माऊली : अॅक्‍शनपॅक्‍ड मसालापट 

संतोष भिंगार्डे 
शनिवार, 15 डिसेंबर 2018

माऊलीच्या टीझर आणि ट्रेलरला प्रेक्षकांची चांगली दाद मिळाली होती. त्यामुळे चित्रपट धमाकेदार आणि पहिल्या चित्रपटापेक्षा लय भारी असेल असे वाटले होते. परंतु म्हणावी तशी भट्टी काही जमली नाही...

"लय भारी' या यशस्वी चित्रपटानंतर रितेश देशमुखचा "माऊली' हा चित्रपट आला आहे. "लय भारी' हा रितेशचा चित्रपट चांगलाच यशस्वी ठरला होता. त्यामधील रितेशचा लाजबाब अभिनय, श्रवणीय संगीत, निशिकांत कामतचे नेटके दिग्दर्शन, दमदार संवाद अशा काही बाबींमुळे हा चित्रपट प्रेक्षकांनी उचलून धरला होता. त्यामुळे "माऊली' या त्याच्या दुसऱ्या चित्रपटाबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली होती.

माऊलीच्या टीझर आणि ट्रेलरला प्रेक्षकांची चांगली दाद मिळाली होती. त्यामुळे चित्रपट धमाकेदार आणि पहिल्या चित्रपटापेक्षा लय भारी असेल असे वाटले होते. परंतु म्हणावी तशी भट्टी काही जमली नाही, असेच म्हणावे लागेल. जबरदस्त ऍक्‍शन, रितेश देशमुख, सयामी खेर आणि जितेंद्र जोशी यांची अफलातून ऍक्‍टिंग, काही दमदार संवाद आणि संगीत याच चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत. रितेशच्या फॅन्ससाठी हा चित्रपट म्हणजे एक चांगला नजराणा आहे.

Mauli

आदित्य सरपोतदारने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. अजय-अतुलचे संगीत आहे. या चित्रपटाची कथा साधी आहे. नाना (जितेंद्र जोशी) हा गावगुंड असतो. गावात त्याची जबरदस्त दहशत असते. त्या गावातील गावकरी नानाला घाबरत असतात. दारूचे गुत्ते चालवणे, बळजबरीने गरिबाची जमीन बळकावणे आदी त्याचे त्या गावात उद्योग सुरू असतात. अशातच एक पोलिस अधिकारी माऊली देशमुख (रितेश देशमुख) त्या गावात येतो. गावात आल्यानंतर तेथील लोकांना त्या पोलिसाकडून आशा असते. तो गावातील नानाची दहशत संपवील असे त्यांना वाटते. त्या गावातीलच एक तरुणी रेणुका (सयामी खेर) त्याच्यावर भाळते आणि अशातच कथानकाला वेगळी कलाटणी मिळते. ती कलाटणी या चित्रपटाचा टर्निंग पॉईंट असतो आणि तोच महत्त्वाचा ठरतो. खरं तर ही कथा फारशी उत्कंठावर्धक वाटत नाही. परंतु सगळ्या कलाकारांनी आपल्या सशक्त अभिनयाच्या जोरावर आणि उत्तम; तसेच ठाशीव संवादावर सगळा भार सांभाळला आहे. रितेश देशमुख, सयामी खेर, सिद्धार्थ जाधव, गिरिजा ओक, श्रीकांत यादव या कलाकारांचा दमदार अभिनय ही चित्रपटाची खासियत आहे. परंतु अधिक कौतुक करावे लागेल ते जितेंद्र जोशीचे. त्याने रंगवलेली नाना ही खलनायक व्यक्तिरेखा पडद्यावर उत्तम जमली आहे. नानाचा राकट आणि रांगडा स्वभाव, त्याची डोळे वटारून बोलण्याची ढब... या सगळ्याच बाबी जितेंद्रने उत्तम केल्या आहेत.

सयामी खेरचा हा पहिलाच मराठी. तिने अस्सल गावरान रेणुका अगदी ठसक्‍यात साकारली आहे. "हद्दीत राहायचं', "जमलंय बघा'... असे काही दमदार संवाद चित्रपटात आहेत. त्यामुळे चित्रपटात काहीशी जान आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला रितेश आणि जेनेलियाचे गाणे खुमासदार झाले आहे. परंतु एक्‌ूणच संगीत ठीकठाक आहे. चित्रपटातील ऍक्‍शन सीन्स जबरदस्त आहेत. त्यामुळे दाक्षिणात्य स्टाईलचा तद्दन मसालापट वाटतो. चित्रपटाचा पूर्वार्ध झपाझप पुढे जात नाही.

उत्तरार्धात मात्र चित्रपट झपाझप पुढे सरकतो. परंतु कथानकाबद्दल फारशी उत्कंठा वाटत नाही. काही हिंदी चित्रपटांची आणि "लय भारी'च्या कथानकाची सरमिसळ करून रचलेली कथा आहे असे वाटते. हा एक ऍक्‍शनपॅक्‍ड तद्दन मसालापट आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Review of Marathi movie Mauli