Super 30 : आकांक्षांचा भाबडा प्रवास!

मंदार कुलकर्णी
Saturday, 13 July 2019

हृतिक रोशनचा बहुचर्चित 'सुपर 30' कसा आहे? नक्की वाचा... 

आयआयटीमध्ये ज्यांच्या ट्युशनमधली तीसच्या तीस गरीब मुलं निवडली जातात; त्या बिहारमधल्या आनंदकुमार यांची कहाणी मुळातच प्रेरक असल्यामुळं त्यावरचा चित्रपटही अर्थातच प्रेरणादायी आहे. हा चित्रपट म्हणजे आकांक्षांचा प्रवास आहे. मात्र, दिग्दर्शक विकास बहल यानं हा प्रवास भलताच भाबडा करून टाकला आहे, हेही खरं. नेहमीचे चित्रपटीय तर्क, "अमीर-गरीब'च्या ठोकळेबाज कल्पना, व्हाइट दाखवण्यासाठी एखाद्याला खूप ब्लॅक दाखवण्याची क्‍लृप्ती, या गोष्टी टाळूनही विकासला हा चित्रपट करता आला असता.

Image result for super 30 poster

विशेषतः "लगान'पासून प्रेरणा घेऊन एका ट्युशनमधल्या विद्यार्थ्यांबरोबर स्पर्धा घेण्याचा प्रसंग आणि "थ्री इडियट्‌स'मधल्या क्‍लायमॅक्‍सच्या प्रसंगासारखा बराचसा अतार्किक क्‍लायमॅक्‍स याही दोन्ही गोष्टींमुळं आकांक्षांचा हा प्रवास भरकटतो. खरं तर विकासनं मध्यंतरापर्यंत अतिशय जबरदस्त रचलेला पाया नंतर अशा काही अवास्तव प्रसंगांमुळं ढासळतो. अर्थात, काही प्रसंगांचा विचार सोडून दिला, तर तुकड्यातुकड्यांमध्ये हा प्रवास खूप वेधक झाला आहे हेही खरं. एक लक्षात घ्या, की हा आकांक्षांचा प्रवास आहे. हा प्रवास करायला प्रत्येकाला आवडतो. त्यामुळं तिथं मात्र "सुपर-30' यशस्वी होतो. हृतिक रोशनचा अतिशय सुंदर अभिनय, इतर कलाकारांची त्याला दिलेली साथ, छान संवाद, काही विलक्षण प्रसंग यांमुळं या प्रवासात आपण गुंतून जातो हेही खोटं नाही. अनेक प्रसंगांत डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहत नाही. मात्र, तीन-चार प्रसंग टाळले असते, तर "लगान'सारखा चित्रपट तयार होण्याची संधी मात्र विकास बहलनं दवडली हेही जाणवतं. 

बिहारमधल्या खेड्यातला आनंदकुमार (हृतिक रोशन) गरिबीवर मात करत शिकतो आहे. गणितात गोल्ड मेडल मिळवणाऱ्या आनंदकुमारला केंब्रिजमध्ये शिकण्याची संधी मिळते. वडील (वीरेंद्र सक्‍सेना), भाऊ (नंदिश संधू) मदत करत असतात. मात्र, गरिबीमुळं शक्‍य होत नाही. पुढं परिस्थितीमुळं आनंदवर पापड विकण्याची वेळ येते. लल्लनजी (आदित्य श्रीवास्तव) त्याला स्वतःच्या ट्युशनमध्ये संधी देतात. एका प्रसंगामुळं आनंदकुमार गरिबांना आयआयटीमध्ये पाठवण्याचं स्वप्न बघायला लागतो आणि त्याचं पुढं काय होतं हे हा चित्रपट सांगतो. 

Image result for super 30 poster

विकास बहल हा उत्तम स्टोरीटेलर आहे यात शंकाच नाही. अनेक ठिकाणी तो बारकाव्यांमधून, आजूबाजूची परिस्थिती तयार करून, मार्मिक संवादातून गोष्ट सांगत जातो. आनंदकुमारचं केंब्रिजला पत्र पाठवणं, त्याच्या वडिलांना हार्ट ऍटॅक आल्यानंतरचा प्रसंग, आनंदकुमारला गरिबांना शिकवण्याचं महत्त्व कळण्याचा क्षण, वेगवेगळी मुलं त्याच्याकडं येणं, नंतर पुढं मुलांना शिकवत असताना त्यांना प्रेरणा देण्याचे प्रसंग हे सगळे खूप छान जमून आले आहेत. आनंदकुमार यांच्या वडिलांच्या निधनाच्या वेळचा पावसाचा वापर, मध्यंतरापूर्वीचा वाऱ्याचा वापर, काही ठिकाणी वापरलेलं ग्राफिक्‍स हेही छान आहे. आनंदकुमारनं मुलांना अचानक दुसऱ्या ट्युशनपुढं पथनाट्य करायला लावण्याचा प्रसंग खूपच "फिल्मी' झाला आहे आणि क्‍लायमॅक्‍सचा प्रसंग अगदीच अतार्किक. शिवाय अनेक ठिकाणी दिलेली उदाहरणं ही आयआयटी प्रवेश परीक्षेच्या वेळची न वाटता शिष्यवृत्तीच्या लेव्हलची वाटतात हेही थोडं नमूद करायला हवं. अर्थात प्रेक्षकांचा "लसावि' लक्षात घेतला असेल हेही मान्यच. 

हृतिक रोशननं स्वतःच्या वजनापासून टोनपर्यंत प्रत्येक गोष्टीत मेहनत घेतली आहे हे जाणवतं. त्याच्या कारकिर्दीतल्या उत्तम भूमिकांपैकी ही एक नक्कीच आहे. वीरेंद्र सक्‍सेना, नंदिश संधू यांची कामं परफेक्‍ट, मृणाल ठाकूर, पंकज त्रिपाठी कमी फुटेजमध्ये चमक दाखवून देतात. चित्रपटातली गाणी आणि पार्श्‍वसंगीत उत्तम आहे. छायाचित्रणही उच्च आहे. एकूणच, स्वतःच्या प्रेरणांना पंख देण्यासाठी हा वेगळा प्रयत्न नक्कीच बघायला हरकत नाही. काही प्रसंग चित्रपटाला हास्यास्पद आहेत हे खोटं नसलं, तरी काही तुकड्यांमध्ये तो हलवून टाकतो हेही खरं! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Review of Hritik Roshan starer hindi movie Super 30