प्रभासच्या चाहत्यांना करावी लागणार 'साहो'ची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

साहोच्या ट्रेलरला 45 दशलक्ष व्ह्यूज असून यातील 'सायको सैया' ह्या गाण्याला आत्तापर्यंत 42 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत.

आत्तापर्यंतचा भारतातील सगळ्यात मोठा अॅक्शन थ्रिलर चित्रपट ठरणाऱ्या 'साहो' ची प्रदर्शित होण्याची तारीख निर्मात्यांनी पुढे ढकलली असल्याने प्रभासचे चाहते कमालीचे नाराज झाले आहेत. मात्र, दुसरीकडे 'साहो'चेच आणखी एक नवे पोस्टर आज रिलीज करण्यात आल्याने त्यांच्या चेहऱ्यावर किंचित हसू पसरले. या चित्रपटात अभिनेता प्रभाससोबत अभिनेत्री श्रद्धा कपूर हे प्रमूख भूमिकेत आहे.

पुढील महिन्यात स्वातंत्र्यदिनी बॉलिवूडचे अनेक बिगबजेट चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. अक्षयकुमार, विद्या बालन यांची प्रमुख भूमिका असलेला 'मिशन मंगळ', अभिनेता जॉन अब्राहमचा 'बाटला हाऊस' आणि प्रभासचा बहुप्रतिक्षीत 'साहो' हे  तिन्ही चित्रपट 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित होणार होते. मात्र, साहो चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. बाहुबली नंतरचा प्रभासचा हा पहिलाच अॅक्शन थ्रिलर चित्रपट असल्यामुळे 'देसी बॉईज' अक्षयकुमार आणि जॉन अब्राहम यांच्याच चित्रपटात खरी फाईट होणार आहे. भारताच्या पहिल्या मंगळ मोहिमेवर मिशन मंगलची कथा आधारित असून बाटला हाऊस हा चित्रपटही सत्य घटनेवर आधारित आहे.

साहोच्या ट्रेलरला 45 दशलक्ष व्ह्यूज असून यातील 'सायको सैया' ह्या गाण्याला आत्तापर्यंत 42 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. सायको सैया या गाण्याची चर्चा सर्वत्र बघायला मिळत आहे. इतकेच नाही, तर त्याच्या मोशन पोस्टरचे देखील कौतुक होत आहे.

बाहुबली फेम प्रभासचा डॅशिंग लूक आणि श्रद्धा कपूरचा ग्लॅमरस अंदाज प्रेक्षकांना फार आवडला आहे. आता 30 ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होत असल्यामुळे त्याची वाट सगळेच पाहात आहेत, यात शंका नाही.

पोस्टर, ट्रेलर आणि गाणं गाजल्यानंतर चित्रपटाची उत्सुकता पराकोटीला पोहोचल्याची साक्ष ट्विटर आणि यूट्युब ट्रेंड्ज देत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saaho release date shifted to 30th August