ऋषी कपूर : खुल्लम खुल्ला!

संतोष भिंगार्ड
बुधवार, 26 एप्रिल 2017

पुण्यामध्ये 1 मे रोजी "ऋषी कपूर लाईव्ह' हा शो गणेश कला-क्रीडा मंच येथे होणार आहे. या कार्यक्रमात ऋषी कपूर यांच्या गाजलेल्या गाण्यांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. या शोला स्वतः ऋषी कपूर उपस्थित राहणार आहेत. या शोच्या दरम्यान ते गाण्यांच्या गमतीजमती सांगणार आहेत. त्यानिमित्ताने त्यांची घेतलेली ही मुलाखत...

पुण्यामध्ये 1 मे रोजी "ऋषी कपूर लाईव्ह' हा शो गणेश कला-क्रीडा मंच येथे होणार आहे. या कार्यक्रमात ऋषी कपूर यांच्या गाजलेल्या गाण्यांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. या शोला स्वतः ऋषी कपूर उपस्थित राहणार आहेत. या शोच्या दरम्यान ते गाण्यांच्या गमतीजमती सांगणार आहेत. त्यानिमित्ताने त्यांची घेतलेली ही मुलाखत...

 "ऋषी कपूर लाईव्ह शो' ही कल्पना कशी काय सुचली?
- देवाच्या कृपेने माझ्या चित्रपटांना चांगले संगीत लाभले. माझ्या चित्रपटातील बहुतेक गाणी लोकप्रिय ठरली. किशोर कुमार, मोहंमद रफी... अशा बहुतेक गायकांनी माझ्यासाठी पार्श्‍वगायन केले आणि ती सगळीच गाणी यशस्वी ठरली. एक दिवस असे झाले की, संजय महाले माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की, तुझ्याकडे गाण्यांचा मोठा खजिना आहे. तुझ्या चित्रपटातील गाणी कमालीची लोकप्रिय ठरलेली आहेत. ती गाणी आजच्या तरुण पिढीसमोर येणे आवश्‍यक आहे. याकरिता मला तुझ्यावर एक शो करायचा आहे. मग काय... मी त्यांना होकार दिला आणि पहिला शो माटुंगा येथील षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडला. तेथे मी उपस्थित राहिलो आणि एकूणच प्रतिसाद पाहून थक्क झालो. हा शो हाऊसफुल्ल झाला. त्यानंतर दुसरा शो बेंगळूरुला पार पडला आणि आता तिसरा शो मकरंद पाटणकर यांनी पुण्यात ठेवला आहे. तेथे मी उपस्थित राहणार आहे. गायक मकरंद पाटणकर आणि पुण्याचे सुभाष सणस यांची व माझी एक बैठक झाली आणि त्या बैठकीत कोणती गाणी घ्यायची, हे आम्ही निश्‍चित केले.

या शोचे नेमके वैशिष्ट्य काय आहे?
- खरं तर माझ्या कारकिर्दीतील लोकप्रिय गाणी नेमकी निवडणे कठीण बाब होती. कारण बहुतेक चित्रपटातील गाणी लोकप्रिय ठरलेली आहेत. मी हिरो म्हणून 120 चित्रपट केले आणि प्रत्येक चित्रपटातील सरासरी तीन गाणी तरी लोकप्रिय ठरलेली आहेत. म्हणजे एकूण लोकप्रिय गाणी 360 किंवा त्याहून अधिक. आता या गाण्यांतून 25 किंवा 30 गाणी निवडणे ही प्रक्रिया खूप कठीण होती. मग आम्ही एकत्रित बसून विचार केला आणि एकूणच माझ्या चित्रपट कारकिर्दीतील लोकप्रिय अशी 27 ते 28 गाणी निवडली. त्यामध्ये गझल्स आहेत, काही रोमॅंटिक गाणी आहेत आणि कव्वालीही आहे. विशेष म्हणजे, ही गाणी जेव्हा गायक स्टेजवर गातात, तेव्हा मी स्टेजवर येतो आणि त्या गाण्याच्या वेळी घडलेले काही किस्से किंवा गमतीजमती सांगतो. लोकांना या गाण्यांबरोबरच या गमतीजमती ऐकायला मजा येते.

तुम्हाला स्वतःला संगीताची किती आवड आहे?
- संगीत आणि अभिनय हा आमच्या कपूर कुटुंबीयांच्या रक्तातच आहे. आमच्या चित्रपटांचे संगीत हे प्लस पॉईंट राहिलेले आहे. गाण्यांचा मी प्रचंड शौकीन आहे; पण गाणे कधीही गायलेले नाही; तरीही कधी कधी कुणी फर्माईश केली तर गाणे नक्की गातो. आता पुण्यात होणाऱ्या कार्यक्रमात गाणे गायचे की नाही, हे ठरविलेले नाही. ते तेथील परिस्थितीवर अवलंबून असेल; परंतु जेव्हा गायक मंडळी माझी गाणी गाणार आहेत, तेव्हा मी त्या गाण्यांबद्दलचे काही किस्से प्रेक्षकांना सांगणार आहे.

तुम्हाला कुणाचे संगीत जास्त आवडते?
- सगळ्यांचेच. पंचमदा, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, कल्याणजी-आनंदजी, नदीम श्रवण.... अशा सगळ्याच संगीतकारांचे; तसेच गायक किशोर कुमार, मोहंमद रफी, कुमार सानू, उदित नारायण आदींचे माझ्या करिअरमध्ये खूप मोठे योगदान आहे. या सगळ्या मंडळींचे मी आभार मानतो. कारण संगीतकारांनी चांगले संगीत दिले आणि गायकांनी आपल्या आवाजाने ती गाणी घरोघरी पोहोचविली. माझ्या करिअरमध्ये संगीत महत्त्वपूर्ण आहे. संगीताचे योगदान मोठे आहे.

आजकाल गाण्याची आणि संगीताची आवड बदललेली आहे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटते?
- हो... ही गोष्ट खरी आहे. कारण आमच्या वेळची जी गाणी होती त्याला काही अर्थ होता. गीतकार चांगले चांगले शब्द वापरून गाणी लिहीत होते. आता तसे काही दिसत नाही. हल्ली लोकांची आवड बदललेली आहे आणि त्यानुसार गाणी बनत आहेत. सोशल मीडिया वाढत चाललेला आहे. त्यामुळे लोकांकडे गाणी ऐकायला तसा वेळही उरलेला नाही. आता आम्ही जो शो करीत आहोत तो याचसाठी की आम्ही त्या वेळी काय काय काम केले... कशा प्रकारची गाणी दिली ही तरुण पिढीपर्यंत पोहोचावीत.

तुम्ही विविध प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. आता अशी कोणती भूमिका आहे जी तुम्हाला करायची आहे...
- मी स्वतःला कधीच एका साच्यात बंदिस्त केले नाही. कॉमेडी केली. रोमॅंटिक भूमिका केल्या. खलनायकही रंगविला. सतत काही तरी नवीन करीत राहिलो आणि म्हणूनच या इंडस्ट्रीत टिकून राहिलो. आजही मी काम करत आहे.

तुम्ही वेगवेगळ्या दिग्दर्शकांबरोबर काम केले. त्यातील तुमचे आवडते दिग्दर्शक कोण?
- तसे पाहायला गेले तर सगळेच माझे आवडते दिग्दर्शक आहेत. राज कपूरपासून ते नासीर हुसेन, यश चोप्रा, मनमोहन देसाई अशा कित्येक दिग्दर्शकांबरोबर मी काम केले आहे. मी यश चोप्रा यांच्या बॅनरबरोबर 11 चित्रपट केले. मनमोहन देसाई यांच्याबरोबर पाच-सहा चित्रपट केले. त्यामुळे कुणा एकाचे नाव घेऊ शकत नाही.

सध्या प्रादेशिक चित्रपट चांगले बनत आहेत. राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत ते झेप घेत आहेत. त्याबद्दल...
- ही चांगली गोष्ट आहे. कारण हल्लीची पिढी सुजाण आणि जागरूक आहे. मला यामध्ये एक शिक्षित भारत दिसत आहे. शिवाय प्रादेशिक चित्रपटांचा दर्जा वाढत आहे. तांत्रिकदृष्ट्या चित्रपट सक्षम होत आहेत. चांगले विषय हाताळले जात आहेत. "नटसम्राट'वर मी खूप प्रेम करतो. डॉ. श्रीराम लागूंनी साकारलेले नटसम्राट मला माहीत आहेत. डॉ. लागू यांचा मी आदर करतो. त्यांच्यावर प्रेमही खूप करतो. त्यांच्याबरोबर काम करीत असताना ते असे काही किस्से सांगायचे की काही विचारू नका. आता नाना पाटेकरने केलेले नटसम्राट मला पाहायचे आहे. कधी योग येतो तो पाहूया...

राज कपूरचा मुलगा म्हणून तुम्हाला स्ट्रगल खूप कमी करावा लागला असेल ना...
- अजिबात नाही. उलट माझा स्ट्रगल या इंडस्ट्रीत जेव्हा मी पाय ठेवला तेव्हापासूनच सुरू झाला. तब्बल पंचवीसेक वर्षे मी हिरोचे काम केले आणि तेव्हा स्ट्रगल काय असतो हे मला जाणवत होते. कारण माझ्यासमोर अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा, धर्मेंद्र आणि विनोद खन्ना... ही मंडळी होती. ही मंडळी म्हणजे जणू काही तुफानच होते. त्यांचे ऍक्‍शनपॅक्‍ड चित्रपट भराभरा धावत होते. अशा वेळी माझे रोमॅंटिक-संगीतप्रधान चित्रपट येत होते. आजचे काही नायक रोमॅंटिक चित्रपट करीत आहेत आणि ते यशस्वी ठरत आहेत; परंतु त्यांना आता अमिताभसारख्या तुफानाचा सामना करावा लागला आहे काय? मी संघर्ष केला आणि टिकून राहिलो. कधी कधी काही मंडळी अशी म्हणायची की आता ऋषी कपूर संपला; पण तसे झाले नाही. मी जिद्दीने उभा राहिलो आणि लढलो. राज कपूरचा मुलगा म्हणून सगळ्या गोष्टी काही आयत्या मिळाल्या नाहीत. त्याकरिता मला झगडावे लागले.

आता तुमचे आत्मचरित्र "खुल्लम खुल्ला' आलेले आहे. त्याबद्दल...
- माझ्या आत्मचरित्राच्या 45 हजार कॉपी हातोहात संपल्या आहेत. चौथी आवृत्ती छापाईला गेलेली आहे. लहानपणापासून ते आतापर्यंतचा प्रवास या आत्मचरित्रामध्ये आहे; तसेच माझ्या आयुष्यातील अनेक किस्से जे लोकांना माहीत नाहीत ते मी यामध्ये सांगितले आहेत.

तुमचा नवीन चित्रपट कुठला येतोय?
- "पटेल की पंजाबी शादी' हा चित्रपट येत आहे. परेश रावल आणि मी यामध्ये काम करत आहोत. हा चित्रपट विनोदी आहे.

Web Title: Rishi Kapoor Launches His Autobiography Khullam Khulla