कलापूर... गांधी अन्‌ कस्तुरबा!

संभाजी गंडमाळे
गुरुवार, 7 फेब्रुवारी 2019

दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आल्यानंतर गांधीजींची पगडी असो किंवा स्वातंत्र्यपूर्व काळातील गांधी टोपी, अशा प्रत्येक गोष्टीत वेशभूषा करताना कसलीच चूक राहणार नाही, याची खबरदारी भानू अथ्थया यांनी घेतली होती.
- रोहिणी हट्टंगडी.

कोल्हापूर - ‘‘कलापूरशी तसं माझं नातं अगदी जवळचं. चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी कधी आले नाही. पण, नाटकांचे दौरे आणि विविध कार्यक्रमांच्या निमित्तानं अनेक वेळा आले. माझ्या कारकीर्दीला खऱ्या अर्थाने टर्निंग पॉइंट मिळाला, तो रिचर्ड ॲटेनबरो यांच्या ‘गांधी’ या चित्रपटामुळे. माझी ‘कस्तुरबा’ ही भूमिका जगभर गाजली. ती भूमिका हुबेहूब साकारण्यात भानू अथ्थया यांची वेशभूषा मोलाची ठरली. भानू अथ्थया यासुद्धा कोल्हापूरच्याच आणि भारताला पहिला ऑस्कर मिळवून देणाऱ्या वेशभूषाकार... ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी भरभरून बोलत होत्या आणि चाळीस वर्षांपूर्वींच्या स्मृतींना पुन्हा उजाळा मिळत होता. त्यांच्या हस्ते उद्या (ता. ७) कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’ने त्यांच्याशी संवाद साधला.   

रोहिणी हट्टंगडी म्हणाल्या, ‘‘ॲटनबरोंचा ‘गांधी’ प्रदर्शित होण्यापूर्वी किमान दोन वर्षे आधी तयारी सुरू होती. भानू अथ्थया यांनी तर वेशभूषेसाठी प्रचंड मेहनत घेतली होती. कारण ही गोष्ट वाटते तितकी सोपी नव्हती. स्वातंत्र्यपूर्व काळातील अनेक छायाचित्रे मागवून घेऊन त्यांनी प्रत्येकाच्या वेशभूषेचे डिटेलिंग केले होते. एक माणूस म्हणूनही त्या अगदी प्रेमळ स्वभावाच्या होत्या. आजही त्या गोष्टी जशाच्या तशा समोर 
उभ्या राहतात.’’

ज्येष्ठांसाठीचा निधी
‘गांधी’ हा चित्रपट १९८२ मध्ये केवळ चार ठिकाणी प्रदर्शित झाला. त्या वेळी एक लाख ३१ हजार १५३ अमेरिकन डॉलर, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर १९८३ मध्ये चित्रपट झळकला, त्या वेळी सुमारे दोन कोटी सात लाख ४६ हजार ५७१ अमेरिकन डॉलर कमाई या चित्रपटाने केली. 

दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आल्यानंतर गांधीजींची पगडी असो किंवा स्वातंत्र्यपूर्व काळातील गांधी टोपी, अशा प्रत्येक गोष्टीत वेशभूषा करताना कसलीच चूक राहणार नाही, याची खबरदारी भानू अथ्थया यांनी घेतली होती.
- रोहिणी हट्टंगडी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rohini Hatangadi interview special