रॉकिंग अर्जुन!

रॉकिंग अर्जुन!

‘दिल है तुम्हारा’, ‘दिल का रिश्‍ता’, ‘रॉय’, ‘रॉक ऑन’, ‘ओम शांती ओम’ अशा चित्रपटांतून आपल्या स्टाईलबाजीने रसिकांना भुरळ घालणारा आणि अभिनयाच्या उंचीची नवी शिखरं गाठणारा स्टाईलिश हिरो अर्जुन रामपाल ‘रॉक ऑन २’मधून पुन्हा एकवार रसिकांसमोर येतोय. आपल्या स्टाईलबाज अभिनयाची झलक दाखवायला सिद्ध झालेला अर्जुन फरहान अख्तरबरोबर खूप वर्षांनी काम करत आहे. ‘रॉक ऑन’ हिट झाल्यानंतर त्याचे चाहते ‘रॉक ऑन’च्या सिक्वेलची वाट बघत होते. तो आता येतोय ११ नोव्हेंबरला. त्याबाबत अर्जुनची रॉकिंग मुलाखत...

तब्बल आठ वर्षांनी ‘रॉक ऑन’चा सिक्वेल येतोय...
फरहान आणि रितेश यांनी ‘रॉक ऑन’चा सिक्वेल बनवण्याचा निर्णय त्याचा पहिला भाग आला तेव्हाच घेतला होता. पण, तो कधी आणि केव्हा बनवणार हे काही ठरलेलं नव्हतं. त्यावर विचार करता करता आठ वर्षे झपाट्याने निघून गेली. मग फरहानला एक भन्नाट कल्पना सुचली. पहिल्या भागात ज्या व्यक्तिरेखा होत्या त्यांच्या आयुष्यात या आठ वर्षांत काय आणि कसा बदल झाला आहे, हे दाखवूया सिक्वेलमध्ये. त्यानंतर सिक्वेल बनविण्याचा निर्णय एकदम पक्का झाला. ‘रॉक ऑन’च्या पहिल्या भागातील कलाकारांची टीम यातही अर्थातच असणार होती. आम्ही पुन्हा एकत्र आलो. अर्थात काही पात्रं यात नवी आली आहेत. ते याचं वेगळेपण आहे आणि ही कथा खूपच इंटरेस्टिंग आहे.

या आठ वर्षांच्या काळात संगीतामध्येही मोठा बदल झाला आहे. तो बदल या चित्रपटात पाहायला मिळेल का?
नक्कीच. केवळ संगीतच नाही तर सादरीकरणही नवं असेल. पहिल्या रॉक ऑनने मला बरंच काही दिलं आहे. माझ्या आयुष्यात काही बदल केले आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात काळानुरुप असे काही परिणामकारक बदल होत असतात आणि आम्ही हेच बदल या चित्रपटात दाखवले आहेत.

या आठ वर्षांच्या कालावधीत तुझ्यामध्ये किती बदल झाला?
खूपच... मी मॉडेलिंगपासून सुरुवात केली आणि आज इथपर्यंत येऊन पोहचलो. सुरुवातीला मी माझ्या करिअरकडे फारसं गांभीर्याने पाहिलं नव्हतं. वेळेचं गणितही कधी पाळलं नव्हतं. शूटिंगला कधी कधी उशिरा पोहचत होतो. पण, आता करिअरच्या दृष्टीने गंभीर झालो आहे. एखाद्याला दिलेली वेळ मी नीट पाळतो. या सर्व गोष्टी अनुभवातून शिकत गेलो. 

खरंच संगीताचं, गाण्यांचं वेड तुला आहे का?
प्रचंड वेड आहे. घरी आणि शूटिंगच्या ठिकाणी जाता-येता मी म्युझिक ऐकत असतो. विविध प्रकारचं संगीत ऐकायला मला आवडते. मला मोहंमद रफी, किशोर कुमार यांची गाणी खूप आवडतात.

‘रॉक ऑन २’मध्ये काम करताना नेमकी काय भावना होती?
मनावर खूप दडपण होतं. कारण पहिला भाग यशस्वी झाल्यामुळे दुसरा भाग कसा काय बनतोय, प्रेक्षकांना तो तितकाच आवडेल का, माझं काम कसं होतंय या गोष्टींचं दडपण होतं. पण, आम्ही याचं म्युझिक ऐकलं आणि छान वातावरण सेटवर तयार झालं. गाण्यांच्या तालावर आपली धून मिसळत शूटिंग करण्यात रंगून गेलो.  

फरहान अख्तरबद्दल काय सांगशील?
तो माझा चांगला मित्र आहे. एकाच वेळी तो खूप काही गोष्टी करीत असतो. लेखन, ॲक्‍टिंग, गाणीही तो लिहितो आणि चित्रपटनिर्मितीही करतो. स्वभावाने तसा तो शांत आहे. परंतु, बोलायला लागला की थांबत नाही. बोलतच राहतो. फरहान आणि मी बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकत्र काम करत आहोत.

‘रॉक ऑन’ला तुझ्या करिअरमध्ये किती महत्त्वाचं स्थान आहे?
मला प्रत्येक फिल्म महत्त्वाची वाटते. कारण, कोणताही चित्रपट मी स्वीकारतो तो मला आवडतो म्हणूनच. त्यामुळे अमुक चित्रपट मला फार आवडला आणि अमुक आवडला नाही, असं मी सांगूच शकत नाही. ‘रॉक ऑन’ ही फिल्मही मला तितकीच महत्त्वाची वाटते. आता या चित्रपटापाठोपाठ माझे ‘कहानी २’ आणि ‘डॅडी’ हे चित्रपटही येत आहेत.

तुझ्याबाबतीत काही बऱ्या-वाईट गोष्टी छापून येतात... काय वाटतं वाचून?
वाईट वाटतं. अशा नकारात्मक गोष्टींमुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. एकमेकांमध्ये गैरसमज निर्माण होतात. कोणत्याही गोष्टींची खातरजमा न करता असं केलं जातं, याचं दुःख वाटतं.

लहानपणी तुझं स्वप्न काय होतं? काय व्हायचं होतं तुला?
माझं बालपण खूप धमाल-मस्तीत गेलं. मी सतत बाहेर फिरत राहायचो. तलावात पोहायचो. फिशिंग करायचो. डोंगर चढायचो. डोंगरांवर चढण्याचा अनुभव काहीसा निराळा होता. चित्रपटही बघायचो. आमची ती पिढी आणि आताची पिढी यामध्ये मोठं अंतर निर्माण झालं आहे. सगळं काही बदललं आहे. तेव्हा काळोख झाला की आम्हाला आई-वडील घरी या, असं सांगायचे. मात्र, आजकालच्या तरुण-तरुणींची ती घराबाहेर पडण्याची वेळ मानली जाते. माझे आजोबा आर्मीमध्ये होते. मलाही तिथेच जायचं होतं. आर्मीचा पोशाख पाहिल्यानंतर मी भारावून जायचो. सुटीमध्ये नॅशनल डिफेन्स अॅकॅडमीमध्ये गेलोही होतो. पण, जेव्हा करिअर निवडीची वेळ आली तेव्हा माझ्या वाटेने अभिनय क्षेत्राचं वळण घेतलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com