मालिका विश्‍वातील लखलखतं "रोहिणी' नक्षत्र 

rohini ninave
rohini ninave

दामिनी, अवंतिका, अक्कासाहेब, राधिका असो की राजश्री प्रॉडक्‍शनच्या गाजलेल्या हिंदी मालिका. रोहिणी निनावेंच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली प्रत्येक व्यक्तिरेखा आणि मालिका लोकप्रिय होतेच. मालिकांच्या विश्‍वात आपल्या लेखणीने यशस्वी मालिकांची गुढी उभारणाऱ्या प्रसिद्ध लेखिका रोहिणी निनावे यांच्या मालिका लेखनाला नुकतीच 20 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने त्यांच्याशी साधलेला हा आनंदसंवाद. 

अश्‍शी आहे मी...
मला लेखनाव्यतिरिक्त स्केचेस काढायला आवडतात. मी चांगली खवय्यी आहे. चांगलं-चुंगल खायला, खास करून बटाटावडा आवडतो. गाणं म्हणायला, ऐकायला आणि मस्त गाण्यावर नाचायलाही आवडतं. इतकं, की मला वाटतं की मी लेखिका नसते ना तर नृत्यांगनाच झाले असते! शॉपिंगही खूप आवडतं मला. लिहायला आवडतंच... तेही बेडरूममध्ये बेडवर बसून. सिंगापूर आणि कॅनडा ही माझी फिरण्याची आवडती ठिकाणं. लेखनाचा कंटाळा आला की टीव्हीवर बातम्या बघते. माझा आवडता तकिया कलाम आहे... gosh. 

दामिनी ही माझी पहिली मालिका. मी लिहायला लागले तेव्हा फक्त दूरदर्शन होतं. ती पहिलीच दैनंदिन मालिका होती. त्या वेळी मुक्तपणे लिहीत गेले तशी ती मालिका आकार घेत गेली. फक्त बजेटचा विचार करून तेव्हा लिहीत होते. आता खूप गोष्टींचा विचार करावा लागतो. वाहिन्यांची संख्या वाढलीय. प्रत्येक वाहिनीचा एक वेगळा बाज आहे. प्रत्येक वाहिनीचे प्रेक्षक वेगवेगळ्या मानसिकतेचे असतात. त्यामुळे लिहिताना या सगळ्या गोष्टी डोक्‍यात ठेवाव्या लागतात. 
आता खूप काही बदललंय. पूर्वी कथा लिहून पाठवायचो. आता पटकथा ऐकवावी लागते. तेव्हा पटकथा ही कमी शब्दांत असायची, पण आता अध्यार्हून अधिक संवाद तुम्हाला पटकथेमध्ये लिहून द्यावे लागतात. म्हणजे जवळजवळ त्या दृश्‍याचं पूर्णतः मूव्हमेंटसहित वर्णन करावं लागतं. खूप डिटेलमध्ये लिहावं लागतं. मालिकांच्या भागांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कथा खूप फुलवत न्यावी लागते. थोडक्‍यात आटपू शकत नाही, त्यामुळे सतत नवनवीन विचार करावा लागतो. विविध वाहिन्यांवर एकाच वेळी अनेक मालिका सुरू असल्याने आपल्या मालिकेचा भाग जास्तीत जास्त उत्कंठावर्धक कसा होईल हे बघावं लागतं. आपण जे लिहितोय ते दुसऱ्या कुठल्या मालिकेत तर नाही ना आलंय हे बघावं लागतं. त्यासाठी विविध वाहिन्यांवर सुरू असलेल्या मालिकांवरही लक्ष ठेवावं लागतं. आधी निर्माते जायचे आपापली कथा घेऊन... आताही तसंच आहे, पण हल्ली जास्त प्रमाणात वाहिन्यांकडून निर्मात्यांना संकल्पना दिल्या जातात. मग त्या कथेचा कथाविस्तार करावा लागतो. मालिकेच्या कथेचा कॉपीराईट त्या त्या वाहिनीकडे असतो. ती कथा दुसऱ्या एखाद्या भाषेत प्रसारित झाली तर त्याची रॉयल्टी लेखकाला मिळत नाही. पूर्वी पर्वी ज्या मालिका मी लिहिल्या त्याचं डॉक्‍युमेंटेशन नीटपणे करू शकले नाही, पण जेव्हापासून लॅपटॉपवर काम करून लागले, तेव्हापासूनचा पटकथा आणि कथांचा माझ्याकडे संग्रह आहे. 
अलीकडे वाहिनी आणि निर्मात्यांची टीम मिळूनच कथा ठरवते. हे सांघिक असतं. पहिल्यांदा मी एकटीच कथा लिहायचे. आता वाहिन्यांमध्ये स्पर्धा वाढल्यामुळे वाहिनीचा कथाविस्तार करण्यामध्ये वाहिनीचा सहभाग असतो. सुरुवातीला एक महिन्याची कथा ठरवली जाते. त्यानंतर पटकथा लिहिली जाते. आपणच पटकथा-संवाद लिहिणार असू, तर पटकथेत एखादा दुवा सुटला तर तो संवाद लिहिताना जुळवून घेता येतो आणि तुम्हाला माहितेय की मीच लिहिणारेय तर मला पाहिजे तसे मी संवाद लिहू शकते, पण हेच जर दुसरा संवाद लेखक असेल, तर तुम्ही जो पटकथेत विचार केलाय तो संवादामधून येईलच असं नाही. कधी कधी उलटंही होतं. तुमच्या अपेक्षेहून उत्तम संवाद लिहिले जातात. जसं पुढचं पाऊल मालिकेत मी लिहिलेल्या पटकथेला मिथिला सुभाष यांनी उत्कृष्ट संवाद लिहिले होते. त्यामुळे पटकथा आणि संवाद एकमेकांना कॉम्प्लिमेंट झाले. असं होतं बऱ्याचदा, पण कधी तेवढ्या दर्जाचे संवाद नसतील तर त्रास होतो. 
मालिका लिहिताना डेडलाईन पाळावी लागते. त्यामुळे अक्षरशः घरातील सगळी व्यवधानं सांभाळून तुम्हाला लिहावं लागतं. एकदा तर असं झालं, की मी कॅनडाला सव्वा महिना होते आणि तिथून प्यार का दर्द है मिठा प्यारा प्यारा मालिकेचे एपिसोड पाठवायचे. अगदी सुट्टीनिमित्त सिंगापूर, लंडन, जयपूर, उदयपूर जिथे जिथे मी गेले तिथून संवाद लिहून पाठवलेले आहेत. जिथे जागा मिळेल तिथे बसून मी लेखन केलेलं आहे, पण हा माझाच नाही इतर लेखकांचाही अनुभव आहे. आपण कुठल्याही मनःस्थितीत असलो तरी ते सगळं बाजूला सारून लिहावं लागतं. खासगी आयुष्यात खूप दुःखी असलो तरी तुम्हाला आनंदी सीन लिहावा लागतो. 
सध्या शॉर्ट फिल्म्स, वेबसीरिज अशी नवनवी माध्यमं आली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लेखकांसाठी संधी निर्माण झाल्या आहेत, पण संधी मिळाली तरी माणसामध्ये प्रतिभा हवी. सर्वच नवोदित लेखक या माध्यमांच्या कसोटीवर खरे उतरतील असं होत नाही. लेखन फक्त तंत्र शिकून येत नाही. प्रतिभेचीही जोड लागतेच. वाहिन्यांमधून नव्या लेखकांना संधी दिली जाते, पण सुरुवातीला चांगले लेखन करणारे लेखक नंतर ढेपाळतात. मग वाहिन्या पुन्हा अनुभवी लेखकांकडे वळतात. काही वेळा असंही होतं, की प्रतिभा असूनही संधी मिळत नाही. अनेकदा मुंबई-पुण्याच्या लेखकांना पटकन संधी मिळते. मुंबईपासून दूर राहणाऱ्या लेखकांना संधीच मिळत नाही. त्यांना या क्षेत्रात कसं यायचं हे माहीतच नाही. त्यामुळे असं वाटतं, टॅलेंट हंट लेखकांसाठी आयोजित केले जावेत. कारण चांगल्या लेखकांची कमतरताच आहे आपल्याकडे. लेखन असं डिग्लॅमराईज्ड प्रोफेशन आहे, की त्यावर कुठलाही रिऍलिटी शो बनत नाही. लेखकाला कधी पुरस्कार द्यायला बोलावलं जात नाही. ज्या लेखकाच्या कथेवर आधारित संपूर्ण मालिका गाजते, त्या लेखकाला मात्र आपल्याकडे योग्य मान मिळत नाही. लेखनासाठी नवी माध्यमं आली असली, तरी त्या मालिकांच्या तुलनेत प्रेक्षकांपर्यंत अजून पोहोचलेल्या नाहीत. मराठी प्रेक्षक खूप कमी वेबसीरिज बघतात. त्यातही तरुण पिढीच वेब सीरिज बघते. 
मला वेबसीरिज लिहायची संधी मिळाली तर मी नक्की लिहीन. सध्या मालिकालेखनात बिझी असल्यामुळे इतर माध्यमांसाठी लिहिणं थोडं बाजूला राहिलंय, पण नव्या पिढीने ही माध्यमं हाताळली पाहिजेत. 
अवंतिका ही मालिका लिहिताना मी पूर्णपणे ती मालिका जगले. सगळ्या व्यक्तिरेखा खूप मन लावून घडवल्या होत्या. लिहिताना कसलाच अंकुश नव्हता. मालिकेतील सगळी पात्रं माझ्या खूप जवळची होती. मी, स्मिता तळवलकर, संजय सूरकर आमचं इतकं छान ट्युनिंग जमलं होतं. ते दोघे जण काही सूचना करायचे, पण हे करू नकोस, कधी वाद, भांडणं नाही झाली. इतकी प्रेमाने ती मालिका बनवली गेली होती. त्या मालिकेच्या शेवटच्या भागाचं पार्लेकरांसाठी खास स्क्रिनिंग ठेवलं होतं. तो शेवटचा भाग संपला तेव्हा आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं, की आता हे सगळं संपणार. 
लेखकाला सकाळी उठून पहिला विचार हाच येतो, की आता आपल्या मालिकेत काय होणार? म्हणजे सध्या माझ्या नवऱ्याची बायको मालिका लिहितेय... तर सकाळी उठल्यावर राधिका कशी वागेल? शनायाचं काय करायचं? असे विचार येतात. मराठीच्या तुलनेत हिंदीमध्ये बजेट खूप असतं, पण त्यामुळेच की काय, मराठी मालिकांत आयुष्याच्या खूप जवळ जाणारी खरीखुरी पात्रं वाटावीत अशी रचना असते. हिंदीमध्ये झगमगाटच खूप असतो, पण अपवाद असतातच. पवित्र रिश्‍ता मालिका आयुष्याच्या खूप जवळ जाणारी होती. त्यामुळे ती लोकप्रिय झाली. शेवटी कॅरेक्‍टर्स भिडतात मनाला. झगमगाट नाही. सध्या कितीही मोठा कलाकार घेतलात तरी स्वतःच्या बळावर सिनेमा किंवा मालिका खेचू नाही शकत. प्रेक्षकांना आता कथेत चांगला आशय पाहिजे, विषय पाहिजे. त्यामुळे प्रत्येक माध्यमात लेखनाला जास्त महत्त्व दिलं जातंय. 
मालिका लेखन करताना माझं प्रॉडक्‍शन हाऊसशी छान नातं जुळलं. संजय सूरकर, स्मिता तळवलकरांशी तर घरच्यासारखं नातं होतं. त्या दोघांशी सगळ्या गोष्टी शेअर करायचे. त्या मला अगदी हक्काने सांगायच्या आम्ही सीरियल करतोय आणि तुला लिहायचंय... तर मी लगेच हो म्हणायचे. त्यानंतर हिंदीमध्ये राजश्री प्रॉडक्‍शनबरोबर माझं चांगलं नातं निर्माण झालं. त्यांचे चित्रपट प्रेमळ आणि संस्कारी आहेत. तसेच ते सर्व जण वागतात. मी लिहिलेलं त्यांना आवडलं की रोज सकाळी सूरज बडजात्यांचा मेसेज यायचा की रोहिणीजी आपने बहुत अच्छा लिखा... अशा स्तुतीमुळे लिहायला हुरूप येतो. 
सध्याच्या मालिकेविषयी सांगायचं झालं तर माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेचं मला कथाबीज दिलं गेलं होतं आणि त्याचा कथाविस्तार मी केला. यामध्ये झी मराठीचे नीलेश मयेकर यांची खूप मदत झाली. त्यांचाही यात बऱ्यापैकी सहभाग होता. त्यांना माध्यमाची चांगली समज आहे. हल्ली स्वातंत्र्यापेक्षा मालिका हे चांगलं प्रॉडक्‍ट व्हावं यासाठी प्रयत्न केले जातात. चांगले लेखक, कलाकार, निर्माते आणि वाहिनीची चांगली लोकं एकत्र येतात तेव्हा ती मालिका लोकप्रिय होते, पण कधी वाटतं एखादी मालिका आपलं नशीब घेऊनच येते! 
आतापर्यंत मी लिहिलेल्या पात्रांविषयी सांगायचं झालं, तर अक्कासाहेबांचं पात्र खूप "ट्रीकी' होतं. एक दबदबा असलेली बाई, पण ती निगेटिव्ह नाही. ती सुनेला शिकवते, स्वातंत्र्य देते. चुकीच्या माणसाबरोबर चुकीचं आणि वाईटाशी वाईट वागते. हे पात्र साकारणं खूप कठीण होतं, पण त्या तुलनेत राधिका हे पात्र सोपं. प्रेक्षकांना ग्रे कॅरेक्‍टर नीट समजत नाही. फक्त शनायाचं ग्रे कॅरेक्‍टर चाललं. मला खूप इच्छा आहे, की एका खंबीर स्त्रीचं पात्र रेखाटावं. दामिनी ही व्यक्तिरेखा का आली? तर माझ्या मनामध्ये ती दामिनी होती. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी. शहरातल्या स्त्रिया शिकल्या-सवरलेल्या असल्या तरी घरगुती अत्याचार सहन करतात; तर त्यांनी हे सहन करू नये असंच मला वाटतं. राधिका शिकलेली नाहीय म्हणून सध्या ती तसं वागतेय, पण तिच्या पात्रातूनही आम्ही हेच सांगू इच्छितोय की स्त्रियांनी सहन नाही करायचं. 
मी कधीही मनाविरुद्ध लेखन करत नाही. एखाद्या मालिकेत मनाविरुद्ध लेखन करावं लागलं तर ती मालिका सोडून देते. एकदा तर असं झालं होतं, सतत षड्‌यंत्र करणाऱ्या नकारात्मक व्यक्तिरेखांचं पीक आलं होतं. तशा मालिका लिहिताना असं झालं होतं, की सतत डोक्‍यात कट-कारस्थानं याचेच विचार यायचे. तेव्हाही लिहू नये वाटायचं. 
मालिका लिहिताना प्रेक्षकांचे गमतीशीर अनुभव येतात. अवंतिका लिहीत असताना एक वकील मला फोन करून सांगायचे, की मी सांगतो तसं तुम्ही लिहा. काही प्रेक्षक वेगवेगळा सल्ला देतात. एका पात्राला कथेत मूल होत नव्हतं; तर प्रेक्षकांचे फोन येत की काही तरी चमत्कार करा कथेत आणि मूल होऊ द्या! काही कलाकार तर असे असतात, की ते स्वतःचा ट्रॅकच लिहून आणतात. लेखकाला तसंच कर असं सांगतात. लिखाण सोपं नाही. एका मालिकेचे पहाटे 4 वाजता उठून संवाद लिहायचे, पण नंतर मात्र मानधनासाठी त्या निर्मात्यांना विनवण्या कराव्या लागायच्या. एखादी मालिका सुरू होण्याआधी लेखक सहा-सात महिने त्यावर काम करत असतो. त्याचं मोल त्याला मिळायला पाहिजे... अनुभवी असोत की होतकरू, लेखकाला त्यांचं मानधन वेळेत मिळायलाच हवं, पण लेखकांना त्यांचा योग्य मानही मिळायलाच हवा! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com