नवा चित्रपट : कागर 

संतोष भिंगार्डे 
शनिवार, 27 एप्रिल 2019

राजकारणात नव्या दमाचे आणि नव्या विचारांचे नेतृत्व उभे राहतेय ही कल्पना छान आहे. परंतु केवळ कल्पना असून उपयोग नाही तर त्याला चांगल्या अभ्यासाची... संशोधनाची गरज असते. त्यासाठी पटकथेची भक्कम फळी बांधणे आवश्‍यक असते. याबाबतीत दिग्दर्शकाचा काहीसा गोंधळ उडालेला दिसतो. त्यामुळे चित्रपट विस्कळित झालेला दिसतो.

सध्या राजकारणाचे वारे जोरात वाहू लागलेले आहेत. निवडणुकांचा हंगाम आहे आणि प्रचाराच्या फैरी सगळीकडे झडत आहेत. काही ठिकाणी मतदान पार पडले आहे. आता तेथील मंडळी निकालाची वाट पाहत आहेत. खरे तर राजकारण हा बहुतेक मंडळींचा आवडता विषय. नाक्‍या-नाक्‍यावर आणि गल्लोगली त्याच्याच चर्चा झडत असतात. एकूणच निवडणुकीचा काळ... एकमेकांचे डाव आणि प्रतिडाव... रंगलेले कुरघोडीचे राजकारण... "कागर' हा चित्रपट त्याच पठडीत बसणारा आहे.

एक राजकीय पट... राजकीय सूडनाट्य; तसेच प्रेमपट असा सगळा मसाला या चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कारविजेता दिग्दर्शक मकरंद मानेने भरलेला आहे. परंतु त्याचे हे प्रयत्न काहीसे तोकडे पडलेले आहेत. राजकारणात नव्या दमाचे आणि नव्या विचारांचे नेतृत्व उभे राहतेय ही कल्पना छान आहे. परंतु केवळ कल्पना असून उपयोग नाही तर त्याला चांगल्या अभ्यासाची... संशोधनाची गरज असते. त्यासाठी पटकथेची भक्कम फळी बांधणे आवश्‍यक असते. याबाबतीत दिग्दर्शकाचा काहीसा गोंधळ उडालेला दिसतो. त्यामुळे चित्रपट विस्कळित झालेला दिसतो.

kagar

"सैराट' चित्रपटानंतर रिंकू राजगुरूकडून तिच्या चाहत्यांच्या अपेक्षा वाढलेल्या होत्या. "सैराट' पाहिल्यानंतर ती लंबी रेस खेळेल असे वाटलेले होते. परंतु "कागर' पाहिल्यानंतर अपेक्षाभंग होतो. राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी माणूस काय आणि कोणते निर्णय घेतो... कशा प्रकारची व्यूहरचना करतो आणि त्यामध्ये त्याच्या मुलीची आणि तिच्या प्रेमाची आहुती कशी पडते याची ही कथा आहे. ग्रामीण भागातील राजकारण, तेथील राजकीय खेळी आणि त्यातून उभे राहणारे नवे नेतृत्व याभोवती चित्रपटाची कथा फिरते.

प्रभाकर भोसले ऊर्फ गुरुजी (शशांक शेंडे) हे एक मोठे राजकीय प्रस्थ. त्यांच्या आशीर्वादाने आबासाहेब (सुहास पळशीकर) आमदार बनतात. मात्र गुरुजींच्या मनात वेगळीच राजकीय खेळी चाललेली असते. आता येत्या निवडणुकीत नव्या नेतृत्वाला संधी मिळावी यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. त्याकरिता ते राजकीय मोहरा म्हणून युवराजचा (शुभंकर तावडे) वापर करतात. या युवराजला आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घ्यायचा असतो आणि त्याकरिता गुरुजी जे सांगतील ते करण्यासाठी तो तयार असतो. कारण गुरुजींबद्दल त्याच्या मनात आदर असतो आणि गुरुजींचीच मुलगी राणी (रिंकू राजगुरू) हिच्यावर तो प्रेमही करीत असतो. राणीचेही त्याच्यावर कमालीचे प्रेम असते. एके दिवशी दोघे लग्न करण्याचा विचार करतात. त्याच दिवशी गुरुजी एक डाव रचतात. तो डाव युवराजच्या भाबड्या मनाला समजून येत नाही; कारण गुरुजींवर त्याचा विश्‍वास असतो आणि मग युवराज यामध्ये कसा फसतो...त्यातून नवे नेतृत्व कसे उदयाला येते... राणीच्या प्रेमाचे काय होते... यासाठी हा चित्रपट पाहावा लागेल.

शशांक शेंडे, सुहास पळशीकर, शुभंकर तावडे, भारती पाटील, विठ्ठल काळे आदी कलाकारांचा अभिनय उत्तम झाला आहे. रिंकू राजगुरू सुंदर दिसली आहे. मात्र अभिनयाच्या पातळीवर तिची कामगिरी चांगली झाली आहे, असे म्हणता येणार नाही. तिला अजून खूप काही शिकायचे आहे. चित्रपटाचे संगीत जेमतेम आहे. मात्र संजय पवार आणि मकरंद माने यांचे संवाद धारदार आहेत. त्यामुळे त्यांचे कौतुक. राजकारण आणि त्यातील डावपेच... एकमेकांवर करण्यात येणारी कुरघोडी... एकमेकांवर करण्यात येणारे आरोप-प्रत्यारोप असे सगळे रंग अधिक गडदरीत्या मांडण्यात यायला हवे होते. त्याबाबतीत निराशा पदरी पडते. हा निव्वळ वरवरचा राजकीयपट वाटतो. प्रेमकथाही म्हणावी तशी खुललेली दिसत नाही. एकूणच हा चित्रपट वरवरचा निराशादायक मांडलेला पट आहे, असेच म्हणावे लागेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Review of Marathi movie Kagar