साखर खाल्लेल्या माणसाची खरी गोष्ट! 

हेमंत जुवेकर
शुक्रवार, 31 मार्च 2017

निर्माते- प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन 
लेखक- विद्यासागर अध्यापक 
दिग्दर्शक - विद्यासागर अध्यापक 
नेपथ्य- प्रदीप मुळे 
प्रकाश- किशोर इंगळे 
गीत- गुरू ठाकूर 
 

आधुनिक जीवनशैलीतलं सगळं हवंहवंसं वाटणं, त्याचा मनःपूत उपभोग घ्यावासा वाटणं यात चुकीचं ते काय? 
प्रश्न मनावरचं दडपण झुगारण्यासाठी असला तरी ते दडपण आणि मनातलं प्रश्नचिन्ह हटता हटत नाही. आपण जे करतोय ते चुकीचं आहे की काय, अशीच शंका मनात येतच राहते. आई-वडिलांनी कष्टात काढली त्यांची आयुष्य. आम्ही थोडं एन्जॉय करतो हे योग्यच, असं मनाला ठासून सांगतानाही काही तरी चुकतंय, हातून काही तरी निसटतंय असं वाटत राहतं... 
अशीच काहीशी अवस्था आहे आजच्या वानप्रस्थाश्रमाला लागू पाहणाऱ्या एका पिढीची. आपल्या आई-वडिलांचं ऐकलेलं असतं त्यांनी, आपल्या मुलांचंही ऐकून घेत असतात! यांचं सारंच चूक, असंही म्हणवत नाही आणि त्यांचं सारंच बरोबर असंही म्हणवत नाही. आपण सुधारक आई-बाप आहोत याचा अभिमान एकीकडे आणि मनावर असलेलं संस्कारांचं ओझं दुसरीकडे, अशा कात्रीत सापडलेलं आयुष्य यांचं. 
आई-वडील सांगायचे, मुंगी होऊन साखर खावी; पण ऐशारामी आयुष्याच्या मधुमासात खरं सांगायचं साखरच जास्त... 
साखर खाल्लेला माणूस ही त्या जास्तीच्या साखरेची गोष्ट आहे. 
म्हटलं तर हे कुणाच्याही आयुष्यात घडू शकेल असं साधं सरळ "हॅपनिंग' आहे. 
(नाटक असल्यानं थोडे विभ्रम, ट्विस्ट आणि टर्नस्‌ आहेतच पण नाटक म्हटल्यानं ते चालसे...) 
विलास देशपांडे (प्रशांत दामले) हा कोणत्याही उच्च मध्यमवर्गीय घरात शोभेलसा एक मध्यमवयीन माणूस. कोणत्याही कॉर्पोरेट 
एक्‍झिक्‍युटिव्हसारखंच त्याचं आयुष्य. टार्गेटमुळे हैराण झालेला, आपला ओरिजनल टारगटपणा विसरून गेलेला; पण तरीही "वर्क हार्ड आणि पार्टी हार्डर' हे ब्रीदवाक्‍य न विसरलेला. त्याच्यासोबत असते ती या ब्रीदवाक्‍यामुळे चिडणारी, कावणारी तरीही त्याच्यावर प्रेम करणारी बायको- माधवी (शुभांगी गोखले) आणि या दोघांची स्वतंत्र बाण्याची मुलगी ऋचा (ऋचा आपटे). जिला तो स्वातंत्र्य देतो असं म्हणतो; पण तरीही तिच्या उशिरा येण्याचं टेन्शन घेतो. 
अचानक या गृहस्थाला उमगतं की मधुमास संपण्याचे दिवस जवळ आलेत नि आपल्याला मधुमेह झालाय... त्यासाठी नेमकं काय करायला हवं, हे सांगणारा ऋचाचा घरी आलेला मित्र ओंकार (संकर्षण कऱ्हाडे) बहुधा तिचा हात मागायला आलाय, हेही त्याला कळतं. आपल्या हातून आपल्या लेकीचा हात निसटतोय, असं वाटून विलास अशा काही खेळी करतो की त्यांचं लग्न होऊच नये. त्या सफलही होतात; पण नंतर ऋचा त्यांच्यावरच बॉम्ब टाकते... "मै उसके बच्चेकी मॉं बनने वाली हूँ' असं सांगून. शिवाय आपण या बाळाला जन्म देणार असल्याचं ऐलानही ती करते. 
आयुष्यात अती झालेली साखर वाईट कशी, हे सांगणारं विद्यासागर अध्यापक यांचं हे नाटक. एक सरळसोट नाटक म्हणून कुणी पाहिलं तर एक फॅमिली ड्रामा म्हणूनही खपू शकेल. म्हटलं तर, मध्यमवर्गीयांची - मध्यममार्गीयांची "कोणता झेंडा घेऊ हाती' हे न कळल्याने झालेली गोची सांगणारं ठरू शकेल. 
पण कोल्हापूरला हौशी रंगभूमीवर सादर करताना अध्यापकांनी त्याला ब्लॅक कॉमेडीचा ब्लेंड दिला होता. चंद्रकांत कुलकर्णींनी व्यावसायिक रंगभूमीवर आणताना त्याला आणखीन धारधार बनवलंय. आपल्याच आयुष्यातले प्रसंग त्रयस्थपणे पाहताना आपल्याच वागण्यातला फोलपणा सहजपणे जाणवावा, अशा अनेक जागा या नाटकात आहेत. तत्क्षणी हसू येईल; पण नंतर त्याबद्दल विचार करावासा वाटेल अशा... 
दिग्दर्शक म्हणून "चंकु'नी प्रशांत दामलेंना नेहमीपेक्षा थोडं वेगळं काही करायला लावलं असलं, तरी त्यांची शैली (आणि गाणी) अगदीच सोडायला लावलेली नाही; पण तरीही हा कटकट करणारा नवरा-बाप प्रशांत दामलेंमुळे लव्हेबलच वाटतो. 
माधवी ही म्हटलं तरं नेहमीसारखीच गृहिणी. शुभांगी गोखलेंची हातखंडा भूमिका; पण ही माधवी कुठेही ती "शामल' (टिपरे!) वाटू नये याची दक्षता त्यांनी पुरेपूर घेतलीय. जवळजवळ पंधरा वर्षांनी रंगभूमीवर पदार्पण करणाऱ्या शुभांगी गोखलेंची माधवी फ्रेश वाटते! (इतक्‍या वर्षांनी नाटकात काम केल्यामुळे त्यांनाही तसंच वाटत असेल) 
संकर्षण आणि ऋचा या दोघांनी आपल्या भूमिका समजून केल्यात. नेपथ्य-प्रकाश आदी तांत्रिक अंगे अर्थातच उत्तम. 
प्रशांतचं नाटक असल्यानं संगीत अशोक पत्कींचं हे ओघानं आलंच. तेही गोडच आहे. 
हसायला भाग पाडणारं, पण तरीही साखर वाढू न देणारं, असं हे गोड नाटक. 
प्रशांत दामलेंच्या फॅन्ससाठी तर "मस्ट वॉच', पण नसलात तरीही पाहाच... 

निर्माते- प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन 
लेखक- विद्यासागर अध्यापक 
दिग्दर्शक - विद्यासागर अध्यापक 
नेपथ्य- प्रदीप मुळे 
प्रकाश- किशोर इंगळे 
गीत- गुरू ठाकूर 
 

Web Title: sakhar khallela manus review