#SacredGames राहुल गांधी यांच्या भुमिकेची स्वरा, अनुराग यांच्याकडून प्रशंसा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 जुलै 2018

हा सगळा विरोध होत असताना राहुल गांधी यांनी मात्र फार विचारपुर्वक भुमिका घेत ट्विट केले आहे आणि वादाला शांत करण्याचा प्रयत्न केला आहे.

नेटफ्लिक्सवरील 'सेक्रेड गेम्स' ही वेब सिरिज चर्चेचा विषय ठरली आहे. नेटफ्लिक्सवरील ही पहिली भारतीय ओरिजनल वेब सिरिज आहे. सध्या या वेब सिरिज बद्दल चर्चा होतेय ती म्हणजे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ट्विटमुळे. 

भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न 'सेक्रेड गेम्स'मधून केला गेला आहे, असा आरोप होत आहे. बोफर्स आणि शाह बानो या प्रकरणांचा या वेब सिरिजमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. या प्रकरणांवरुन राजीव गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी निभावत असलेला गणेश गायतोंडे हे पात्र वादग्रस्त विधान करतं. या वेब सिरिज मधून काही दृश्य काढून टाकण्याचीही मागणी होत आहे. 

हा सगळा विरोध होत असताना राहुल गांधी यांनी मात्र फार विचारपुर्वक भुमिका घेत ट्विट केले आहे आणि वादाला शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. आपला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर विश्वास आहे असे म्हणत राहुल यांच्या भुमिकेने सर्वांचेच लक्षं वेधले आहे. 'भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दाबण्यात आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यावर विश्वास आहे. पण हे स्वातंत्र्य म्हणजे मूलभूत लोकशाही अधिकार आहे यावर माझा विश्वास आहे. माझे वडील हे आयुष्यभर भारताच्या सेवेसाठी जगले आणि मरण पत्करलं. त्यामुळे एखाद्या वेब सीरिजमधलं काल्पनिक पात्र आपले विचार व्यक्त करून हा इतिहास बदलू शकत नाही', असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. 
 

राहुल गांधी यांच्या या ट्विटची 'सेक्रेड गेम्स'चे सहदिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी प्रशंसा केली आहे. अनुराग कश्यपने 'दॅट्स अ येय...' अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर स्वरा भास्कर हिने ट्विट करत म्हटले की, 'राहुल गांधी यांच्यासारखे मुख्य प्रवाहातले राजकारणी इतक्या स्पष्टपणे आणि परिपक्व भूमिका मांडत आहे. लोकशाहीतील अधिकारांसाठी त्यांनी आपले वैयक्तिक मत बाजूला ठेऊन समजदारपणाने भूमिका मांडली.'   
 

 

'सेक्रेड गेम्स'मधून काही दृश्य काढून टाकण्याबाबत दिल्ली उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. तसेच ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA)चे अध्यक्ष सुरेश श्यामल गुप्ता यांनी चेंबूर पोलिस ठाण्यात या सीरिजच्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

या तक्रारीवरून नेटफ्लिक्स, निर्माते, दिग्दर्शक अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवाने यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात यावी, असं तक्रारीत म्हटलं आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सैफ अली खान यांच्या यात मुख्य भुमिका आहेत.  

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #SacredGames Swara Bhaskar and Anurag Kashyap react on Rahul Gandhis Tweet