधान...

शुभमंगल ज्यादा सावधान

दैनंदिन आयुष्यात भेडसावणाऱ्या ‘अवघड’ जागच्या दुखण्यांना थेट हात घालणारे विषय आणि त्यांची विनोदी आणि त्याचबरोबर थेट भिडणारी मांडणी असलेले सिनेमे गेल्या काही वर्षांत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत.

शिल्पा शेट्टी दुसऱ्यांदा आई; शेअर केला मुलींचा गोंडस फोटो

आयुष्यमान खुराना प्रमुख भूमिकेत असल्यावर हे विषय प्रेक्षकांना आपलेसे वाटतात, हेही आता अधोरेखित झाले आहे. समलिंगी संबंध असलेले पात्र आणि त्यावर (कडेकडेनं) होणारे विनोद आजपर्यंत हिंदी सिनेमांत मोठ्या प्रमाणात दिसले, मात्र गे जोडप्यामुळं त्यांच्या कुटुंबाला सामोरे जाव्या लागणाऱ्या समस्यांवर थेट, खुसखुशीत आणि त्याच वेळी काळाच्या पुढं जाणारं भाष्य करणारा हितेश कैवल्य लिखित व दिग्दर्शित ‘शुभमंगल ज्यादा सावधान’ हा चित्रपट खूप वेगळा ठरतो. आयुष्यमान खुराना, जितेंद्र कुमार, नीना गुप्ता व गजराज राव या कलाकारांचा अभिनय जमेची बाजू असली, तरी अनेकदा मुख्य ट्रॅक सोडणारी कथा व उपकथनांकाचा भडीमार यामुळं थोडी निराशाही करतो.

Image result for shubh mangal jyada saavdhan

`शुभमंगल ज्यादा सावधान’ची कथा दिल्लीत सुरू होते. कार्तिक (आयुष्यमान खुराना) व अमन (जितेंद्र कुमार) हे एका कंपनीत काम करणारे, एका रुममध्ये राहणारे तरुण एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. अमनच्या चुलत बहिणीच्या लग्नासाठी दोघं अलहाबादमध्ये दाखल होतात आणि धमाला सुरू होते. अमनचे संशोधक वडील शंकर त्रिपाठी (गजराज राव) व आई सुनयना (नीना गुप्ता) त्याचं लग्न ठरवण्याच्या तयारीत असतात. मात्र, शंकर त्रिपाठींना अमनचं सत्य समजतं व कुटुंब हादरून जातं. अमनचे काका, काकू व चुलत भावडं या कुटुंबाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी पुढं सरसावतात.

आकंठ प्रेमात बुडालेला अमन आईला शरीरात तयार होणारं डापामाईल, ऑक्सिटोसिन या रसायनांच्या मदतीनं आपलं प्रेम समजावून सांगू पाहतो, मात्र त्याच्या वडिलांना हे मान्य नसतं. कथेतील गुंता वाढत जातो आणि सर्वोच्च न्यायालयाच्या कलम ३७७ वरील निर्णयाच्या दिवसापर्यंत येईल थांबतो...
चित्रपटाचं कथनाक वेगळं आणि खूप बोल्ड आहे. त्यात केवळ देहबोली आणि संवादांतून अनेक विनोद घडतात. शंकर त्रिपाठींचं किड न पडणाऱ्या काळ्या फ्लॉवरवरील संशोधन आणि समलिंगी संबंधांचा जोडला गेलेला संबंध सुरवातीला विनोद व नंतर खूप मोठं भाष्य करतो. (अगदी ‘शुभमंगल सावधान’मधील बिस्किटापेक्षाही मोठं!) न्यायालयाच्या ३७७ कलमावरील निकलानंतर देशभरात समलिंगी जोडप्यांनी जल्लोष केला होता, त्यांच्या या मानसिकतेत डोकावण्याचा प्रामाणिक प्रयत्न चित्रपट करतो.

'थप्पड'नंतर तापसीचा थ्रिलर कॉमेडी 'लूट लपेटा'

Image result for shubh mangal jyada saavdhan

प्रेमामध्ये लिंग या गोष्टीला फारसं महत्त्व नसल्याचं मुख्य पात्रांच्या संवादांतून पटवून देण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, हे करताना अमनच्या आई-वडिलांच्या विवाह संबंधांतील फोलपणा, त्याच्या काक-काकूंच्या नात्यातील तणाव, त्याचाच चुलत बहिणीची समांतर कथा किंवा अमनला सांगून आलेला मुलीचा लग्नाचा व्यवहार म्हणून केला जाणारा उपयोग आदी उपकथानकं कार्तिक आणि अमनच्या एकत्र राहण्याचं समर्थन करण्यासाठी वापरली गेली आहेत. ती लांबल्यानं मूळ कथा मागं पडते. मात्र, शेवट सर्व कसर भरून काढतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आयुष्यमान खुरानाच्या वाट्याला पुन्हा एकदा तुफान भाव खाणारी भूमिका आली आहे. त्याच्या तोंडचे संवादही मजा आणतात. इथंही पहिल्या फ्रेमपासून पात्र्याच्या अंतरंगात शिरण्याची कला तो साधतो आणि कोणतेही अंगविक्षेप न करता समलिंगी पात्र जबरदस्त साकारतो. जितेंद्र कुमार या अभिनेत्याला तुम्ही ‘कोटा फॅक्टरी’सारख्या वेबसिरिजमध्ये पाहिलं असेल. तोही अत्यंत संयतपणे अमन साकारतो व आयुष्यमानला चांगली साथ देतो. नीना गुप्ता साकारलेली आई लाजवाब. त्यांची प्रत्येक संवादफेक तुफान हसे वसूल करते. गजराज राव यांनी साकारलेला बाप चपखल. इतर सर्वच कलाकारांनी (पाहुण्या भूमिकेत भूमी पेडणेकरसह) त्यांना छान साथ दिली आहे.

स्टार - 3.5 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Review of Hindi movie Shubh Mangal Zyada Saavdhan