'राम आणि सीतेचं नाव म्हणूनच मिळालं ऑस्कर!' साध्वींचं अजब वक्तव्य | RRR Oscar 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RRR Oscar 2023 Sadhvi Prachi Comment On Director

RRR Oscar 2023 : 'राम आणि सीतेचं नाव म्हणूनच मिळालं ऑस्कर!' साध्वींचं अजब वक्तव्य

RRR Oscar 2023 Sadhvi Prachi Comment On Director : दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या RRR चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला ऑस्कर मिळाल्यानंतर त्यांच्यावर साऱ्या जगभरातून कौतूकाचा वर्षाव होतो आहे. बॉलीवूड असो वा टॉलीवूड की अगदी हॉलीवूड या साऱ्याच फिल्म क्षेत्रातील सेलिब्रेटींनी राजामौलींनी आणि त्यांच्या टीमचं कौतूक केलं आहे. त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

नाटू नाटूला ऑस्कर मिळाला खरा मात्र त्यानंतर आता त्याला जो वेगवेगळ्या प्रकारचा संदर्भ दिला जात आहे त्यावरुन सोशल मीडियावर पुन्हा वाद रंगताना दिसतो आहे. काल सोशल मीडियावर दिग्दर्शक राजामौली आणि त्या टीमचे सदस्य यांना पुरस्कार सोहळ्याच्या ठिकाणी सगळ्यात शेवटी बसविण्यात आले होते. त्याचे फोटोही व्हायरल झाले होते. त्यावरुन नेटकऱ्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती.

Also Read - हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वायएसआर जगमोहन रेड्डी यांनी राजामौलीना शुभेच्छा देताना तुम्ही तेलुगूचा झेंडा आणखी उंचावला आहे. आपल्या नाटू नाटू डान्सची प्रतिमा तुम्ही जगभरात नेली याबद्दल तुमचे अभिनंदन असे म्हटले होते. मात्र यासगळ्यात प्रसिद्ध गायक अदनान सामीनं रेड्डी यांच्यावर प्रादेशिक वाद निर्माण केल्याचा आरोप केला आहे. तुमची कुपमंडूक वृत्ती संपली कशी नाही अशा शब्दांत त्यानं आपली नाराजी व्यक्त केली होती.

यंदाच्या ऑस्कर सोहळ्यामध्ये भारताच्या वाट्याला दोन ऑस्कर आले आहेत. त्यामध्ये सर्वोत्कृष्ट माहितीपट गटातून द एलिफंट व्हिस्पर्स, आणि सर्वोत्कृष्ट गाण्यासाठी नाटू नाटूला गौरविण्यात आले आहे. यासगळ्यात विश्व हिंदू परिषेदच्या नेत्या साध्वी प्राची यांची प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमधून राजामौलींचे अभिनंदन केले आहे. नाटू नाटूचे कौतूक करताना चित्रपटाविषयी केलेल्या वक्तव्यानं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

साध्वी प्राची यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, जर एखाद्या चित्रपटामध्ये राम आणि सीता यांची नावं आली असतील तर मग त्या चित्रपटाला ऑस्कर मिळणार नाही असे होणार नाही. ऑस्कर मिळाल्याबद्दल देशाला शुभेच्छा, असे ट्विट करताना साध्वी प्राची यांनी भारताच्या तिरंग्याचा इमोजीही शेयर केला आहे.