Bharat Review : ऍक्‍शन, इमोशनचा रोलर कोस्टर 

महेश बर्दापूरकर 
Wednesday, 5 June 2019

  • 'भारत' चित्रपटात स्वातंत्र्यानंतरच्या 60 वर्षांतील कथा
  • कथेत नावीन्य तर त्याहीपेक्षा पटकथा चांगली गुंफल्यानं ती भिडणारी...
  • कॅतरिना कैफ सरप्राईज पॅकेज

सलनान खान पुन्हा एकदा ईदच्या दिवशी आपला ब्लॉक बस्टर चित्रपट घेऊन आलाय आणि यावेळी त्याचं पाऊल दमदार पडलंय. 'भारत' हा अली अब्बास जफर दिग्दर्शित चित्रपट भारत या युवकाची गोष्ट सांगतो. दिग्दर्शक फाळणीच्या जखमा, त्यातून मोठ्या कष्टानं उभी राहिलेली कुटुंबं, आपल्या हरवलेल्या नातेवाइकांच्या शोधासाठी, त्यांच्या भावना जपण्यासाठीची त्यांची धडपड असा खूप मोठा पट उभा करतो. स्वातंत्र्यानंतरच्या 60 वर्षांत देशाची बदललेली आर्थिक, सामाजिक, राजकीय, तसेच कला व क्रीडा क्षेत्रातील कामगिरीही कथेच्या ओघात अधोरेखित केली जाते. उत्कृष्ट पटकथा, सलमान, कॅतरिना कैफ, सुनील ग्रोवर यांचा कसदार अभिनय, विनोदाच्या जोडीला अनेक भावुक प्रसंग, ऍक्‍शन, गाणी, नृत्यं असा भरगच्च मसाला असल्यानं (तब्बल तीन तासांचा असूनही) चित्रपट कुठंही न अडखळता छान मनोरंजन करण्यात यशस्वी होतो. सलमानच्या गेल्या काही अपयशी चित्रपटांच्या पार्श्‍वभूमीवर हा चित्रपट त्याला बऱ्यापैकी हात देण्याची शक्‍यताही निर्माण करतो. 

'भारत'ची कथा फाळणीपूर्व काळातील पाकिस्तानात सुरू होते. फाळणीनंतर हिंसाचार सुरू होताच अनेक हिंदू कुटुंब भारताच्या दिशेनं निघतात. एक स्टेशन मास्टर (जॅकी श्रॉफ) आपल्या कुटुंबाला घेऊन ट्रेनमध्ये बसत असतानाच हिंसाचार सुरू होतो व त्याची छोटी मुलगी आणि तो स्टेशनवर राहतात, तर पत्नी व दोन मुलं भारताच्या दिशेनं रवाना होतात. वडील हात सोडताना मोठ्या मुलाला कुटुंबाची जबाबदारी स्वीकारायला सांगतात आणि पुन्हा भेटण्याचं आश्‍वासनही देतात. मोठा झालेला भारत (सलमान खान) आपली आई (सोनाली कुलकर्णी) व धाकट्या भावाची काळजी घेतो आणि छोटी बहीण व वडील भेटण्याची वाट पाहात राहतो. कुटुंब जगवण्यासाठी तो त्याच्या मित्राबरोबर (सुनील ग्रोव्हर) अनेक छोट्या-मोठ्या नोकऱ्या करू लागतो. यातून ते दोघं एका सर्कसमध्ये काम करू लागतात. तिथं भारत राधाच्या (दिशा पटणी) प्रेमात पडतो. मात्र, काही प्रसंगांमुळं त्याला ही नोकरी सोडावी लागते. आता तो आखाती देशांतील तेलाच्या विहिरींमध्ये नोकरीसाठी प्रयत्न सुरू करतो. इथं त्याला सरकारी अधिकारी कुमुद रैना (कॅतरिना कैफ) भेटते, त्याचं प्रेमही फुलतं. पैसा कमावून भारतात परतलेला भारत कुमुदबरोबर लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहण्याचा निर्णय घेतो. नोकरीसाठी पुन्हा एकदा एका जहाजावर जातो. हा प्रवास संपल्यानंतर टीव्ही प्रोड्युसर पदापर्यंत पोचलेली कुमुद फाळणीमध्ये वेगळ्या झालेल्या कुटुंबांना एकत्र आणण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन करते. भारतला आपले वडील आणि बहीण पुन्हा भेटतील ही आशा निर्माण होते... 

bharat

चित्रपटाच्या कथेत नावीन्य नक्कीच आहे, पण त्याहीपेक्षा पटकथा चांगली गुंफल्यानं ती भिडते. स्वातंत्र्योत्तर काळात नोकरीसाठी युवकांना करावी लागणारी धडपड, एका टप्प्यानंतर सहज मिळत गेलेल्या सरकारी नोकऱ्या, देशानं 1991 मध्ये आर्थिक धोरणात बदल केल्यानं पुन्हा एकदा बदललेला देश असे टप्पे भारतच्या प्रवासाबरोबर येत राहतात... (यात 1983 मध्ये जिंकलेला क्रिकेट वर्ल्डकपपासून, अमिताभचे करिअर, सचिन आणि शाहरुख खानचा उदय यांचेही संदर्भ येतात.) भारत सर्कसमध्ये काम करतानाचे प्रसंगही छान जमून आले आहेत. तो आखाती देशात कामाला गेल्यानंतरचे प्रसंग व कुमुदबरोबरचे प्रेमप्रसंग हा कथेतील सर्वाधिक बहारदार भाग ठरतो. त्यानंतर चित्रपट थोडा रेंगाळतो व घुसडलेली एक-दोन गाणी कंटाळा आणतात. मात्र, फाळणीत वेगळ्या झालेल्या कुटुंबांना एकत्र आणण्याचे प्रसंग हळवे झाले असून, इथं चित्रपटाचा टोन बदलत असला, तरी तो निराश करीत नाही. विनोद, ऍक्‍शन आणि हळव्या प्रसंगांचं एक नेमकं मिश्रण साधण्यात दिग्दर्शक यशस्वी झाल्यानं भारतचा हा लांबलचक प्रवास कुठंही कंटाळवाणा होत नाही. विशाल-शेखर यांचं संगीत उत्तम असून, फाळणीसारख्या प्रसंगांतील चित्रण भव्य आहे. चित्रपटामधील एका विनोदी प्रसंगामध्ये संपूर्ण राष्ट्रगीत वाजवण्याची दिग्दर्शकाची कृती मात्र खटकते. 
सलमान खानला या चित्रपटातून पुन्हा एकदा सुरू गवसला आहे.

'टायगर' या मालिकेप्रमाणे ऍक्‍शन आणि इमोशनचा भन्नाट संगम साधत व त्याला कॉमेडीची व रोमान्सची फोडणी देत त्यानं भूमिका छान रंगवली आहे. त्याला अतरंगी नृत्यांची जोड देत प्रेक्षकांच्या टाळ्याही मिळवल्या आहेत. त्याची बहुतांश भूमिका वयाच्या साठीच्या पुढची असूनही ती कुठंही रटाळ झालेली नाही. कॅतरिना कैफ सरप्राईज पॅकेज ठरली आहे. साध्या कपड्यांतील, कमीत कमी मेकअप असलेली कुमुद तिनं भन्नाट साकारली आहे. सलमानबरोबरची तिची केमिस्ट्री जुळून आली असून, दोघांची नृत्य आणि प्रेमप्रसंग लक्षात राहतात. सुनील ग्रोवर या गुणी अभिनेत्याला कारकिर्दीतील सर्वांत चांगली लिहिली गेलेली आणि मोठी भूमिका मिळाली असून, त्यानं तिचं चीज केलं आहे. त्याचं विनोदाचं टायमिंग जबरदस्त आहे आणि गंभीर प्रसंगांतही त्याला अभिनय लाजवाब ठरतो. दिशा पटणीला फार मोठी भूमिका नसली तरी ती भाव खाऊन जाते. जॅकी श्रॉफ, सोनाली कुलकर्णी, सतीश कौशिक, ब्रिजेंद्र काला, तब्बू आदी कलाकारांनी छोट्या भूमिकांत चांगली साथ दिली आहे. 

एकंदरीतच, ऍक्‍शनपासून अभिनयापर्यंतच्या आघाड्यांवर जोरकस कामगिरी करणारा हा चित्रपट सलमानच्या चाहत्यांना खूष करणार यात शंकाच नाही. 

श्रेणी : 3.5 

bharat


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Salman Khan Starer Bharat Film Review