कोंडाजीबाबाची भूमिका करणारा 'हा' आहे तरी कोण? सोशल मीडियावर चर्चा

संभाजी गंडमाळे
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

मुळात कोल्हापुरी बोलीभाषेसाठी या मंडळींनी मला पूर्णपणे फ्रीडम दिला आणि म्हणूनच कोंडाजी बाबा प्रत्येकाला भारावून टाकून गेला.

कोल्हापूर : ‘एकच सपान हाय, माझ्या राजाच्या पायावर जंजिरा वाहायचाय’ असे अस्सल कोल्हापुरी बोलीभाषेतील संवाद आणि कोंडाजी बाबा फर्जंद यांची व्यक्तिरेखा गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातच नव्हे, तर जगभरातील मराठी मुलखात गाजत आहे. पण, कोंडाजी बाबा साकारणारा हा रांगडा गडी आहे तरी कोण?

छोट्या पडद्यावर कोंडाजीबाबाला जिवंत करणारा हा गडी आहे कोल्हापूरचा आनंद काळे. कोंडाजीबाबातून बाहेर पडला की नाही, असा प्रश्न विचारताच हा गडी खळखळून हसतो आणि अभिमानानं सांगू लागतो, ‘कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याचा आत्मविश्वास कोल्हापूरच्या मातीनं दिला आणि म्हणूनच आमच्यासारखे तरुण मुंबईसारख्या महानगरीत आजही पाय घट्ट रोवून उभे आहेत'. 

निवांतपणा हे कोल्हापूरचं वैशिष्ट्य असलं तरी, एका विशिष्ट मर्यादेपलीकडे जाऊन ते बदलत्या काळात आमच्या पिढीनं सोडलं आणि म्हणूनच स्पर्धेच्या जगात आम्ही ताठ मानेनं मिरवतो आहे. कोंडाजी बाबा ही भूमिका आजवरच्या कारकिर्दीतली सर्वात महत्त्वाची भूमिका ठरली, असं आनंद सांगतो.

Image may contain: 1 person, smiling, glasses

आनंद म्हणाला, 'तब्बल 56 दिवस कोंडाजीबाबा अक्षरशः जगलो. 16 सप्टेंबरला पहाटे साडेपाचला शेवटचा शॉट संपला आणि कोंडाजी बाबांचं पॅकअप झालं असलं तरी त्या भूमिकेतून बाहेर पडायला आठवडा गेला. अमोल कोल्हे, प्रताप गंगावणे, सचिन गद्रे, समीर कवठेकर, कार्तिक केंढे आणि साऱ्या टीमनं विश्वास टाकला आणि त्यामुळेच ही भूमिका तितक्याच ताकदीनं करू शकलो. मुळात कोल्हापुरी बोलीभाषेसाठी या मंडळींनी मला पूर्णपणे फ्रीडम दिला आणि म्हणूनच कोंडाजी बाबा प्रत्येकाला भारावून टाकून गेला.’

Image may contain: 2 people, people standing and sunglasses

आनंदनं माईसाहेब बावडेकर शाळा, प्रायव्हेट हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कॉमर्स कॉलेजमध्ये त्यानं महाविद्यालयीन शिक्षण घेतलं. अर्थातच कॉलेजच्या मोरपंखी दुनियेत मानानं मिरवताना राज्य नाट्य स्पर्धा, कामगार नाट्य स्पर्धांतून त्याची रंगमंचावर ‘एंट्री’ झाली. अनेक नाटकं रंगमंचावर आली आणि हीच शिदोरी घेऊन या गड्यानं मुंबई गाठली.

‘चार दिवस सासूचे’ या गाजलेल्या दूरचित्रवाणी मालिकेतील अशोक देशमुखांची भूमिका त्यानं तब्बल आठ वर्षे केली. या मालिकेचे तीन हजार 600 भाग प्रसारित झाले. ‘आमच्या हिचं प्रकरण’ या व्यावसायिक नाटकात त्याची मध्यवर्ती भूमिका असून, एका वर्षात या नाटकाचे केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर जगभरात 172 प्रयोग झाले आहेत. आजवर एकूण 36 चित्रपट केले. घे भरारी, आबा जिंदाबाद, माहेरची पाहुणी, कुंदन शहांचा ‘पी से पीएम तक’ आदी चित्रपट गाजले आहे.

Image may contain: 4 people, people standing and text


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Role of Kondajibaba played by Anand Kale in Sambhaji series is being discussed on social media