'ठाकरे' Review : बाळासाहेब ठाकरे परत आलेत...

'ठाकरे' Review : बाळासाहेब ठाकरे परत आलेत...

"जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनी आणि मातांनो' अशा शब्दांत आपल्या भाषणाची सुरुवात करणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाच दशके मराठी माणसांच्या मनात अधिराज्य गाजवलं. बाळासाहेबांच्या भाषणाची सुरुवात होताच लाखोंचा जनसागर ढवळून निघायचा अन्‌ घोषणाबाजी व्हायची. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या "ठाकरे' सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा त्याचाच प्रत्यय येतोय. फक्त सभेची जागा चित्रपटगृहाने घेतलीय. टाळ्यांच्या कडकडाटात सच्चा शिवसैनिक "ठाकरे' सिनेमाचं स्वागत करतोय. अभिनेता नवाजउद्दीन सिद्दिकीच्या रूपाने त्यांचे बाळासाहेब परत आलेत, असंच म्हणावं लागेल...

चित्रपटाची सुरुवात होते कोर्टरूमने. अयोध्येतील बाबरी मशीद आणि राम मंदिर यांच्यात सुरू असलेल्या वादात बाळासाहेब ठाकरेंचं नाव पुढे येतं. त्यांना कोर्टाची पायरी चढावी लागते. तिथून फ्लॅशबॅकने कथा पुढे सरकत जाते अन्‌ आपण 1969 च्या भूतकाळात पोहोचतो. तेव्हा ठाकरे "फ्री प्रेस जर्नल'मध्ये व्यंगचित्रकार असतात. कंपनीच्या धोरणात न बसणारी व्यंगचित्रं काढल्याने त्यांना नाराजी ओढवून घ्यावी लागते अन्‌ तिथेच ते आपल्या नोकरीचा राजीनामा देतात. महाराष्ट्रातच नोकरीच्या ठिकाणी मराठी माणसाची होणारी गळचेपी त्यांना अस्वस्थ करते. त्यातूनच सुरू होतो मराठी अस्मिता जपण्याचा आणि मराठी माणसाला ताठ मानेने जगवण्यासाठीचा त्यांचा लढा.

वडील प्रबोधनकार ठाकरेंची साथ मिळते अन्‌ मराठीतलं पहिलं व्यंगचित्र साप्ताहिक "मार्मिक'चा जन्म होतो. त्यानंतर दक्षिण भारतीयांविरोधातली मोहीम, शिवसेनेची स्थापना, महाराष्ट्र मुक्तीचा लढा, सरकारला दिलेली पहिली धडक, भूमिपुत्रांसाठीचा लढा, मराठी चित्रपटांसाठी जास्त खेळ, मराठी माणसांचा नोकरीत हिस्सा, मराठी तरुणांच्या रोजगाराच्या निमित्ताने वडापावचा जन्म, गरिबांसाठी मोफत रुग्णवाहिका, 20 टक्के राजकारण अन्‌ 80 टक्के समाजकारण, भारतीय कामगार सेनेचा जन्म, "गर्व से कहो हम हिंदू है' मोहिमेचा जन्म, पाकिस्तानबरोबरचं क्रिकेट युद्ध, बाबरी मशीद प्रकरण, 1992 ची दंगल, 1993 चे बॉम्बस्फोट आणि 1995 मध्ये विधानसभेवर फडकलेला भगवा इथपर्यंतचा प्रवास डोळ्यांसमोरून सरकून जातो.

शिवसेनेच्या स्थापनेच्या वेळी प्रबोधनकारांनी आपल्या भाषणात "ठाकरेंचा वाघ महाराष्ट्राच्या रयतेसह अख्ख्या देशाला अर्पण केला' असं व्यक्तव्य केलं होतं. तोच धागा पकडत प्रबोधनकारांचा विचार बाळासाहेबांनी पुढे नेला. दरम्यानच्या काळात त्यासाठी त्यांना काय संघर्ष करावा लागला याचंच चित्रण म्हणजे "ठाकरे' सिनेमा.

सिनेमात फक्त बाळासाहेबच आहेत. अर्थात त्यांचाच जीवनपट म्हटला तर ते ओघाने आलंच; पण तरीही त्यांना कुठेही उगाचच ग्लोरिफाय करण्याचा प्रयत्न ना निर्मात्यांनी केलाय ना दिग्दर्शकाने. बाळासाहेबांनी आपल्या कणखर नेतृत्वाने राज्याच्याच नाही तर देशाच्या राजकारणाचा चेहरामोहरा बदलून टाकला; पण त्यासाठी त्यांना करावा लागलेला संघर्ष अन्‌ त्यांचं कौटुंबिक किंवा सामाजिक द्वंद्व फारसं कोणापर्यंत पोहोचलं नाही. सिनेमाचे निर्माते खासदार संजय राऊत यांनी ते अगदी जवळून पाहिलंय आणि तेच त्यांनी पडद्यावर दाखवलं. बाळासाहेबांची विचारधारा काहींना खटकत होती.

लोकशाहीवरील अविश्‍वास, परप्रांतीयांना विरोध, आणीबाणीचं समर्थन, हिंदुत्ववादी भूमिका आदी त्यांचे काही निर्णयही वादग्रस्त ठरले; पण त्याबाबतची मानसिकता अन्‌ सद्यपरिस्थितीनुसार बदलत गेलेला राजकीय संघर्ष वस्तुस्थितीला धरूनच असल्याचं सांगण्यात चित्रपट यशस्वी ठरतो. शिवसेना वाढत असताना झालेला अंतर्गत विरोध, तुरुंगवास, कुटुंबीयांची ताटातूट, जीवे मारण्याचा प्रयत्न, पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेकडून असलेला धोका, शिवसेनेवरील बंदीचा दिल्लीहून आलेला फतवा... अशी बाळासाहेबांची संघर्षगाथा हाडाच्या शिवसैनिकांना अन्‌ त्यांच्या चाहत्यांना नवीन नाही; पण त्याचं यथार्थ दर्शन सिनेमात दिसतं याचं श्रेय दिग्दर्शक अभिजित पानसे यांना द्यायला हवं.

1960 पासून 1995 पर्यंतचा काळ त्यांनी पडद्यावर जिवंत केलाय. विशेषतः बदलत्या मुंबईचं अन्‌ मुंबईकरांचं चित्रण खिळवून ठेवतं. शिवसैनिकांचं बाळासाहेबांवर असलेलं जीवापाड प्रेम, राजकारणापलीकडे अनेक राजकीय नेत्यांसोबत असलेली त्यांची मैत्री, कुटुंबीयांची विशेषतः पत्नी मीनाताई यांची असलेली काळजी, शिवसैनिकांबद्दल असलेली आस्था आणि इतर धर्मीयांबद्दल असलेला आदर पानसे यांनी अनेक प्रसंगातून जिवंत केलाय. तुरुंगात पत्नीला लिहिलेल्या पत्राची सुरुवात "प्रिय मीनास, जय महाराष्ट्र' अशा मायन्याने करणारे बाळासाहेब किती कुटुंबवत्सल अन्‌ देशप्रेमी होते याची प्रचीती येते. 

बाळासाहेबांना ऐकत राहणं प्रेरणादायी होतं. त्यांचं बोलणं रोखठोक असायचं. त्यांच्या भाषणात जसा करारी बाणा, स्पष्टवक्तेपणा होता तशीच विनोदी शैलीही डोकवायची... असे अनेक संवाद सिनेमात आहेत आणि त्याचं श्रेय जातं संजय राऊत अन्‌ संवादलेखक अरविंद जगताप यांना. "चादर मेरी, बिस्तर मेरा और सपने तेरे,' "ज्या रंगाची गोळी मला चाटून जाईल तो रंग देशात राहणार नाही', "घरात नाही राशन आणि ऐका साहेबाचं भाषण' आदी काही संवाद धारदार झाले आहेत. बाळासाहेबांचे अनेक संवाद चित्रपटात आहेत. जे पुन्हा ऐकताना आजची पिढीही देशप्रेमात हरवून जाते. 

सिनेमात अनेक कलाकार आहेत; पण खऱ्या अर्थाने डरकाळी फोडली आहे ती नवाजउद्दीन सिद्दिकीने. बाळासाहेब त्यांनी अक्षरशः जिवंत केलाय. त्याचं दिसणं, चेहरा अन्‌ डोळ्यांतील हावभाव, शब्दफेक, देहबोली अन्‌ अंगकाठीतून बाळासाहेब प्रत्यक्षात उतरलेत. कुठेही त्यांची मिमिक्री होणार नाही याची काळजी त्याने घेतलीय. भूमिकेसाठीचा त्याचा दांडगा अभ्यास त्यातून जाणवतो. बाळासाहेब साकारण्याचं शिवधनुष्य त्याने लीलया पेललंय. अमृता रावने मीनाताईंची भूमिकाही समजून उमजून केलीय. सिनेमात शंकरराव चव्हाणांपासून राज-उद्धव ठाकरेंची झलक पाहायला मिळते.

साहजिकच अनेक कलाकारांचा ताफा आहे. त्यांनी प्रत्येकाला चांगला न्याय दिलाय. यशवंतराव चव्हाणांपासून वसंतराव नाईक अन्‌ जॉर्ज फर्नांडिस, इंदिरा गांधी आणि शरद पवारांपासून दादा कोंडकेंपर्यंत मंडळी दिसतात; पण त्यांचं अस्तित्व काही मर्यादेपुरतंच सीमित ठेवण्यात आलंय. 

सिनेमाचे खरे हिरो आहेत बाळासाहेब आणि नवाजउद्दीन सिद्दिकी; मात्र सर्वात मोठी कामगिरी बजावली आहे ती आवाजाने. सिनेमाच्या हिंदी भागात नवाजचाच आवाज आहे; पण मराठीत तो डब करण्यात आलेला आहे. बाळासाहेबांच्या आवाजातली जरब अन्‌ करारीपण त्यामुळे अधिकच भिडतो.
देशाच्या राजकारणातील सुपरहिरोचा 1960 ते 90 पर्यंतचा जीवनपट सव्वा दोन तासांत मांडण्याची तारेवरची कसरत संजय राऊत आणि टीमला चांगली जमली आहे.

बाकीचा त्यांचा जीवनप्रवास लवकरच सिक्वेलच्या रूपात आपल्याला पाहता येईल. तोपर्यंत तरी शिवसैनिकांचे लाडके बाळासाहेब परत आलेत, असंच म्हणावं लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com