सत्तेची रस्सीखेच आणि नात्यांचा जिव्हाळा म्हणजेच 'धुरळा'!

महेश बर्दापूरकर 
Saturday, 4 January 2020

वाचा कसा आहे मराठी चित्रपट धुरळा

मराठीत मोठ्या कालावधीनंतर उभा केलेला ग्रामीण राजकारणाचा ठसका, सत्तेच्या रस्सीखेचीत नात्यांचा जिव्हाळा जपू पाहणारी पात्रं, मराठीतील बड्या कलाकारांचा जोरदार अभिनय, समीर विद्वांस यांचं नेटकं दिग्दर्शन, खुसखुशीत संवाद यांच्या जोरावर ‘धुरळा’ प्रेक्षकांना खूश करतो. कथेची मोठी लांबी, मध्यंतरापर्यंत पात्रांच्या ओळख परेडीमुळं बाजूला पडलेलं कथानक या त्रुटीही आहेत. 

कलाकारांची तगडी फौज 'धुरळा' उडवण्यासाठी सज्ज!

Image result for dhurla

‘धुरळा’ची कथा आंबेगाव नावाच्या छोट्या गावात सुरू होते. गावचे वयोवृद्ध सरपंच निवर्तले असून, त्यांचा उभे परिवार निवडणुकीच्या तोंडावर या संकटातून बाहेर कसं पडायचं या विचारात आहे. उभे कुटुंबातील मोठा मुलगा दादा (अंकुश चौधरी) ही जबाबदारी आपल्याच खांद्यावर असल्याचं सांगत सरपंचपदाच्या निवडणुकीच्या तयारीला लागतो. त्याची आई अक्का (अलका कुबल) मात्र आमदाराशी संगनमत करून सरपंचपदासाठी दावा सांगते. घरात उभी फूट पडते. 

हवा कुनाची रं? हवा फक्त आपलीच रं!; टीझरने उडवला 'धुरळा'

घरातलं राजकारण बघून दादा जी भूमिका घेतो त्याने चित्रपट टोकदार भूमिका घेतो. निवडणुकीच्या राजकारणातील सगळे डावपेच आता एकाच घरातून आणि तेही एकमेकांविरोधात फेकले जाऊ लागतात. सिद्धार्थ जाधव या राजकारणाला उबगतो, तर घरातील शेंडेफळ भावज्या (अमेय वाघ) या साठमारीत आपला स्वार्थ शोधत असतो. या रस्सीखेचीमध्ये नात्यांचा पराभव होतो का, तो वाचवण्यात कोण प्रयत्नांची पराकाष्ठा करतं, निकालामुळं हे घर कसं बदलतं, याचा श्‍वास रोखून ठेवायला लावणारा शेवट प्रेक्षकांना विचार करण्यासही भाग पाडतो. 

Image result for dhurala marathi movie

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ग्रामीण राजकारणातील धमाल मांडणारी कथा या चित्रपटाच्या निमित्तानं पुन्हा पडद्यावर अवतरली आहे. मात्र, मधल्या काळात राजकारणाचं बदललेलं स्वरूप, घसरलेली पातळी, आलेली जीवघेणी स्पर्धा, त्याला तंत्रज्ञानाची मिळालेली जोड (व्हिडिओ क्लिपद्वारे बदनामीसारखे प्रकार) यांमुळं हा पट प्रेक्षकांना वेगळा अनुभव देतो. ग्रामीण भागात सरपंचपदही किती महत्त्वाचं असतं आणि त्यात अनेकांचे लागेबांधे कसे जुळलेले असतात याचं लिखाण आणि चित्रण छान उतरलं आहे.

या राजकारणाला एका घरातील सदस्यांमधील संघर्षाचा मुलामा दिल्यानं कथा राजकारणाबरोबरच नात्यांतील चढाओढीची, असूयेची व प्रेमाचीही अनेक रूपं दाखवते. मध्यंतरानंतर कथेनं पकडलेला वेग जबरदस्त आहे आणि त्यात नात्यांमधील चितारलेली गुंफण आणि घुसळण खिळवून ठेवते. तिघं भाऊ घराच्या टेरेसवर एकत्र आल्यानंतरचा प्रसंग किंवा दोन सुना आणि सासूबाईंची निवडणुकीतील लढाई शेवटाकडं आल्यानंतर या तिघींतील स्वयंपाकघरातील संवाद छान जमून आले आहेत. चित्रपटाचा शेवट खूपच अपेक्षितच असला, तरी तो चांगला संदेश देण्यात यशस्वी ठरतो. 
कलाकारांचा अभिनय चित्रपटाची मोठी जमेची बाजू ठरली आहे.

आधी #पुन्हानिवडणूक गाजली; आता 'धुरळा' उडणार!

Image result for dhurla

अंकुश चौधरीनं उभा केलेला उच्चशिक्षित, जंटलमन राजकारणी चांगलाच भाव खाऊन जातो. त्यानं रंगवलेलं पात्र तुलनेनं मवाळ असूनही, त्याच्या अभिनयाचा चांगला ठसा उमटतो. सिद्धार्थ जाधवच्या वाट्याला बायकोच्या ताटाखालचं मांजर असलेल्या नवऱ्याची आलेली विनोदी भूमिका मस्त साकारली आहे. सोनाली कुलकर्णीनं साकारलेली मॉडर्न घरातील, ग्रामीण राजकारणात अडकलेली मुलगी तोऱ्यात उभी केली आहे. प्रसाद ओक खुनशी राजकारण्याच्या भूमिकेत शोधून दिसतो. अलका कुबल नेहमीच्या सफाईनं वावरतात. सई ताम्हणकरच्या वाट्याला आलेली भूमिका सर्वाधिक चांगली लिहिलेली व उतरलेली भूमिका ठरावी. तिनं इच्छा नसताना राजकारणात उतलेली व तिथं आपल्या मनस्वी स्वभावानं जोरदार ठसा उमटवणारी हर्षदा छान उभी केला आहे. इतर कलाकारांनीही छान साथ दिली आहे. 

एकंदरीतच, बऱ्याच कालावधीनंतर आलेल्या व ग्रामीण राजकारणाचा नवा बाज उभा करणाऱ्या या चित्रपटाचं स्वागत करायला हवं. 

स्टार - ३.५ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Review of Marathi movie Dhurla