Batla House Review : चांगल्या कथेचा पटकथेमुळं ‘एन्काउंटर’! 

महेश बर्दापूरकर
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

‘बाटला हाउस’ची कथा देशात झालेले अनेक एनकाउंटर व त्यात इंडियन मुजाहिद्दीन या अतिरेकी संघटनेचा कसा हात आहे, हे सांगते. याच दरम्यान दिल्लीत साखळी बॉंबस्फोट होतात आणि स्पेशल सेलचे पोलिस अतिरेक्यांचा शोध सुरू करतात...

चित्रपट परिक्षण

दिल्लीत बाटला हाउस येथे 2008 मध्ये इंडियन मुजाहिद्दीनच्या अतिरेक्यांच्या एनकाउंटर झाल्याची सत्य घटना, या घटनेविरोधात त्या काळात झालेला गदारोळ, पोलिसांनी निष्पाप विद्यार्थ्यांची हत्या केल्याचे मीडिया व सामाजिक संघटनांचे आरोप, तापलेलं राजकारण आणि या सगळ्यात एनकाउंटर फेक नव्हतं हे सिद्ध करण्यासाठी पोलिसांचे पुढील अनेक वर्षं सुरू असलेले प्रयत्न असं वेगळं व सत्य कथानक असलेला ‘बाटला हाउस’ हा चित्रपट ढिसाळ पटकथेमुळं फसला आहे. अनेक डिस्क्लेमरमध्ये अडकल्यानं आणि काही प्रसंग दाखवताना या घटनेशी ‘आम्ही सहमत अथवा असहमत नाही,’ या आशयाच्या सूचना टाकत राहाव्या लागल्यानं कथा अधिकच पातळ झाली आहे. जॉन अब्राहमचे प्रयत्न एकसुरी झाल्यानं उरलीसुरली अपेक्षाही फोल ठरली आहे. 

batla house review

‘बाटला हाउस’ची कथा देशात झालेले अनेक एनकाउंटर व त्यात इंडियन मुजाहिद्दीन या अतिरेकी संघटनेचा कसा हात आहे, हे सांगते. याच दरम्यान दिल्लीत साखळी बॉंबस्फोट होतात आणि स्पेशल सेलचे पोलिस अतिरेक्यांचा शोध सुरू करतात. डीसीपी संजीव कुमार यादव यांच्या (जॉन अब्राहम) टिमला बाटला हाउसमध्ये काही अतिरेकी लपल्याची माहिती मिळते व हे सर्वजण त्या दिशेने रवाना होतात. संजीवकुमारचा ज्युनिअर केके (रवी किशन) आधीच फ्लॅटचा दरवाजा ठोठावतो आणि पलीकडून गोळीबार सुरू होतो. संजीव कुमार घटनास्थळी पोचेपर्यंत मोठा गोळीबार सुरू होतो. दोन अतिरेकी मारले जातात, दोन पळून जातात व एक जिवंत सापडतो. या एनकाउंटरमध्ये केके हुतात्मा होतो, तर संजीव कुमारसह आणखी एकजणाला गोळी लागते. ही सर्व मुले दिल्लीत शिक्षण घेत होती व बॉंबस्फोटांच्या पार्श्‍वभूमीवर काही कारवाई केल्याचं दाखविण्यासाठी पोलिसांनी हे एनकाउंटर झाल्याची ओरड सुरू होते व संजीव कुमारवर दबाब वाढत जातो. पळालेल्या एका अतिरेक्याला पकडण्यासाठी तो उत्तर प्रदेशात जाऊन कारवाई करतो, मात्र राजकीय दडपणामुळं त्याला परत यावं लागतं. पळालेल्या अतिरेक्याला पकडल्याशिवाय निर्दोषत्व सिद्ध करता येणार नाही, हे समजलेली टीम त्याच्या मागावर लागते व शेवटी कोर्टामध्ये या घटनेचा निकाल लागतो. 

batla house review

ही सत्यघटना व त्याचे संदर्भ देशाला माहिती आहेत. मात्र, त्यामध्ये अनेक प्रश्‍न अनुत्तरित असल्यानं व त्याबद्दल विवाद असल्यानं पटकथा लेखकाचे हात बांधले गेले आहेत. त्यात ही तुलनेची छोटीच कथा खूप ताणली गेली आहे. संजीव कुमारची टीव्ही निवेदक असलेली पत्नी नंदिता (मृणाल ठाकूर) हे पात्र रसभंग करीत राहतं. कथा एखाद्या डिटेक्टीव्ह कथेच्या कोनातून न मांडत पूर्णपणे फ्लिमी केल्यानं काही काळानंतर तिचं गांभीर्य निघून जातं. कथेचा नायक सतत दबावाखाली आणि एनकाउंटरचं सल टोचत असलेला दाखवल्यानं त्याच्या निर्दोष असण्याबद्दल कथालेखकच प्रश्‍न निर्माण करतो. दुसरीकडं, ती मुलं अतिरेकीच असल्याचंही सिद्ध करून टाकलं जातं. (ती मुलं विद्यार्थी होती, तर त्यांच्याकडं पोलिसांवर हल्ला करण्यासाठी शस्त्रास्त्रे कशी आली, हा सोपा प्रश्‍न त्यावेळी माध्यमांनी विचारला होता. तो प्रश्‍नही कथेत विचारात घेतला गेलेला नाही.) कथा व पटकथेतील अनेक त्रुटींमुळं नक्की काय मांडायचं आहे, हा बद्दलचा गोंधळ वाढतच जातो व शेवटच्या कोर्टाच्या कारवाईत गोंधळ अधिकच वाढून रसभंग होतो. 

जॉन अब्राहमनं ही कथा एकहाती पेलण्याचा केलेला प्रयत्नही कमी पडला आहे. ‘रॉ’, ‘परमाणू’ आदी चित्रपटांप्रमाणंच असलेली ही भूमिका तो दिमाखात साकारत असला, तरी लिखाणात तकलादू असलेला पोलिस अधिकारी ठसत नाही. पत्नी, अतिरेकी आणि न्यायालयात बोलतानाचे त्याच्या चेहऱ्यावरचे एकच एक भाव उबग आणतात. मृणाल ठाकूरनं मिळालेली संधी दवडली आहे. इतर कलाकारांना फारशी संधी नाही. संगीत व छायाचित्रणाच्या आघाडीवही चित्रपट निराश करतो. 

 batla house

एकंदरीतच, पुन्हा एकदा सत्यघटना पडद्यावर साकारण्याचा हा प्रयत्न स्तुत्य असला, तरी मांडणीच्या तांत्रिकतेत अडकल्यानं प्रभाव पाडण्यात अयशस्वी ठरला आहे. 

स्टार - 2.5 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: review of new hindi John Abraham starrer movie Batla House