जिव्हाळ्याची 'सायकल' 

संतोष भिंगार्डे 
शनिवार, 5 मे 2018

एक सायकल आणि तिच्याभोवती फिरणारे कथानक घेऊन दोन तासांचा चित्रपट बनविणे खरे तर कठीण बाब. परंतु दिग्दर्शक प्रकाश कुंटेने हे आव्हान स्वीकारले आणि संपूर्ण कथानक सायकलभोवती गुंफले.

चित्रपटाचे नाव "सायकल' असल्यामुळे या चित्रपटाची कथा काय असेल याची कल्पना सगळ्यांना आली असेलच. एक सायकल आणि तिच्याभोवती फिरणारे कथानक घेऊन दोन तासांचा चित्रपट बनविणे खरे तर कठीण बाब. परंतु दिग्दर्शक प्रकाश कुंटेने हे आव्हान स्वीकारले आणि संपूर्ण कथानक सायकलभोवती गुंफले. मुळात असे असले तरी माणसांचे विविध स्वभाव... त्यांच्या भावभावना... त्यांच्या नात्यातील गोडवा आणि हेवेदावे तसेच एखाद्या व्यक्तीवर किंवा वस्तूवर असलेले निस्सीम प्रेम दाखवण्यास तो विसरलेला नाही. कथानक अगदी सरळ आणि साधे आहे. केशव (ऋषिकेश जोशी) हा सरळ आणि साध्या स्वभावाचा माणूस. केशवच्या आजोबांना एका इंग्रज अधिकाऱ्याने सुंदर अशी सायकल भेट म्हणून दिलेली असते. त्याचे आजोबा ती सायकल आपल्या मुलाला न देता नातवाला अर्थात केशवला भेट देतात. केशव या सायकलवरून गावची रपेट करीत असतो. त्याचे या सायकलवर खूप प्रेम जडलेले असते. अगदी जीवाच्या पलीकडे जाऊन तो सायकलला जपत असतो. 

 cycle marathi movie

एके दिवशी गावात "संगीत सौभद्र' नाटक पाहायला केशव आणि त्याचे कुटुंबीय जाते. त्यावेळी केशव सायकल घराच्या बाहेरच ठेवतो. त्याच वेळी गावात दोन चोर गज्या (प्रियदर्शन जाधव) आणि मंग्या (भाऊ कदम) येतात. एका घरातून सोने चोरून पळत असताना त्यांना केशवची घरासमोर उभी केलेली सायकल दिसते. कुत्रे अंगावर भुंकत असल्यामुळे हे दोन्ही चोर ती सायकल घेऊन पळ काढतात. नाटकावरून परत आल्यानंतर केशवला आपली सायकल चोरीला गेल्याचे समजते. त्यानंतर काय काय घडामोडी घडतात हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

हलक्‍याफुलक्‍या कथानकावर बेतलेला हा चित्रपट आहे. "कॉफी आणि बरंच काही', "ऍण्ड जरा हटके' व "हंपी' या चित्रपटानंतर प्रकाश कुंटेचा हा चौथा चित्रपट आहे आणि त्याने या चित्रपटाला चांगली ट्रिटमेंट देण्याचा प्रयत्न केला आहे. एकोणिसाव्या शतकातील काळ या चित्रपटात अधोरेखित करण्यात आला आहे. त्यावेळचे माणसांचे स्वभाव... त्यांच्यामध्ये असलेली आपुलकी आणि प्रेम या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. ऋषिकेश जोशी, मैथिली पटवर्धन, मनोज कोल्हटकर, भाऊ कदम, प्रियदर्शन जाधव, दीप्ती लेले, विद्याधर जोशी आदी कलाकारांनी छान अभिनय केला आहे. केशवचे सायकलवर असलेले प्रेम, ती चोरीला गेल्यानंतर होणारी त्याची अवस्था... दिग्दर्शकाने या सगळ्या गोष्टी छान टिपल्या आहेत आणि ऋषिकेश जोशीने केशवची भूमिका अगदी संयतपणे साकारली आहे. मात्र चित्रपटात कमाल केली आहे बालकलाकार मैथिली पटवर्धनने. तिच्या सहजसुंदर अभिनयाला दाद द्यावी तेवढी थोडी आहे. 

चित्रपटातील लोकेशन्स त्या काळात नक्कीच घेऊन जातात आणि तो काळ आपल्या कॅमेऱ्यात सिनेमॅटोग्राफर अमलेंदू चौधरी यांनी चांगलाच टिपला आहे. तरीही काही प्रश्‍न मनात नक्कीच निर्माण होतात. चोरी झाल्यानंतर घडणाऱ्या घडामोडींबाबत काही ठोकताळे बांधले की तश्‍शाच घटना पुढे पुढे घडत जातात. त्यामुळे चित्रपट पाहताना उत्सुकता राहात नाही. चित्रपटाचा पूर्वार्ध संथ आहे. मात्र एखाद्या वस्तूवर किती आणि कसे प्रेम असते... ती वस्तूच हरवली की तिच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीची कशी घालमेल वा अवस्था होते हे दाखवताना माणसातील माणुसकी... त्यांच्यामध्ये असलेली आपुलकी आणि प्रेम... एखाद्याबद्दल असलेला जिव्हाळा छान टिपण्यात आला आहे. 

Web Title: review of marathi movie cycle