सखी गोखले व सुव्रत जोशी यांची विवाहगाठ!

गुरुवार, 11 एप्रिल 2019

सखी गोखले लंडनहून भारतात लग्नासाठीच परतली असल्याचेही बोलले जात होते. आता मात्र थेट त्यांच्या लग्नाचेच फोटो समोर आले आहेत.

'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता सुव्रत जोशी व अभिनेत्री सखी गोखले आज विवाहबंधनात अडकले. या विवाह सोहळ्याला मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी हजेरी लावली आहे. या सोहळ्यातील काही फोटो सेलिब्रेटींनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.  

सखी आणि सुव्रत यांची भेट दुनियादारीच्या सेटवर झाली. येथूनच त्यांच्या प्रेमकहाणीला सुरवात झाली. सखी गेल्या वर्षभरापासून लंडनला शिकायला गेली होती. या दरम्यानही सुव्रत आणि सखी यांच्यातले प्रेम सोशल मिडीयावरील त्यांच्या पोस्ट आणि फोटोज् मधून दिसून आलेच. कधी एअरपोर्टवर तर कधी थेट लंडन गाठत सुव्रतने आपल्या लाडक्या सखीच्या चेहऱ्यावर आपल्यामुळे हास्य येण्यासाठीचे प्रयत्न आपण विविध फोटोज् मधून बघितले असेलच. 

गेल्या काही दिवसांपासून सुव्रत जोशी व सखी गोखले यांच्या लग्नाच्या चर्चेला उधाण आले होते. सखी लंडनहून भारतात लग्नासाठीच परतली असल्याचेही बोलले जात होते. आता मात्र थेट त्यांच्या लग्नाचेच फोटो समोर आले आहेत. काल मेहंदीचा सोहळा पार पडला. ज्यात सखीच्या जवळच्या मैत्रीणी सायली संजीव आणि आरती वडगबाळकर या तिच्या हातावर मेहंदी काढताना दिसत आहेत. सखी आणि सुव्रतचा विवाह सोहळा पुण्यातच पार पडतो आहे. 

सखी-सुव्रतच्या लग्नाचे फोटोज् पाहा 'सकाळ'च्या इंस्टाग्राम अकाउंटवर
 

'सकाळ'च्या 'मैत्रीण' पुरवणीसाठी घेतली सखीने महिनाभर सुट्टी :
सखी गोखले ही 'सकाळ'च्या 'मैत्रीण' पुरवणीसाठी जानेवारीपासून लेख लिहीते आहे. 'लंडन कॉलिंग' या सदरातून ती आपले लंडन येथे राहण्याचे, फिरण्याचे, खाण्यापिण्याचे किस्से शेअर करते आहे. पण लग्नासाठी म्हणून तिने लिखाणापासून एक महिन्याची सुट्टी घेतली आहे. एका महिन्यानंतर ती पुन्हा 'सकाळ'मधून आपल्या भेटीला येईलच.