सोंगी भजनातून मिळाली करिअरची प्रेरणा...!

सोंगी भजनातून मिळाली करिअरची प्रेरणा...!

मी राधानगरी तालुक्‍यातील येळवडे गावचा. गावातील सोंगी भजन म्हणजे आमच्या कलाविष्काराचं हक्काचं व्यासपीठ. मात्र, आयुष्याच्या एका वळणावर चित्रपटातच आपल्याला करिअर करायचं असल्याची खूणगाठ बांधली आणि सव्वीस वर्षांपूर्वी शहरात आलो. आजवर अनेक चित्रपट केले. अडचणी तर होत्याच पण कधीही डगमगलो नाही. अभिनयाबरोबरच लेखन आणि दिग्दर्शनातही आपला ठसा उमटवलेले संजय टिपुगडे यांच्याशी संवाद साधताना त्यांच्या प्रवासातील एकेक टप्पा उलगडत जातो.   

ज्येष्ठ अभिनेते दादा भोसले, बाळ तारी यांच्या मार्गदर्शनाखाली संजय यांच्या करिअरचा प्रवास सुरू झाला. ज्येष्ठ गीतकार (कै) जगदीश खेबुडकर यांच्या ‘गावरान मेवा’ मध्ये पहिली संधी मिळाली. मात्र, चित्रपटात पहिली संधी दिली ती प्रसिद्ध दिग्दर्शक (कै) यशवंत भालकर यांनी. ‘घे भरारी’ या चित्रपटात त्यांनी संधी दिली. २०१३ ला प्रदर्शित झालेला ‘कुंपण’ हा चित्रपट एक टर्निंग पॉईंट ठरला. आम्ही चौघा मित्रांनी निर्माता म्हणून ही कलाकृती साकारली. या चित्रपटापासून लेखक, गीतकार आणि दिग्दर्शक म्हणून ओळख निर्माण झाली. त्यानंतर ‘स्किमर’ हे व्यावसायिक नाटकही रंगमंचावर आणलं.

‘घे भरारी’, ‘राजा पंढरीचा’, ‘सासरची का माहेरची’, ‘देव माझा बाळूमामा’, ‘सावधान पुढे गाव आहे’, ‘कृष्णनिती’ आदी चित्रपटात भूमिकाही केल्या. स्वतंत्रपणे दिग्दर्शन केलेला ‘कुंपण’ हा चित्रपट त्यानंतर ‘औषध’, ‘गावगाडा’, ठोकर’ हे चित्रपटही केले. ‘गावगाडा’ व ‘ठोकर’ या चित्रपटांना नुकतेच सेन्सॉर प्रमाणपत्र मिळाले असून लवकरच ते प्रदर्शित होतील.

‘गावगाडा’च्या निर्मात्या निशा गावकर यांचे विशेष सहकार्य मिळाले असून कथा, पटकथा, गीतलेखनाबरोबरच दिग्दर्शक म्हणून जबाबदारी सांभाळल्याचे श्री. टिपुगडे आवर्जुन सांगतात. कोल्हापूरला सोंगी भजनाची मोठी परंपरा आहे. बदलत्या काळात आजही ती कायम असून सोंगी भजनातून अनेक हौशी कलाकार रंगमंचावर आले. त्यातील काहींनी पुढे करिअर म्हणूनच फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केले आणि यशाचा एकेक टप्पा पार करत ही मंडळी यशोशिखराकडे जात आहेत. अशाच कलाकारांचं श्री. टिपुगडे हे एक प्रातिनिधीक उदाहरण.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com