कलापूरनेच दिली गायिका म्हणून ओळख

कलापूरनेच दिली गायिका म्हणून ओळख

कोल्हापूरची असल्याचा सार्थ अभिमान नक्कीच आहे. कारण मला खऱ्या अर्थाने गायिका म्हणून ओळख मिळवून दिली ती याच कलापूरने. जन्म कोल्हापूरचा. शिक्षण कोल्हापुरातच झाले आणि विवाहानंतर आता मुंबईत स्थायिक आहे. गाणे तर सुरूच आहे. पण, संगीत नाटकांची परंपरा आजच्या काळातही सुरूच राहिली पाहिजे, या एकमेव उद्देशाने ज्या ज्या संगीत नाटकांत संधी मिळेल त्या संधीचं सोने करते आहे. "संगीत संन्यस्त खड्‌ग', "संगीत हाच मुलाच बाप' या नाटकांचे प्रयोग सध्या सुरू आहेत. राज्य शासनाच्या संगीत राज्य नाट्य स्पर्धेत "संगीत संन्यस्त खड्‌ग'मधील सुलोचनाच्या भूमिकेसाठी स्वराभिनयाचं रौप्यपदकही मिळाले. विजय गोखले दिग्दर्शित "संगीत एकच प्याला' हे नाटकही आता लवकरच रंगमंचावर येणार आहे...प्रसिद्ध गायिका संपदा माने संवाद साधत असते आणि यानिमित्ताने एका खणखणीत गाण्याचा प्रवासही उलगडत असतो. 

विवेकानंद कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण आणि त्यानंतर शिवाजी विद्यापीठात संगीत व इंग्रजी विषयात "एमए' करताना संपदाचे गाणे, युवा महोत्सव आणि बक्षीसांची लयलूट हे समीकरण ठरलेले असायचे. राष्ट्रीय युवा महोत्सवात सुवर्णपदकाची मानकरीही ती ठरली. गुरू व्दारकानाथ पै, विनोद ठाकूरदेसाई, शरद बेनाडीकर यांचे मार्गदर्शन या साऱ्या प्रवासात मोलाचं ठरले.

महेश हिरेमठ यांच्यामुळे अंतरंग वाद्यवृंद हे एक हक्काचे व्यासपीठ मिळाले. "एनसीपीए'कडून सूरश्री केसरबाई केरकर शिष्यवृत्तीही तिला मिळाली. कलापूरच्या शिरपेचात चार वर्षापूर्वी तिने आणखी एक मानाचा तुरा रोवला. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाने घेतलेल्या "संगीत अलंकार' या परीक्षेत ती भारतात पहिली आली. दिक्षान्त सोहळ्यात गायनाचार्य रामकृष्ण वझे पुरस्कार, श्रीमती संगीता जोशी पुरस्कार, हरिओम ट्रस्ट गायन प्रचार पुरस्कार, प्राध्यापक वासुदेव वाघमारे पुरस्कार, कै. लक्ष्मीबाई कडेठाणकर पुरस्कार, संगीताचार्य जी. डी. जोशी पुरस्कार, नानासाहेब महागावकर स्मृती पुरस्कार, प्राजक्ता कुलकर्णी पुरस्कार अशा तब्बल आठ पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

विवाहानंतर मुंबईला गेल्यानंतरही गाणे काही थांबलेले नाही. एकीकडे संगीत नाटकातील भूमिका साकारत असताना तितक्‍याच नेटाने विदुषी शाल्मली जोशी यांच्याकडे जयपूर घराण्याच्या गायकीचं शिक्षणही सुरू आहे. मकरंद कुंडले यांच्याकडे नाट्यगीतांचे तर पंडित अरूण द्रविड यांच्याकडेही गाण्याचं शिक्षण सुरू आहे. 

कोल्हापूरची संस्कृती, इथली माणसं, त्यांचा निस्वार्थीपणा या साऱ्या निखळ वातावरणात घडल्याने एक माणूस म्हणून आवश्‍यक चांगले संस्कार नक्कीच मिळाले. मुंबईने आणखी एक्‍स्पोजर दिले. येत्या काळातही संगीत नाटकांतून नक्कीच रंगभूमीची सेवा करत राहणार आहे. 
- संपदा माने  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com