सचिन दिसला.. पैसा फिटला!

टीम ई सकाळ
शुक्रवार, 26 मे 2017

यापुढे सचिन मैदानावर खेळताना दिसणार नाही ही कल्पनाच अस्सल क्रिकेटवेड्याना अस्वस्थ करणारी होती. पण सचिनने एक संधी दिली, ती आपल्या सिनेमातून. 'सचिन: अ बिलीयन ड्रीम्स' पाहण्यासाठी रसिकांची झुंबड उडाली ती याच कारणाने. 

मुंबई : अखेर क्रिकेटच्या देवाचा सिनेमा थिएटरवर झळकला. लाखो चाहत्यांच्या स्वप्नांचे आेझे लिलया पेलत सचिनने या सगळ्या स्वप्नांना मैदानावर साकार करुन दाखवले. म्हणूनच तो आपला सचिन झाला. सचिनला क्रिकेट खेळताना पाहाणे म्हणजे भारतीयासाठी पर्वणीच असायची. म्हणूनच त्याच्या निवृत्तीने अनेकांचे डोळे पाणावले. यापुढे सचिन मैदानावर खेळताना दिसणार नाही ही कल्पनाच अस्सल क्रिकेटवेड्याना अस्वस्थ करणारी होती. पण सचिनने एक संधी दिली, ती आपल्या सिनेमातून. 'सचिन: अ बिलीयन ड्रीम्स' पाहण्यासाठी रसिकांची झुंबड उडाली ती याच कारणाने. 

हा चित्रपट रिलीज झाल्यापासून हा सिनेमा पाहण्यासाठी लोकांची झुंबड उडली आहे. मुंबईसर राज्यात सर्वत्र या सिनेमाला तुफान प्रतिसाद मिळतो आहे. म्हणूनच मुंबईत या सिनेमाचा पहिला शो लागला तो सकाळी सात वाजता. या पहिल्या शोला 90 टक्के उपस्थिती होती. जाणकार सिनेरसिक आणि समीक्षकांच्या म्हणण्यानुसार हा चित्रपट 'एम.एस. धोनी'च्या सिनेमाचा विक्रम मोडेल. हा सिनेमा सहज दीडशे कोटींचा टप्पा पार करेल. हा चित्रपट पाहून बाहेर पडलेला स्वप्नील कुलकर्णी म्हणाला, 'मला हा सिनेमा पाहायचा होताच. आणि मी पहिला शो पाहीला. मला सिनेमा फार आवडला. मी धोनीही पाहीला आहे. पण त्यात धोनीचे काम सुशांतसिह रजपूतने केले होते. इथे स्वत: सचिन दिसतो. हे फार भारी आहे त्या मोठ्या पडद्यावर सचिन दिसला आणि माझ्या तिकिटाचा पैसा फिटला.'

समीक्षकांच्या मते, हा चित्रपट नसून हा डाॅक्यू ड्रामा आहे. सचिन स्वत: बोलतो. हे लोकांना आवडते आहे. त्याम़ुळे हा सिनेमा लोक उचलतील असा विश्वास त्यांना वाटतो. 

सर्वाधिक पसंती सचिनलाच..

या शुक्रवारी सचिनसह चार मराठी सिनेमे रिलीज झाले आहेत. यात ताटवा, करार, खोपा, ओली कि सुकी या सिनेमांचा समावेश होतो. या सर्वात बाजीही सचिनच्या सिनेमानेच मारल्याचे चित्र सध्या दिसते आहे. 

 

 

Web Title: Sachin tendulkar Film entertainment eSakal News