ऑन स्क्रीन : अंतिम : द फायनल ट्रुथ : हिंदीपेक्षा मराठी पॅटर्न सरस

प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मूळशी पॅटर्न’ हा मराठी चित्रपट २०१८मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला घवघवीत यश मिळाले.
Antim : The Final Truth
Antim : The Final TruthSakal

प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मूळशी पॅटर्न’ हा मराठी चित्रपट २०१८मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला घवघवीत यश मिळाले. शेतकऱ्यांच्या जमिनी धनदांडग्यांनी कवडीमोल भावाने विकत घेणे आणि त्यांना देशोधडीला लावणे यासारखा संवेदनशील विषय या चित्रपटात मांडण्यात आला होता. आता या चित्रपटाचा हिंदी रिमेक ‘अंतिम : द फायनल ट्रुथ’ प्रदर्शित झाला आहे. महेश मांजरेकर यांनी तो दिग्दर्शित केला आहे. सलमान खानसह आयुष शर्मा, सचिन खेडेकर, उपेंद्र लिमये, शरद पोंक्षे, महिमा मकवाना आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. छोट्या शहरात राहणाऱ्या राहुलची (आयुष शर्मा) ही कथा. तो आपले आई-वडील आणि बहिणीबरोबर राहात असतो. सुरुवातीला सरळ आणि साध्या स्वभावाचा असलेला राहुल नंतर पुण्यातील खतरनाक गुंड बनतो.

राहुलचे वडील हलाखीच्या परिस्थितीमुळे पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात हमालीचे काम करीत असतात. त्याच मार्केट यार्डमध्ये एके दिवशी मोठी झटापट होते. राहुल काही गुंड मंडळींना मारहाण करतो. परिणामी त्याला तुरुंगात जावे लागते. तेथे त्याची ओळख नान्या भाईशी (उपेंद्र लिमये) होते. राहुलला तुरुंगातून सोडविण्यास तो मदत करतो आणि आपल्या गँगमध्ये सामील करतो. राहुल हप्तेवसुली करून हळू हळू मोठा गुंड बनतो. त्याचबरोबर आपले शत्रूही अनेक निर्माण करतो. मात्र त्याच्या वागण्यावर वडील नाराज असतात. यातून बाहेर पडण्याचा त्याला सल्ला देतात. परंतु राहुल एकापाठोपाठ एक गुन्हे करीत जातो. त्याच दरम्यान पुण्यातील मार्केट यार्ड पोलिस स्थानकामध्ये राजवीर सिंग (सलमान खान) येतो. येथील गुन्हेगारी कशी संपवायची हे त्याला चांगले ठाऊक असते. त्या दृष्टीने तो कामाला लागतो. राहुलचे काय होते, त्याचे शत्रू कोणते पाऊल उचलतात, राजवीर क्राईम संपवितो का, राहुलची गर्लफ्रेण्ड मंदा त्याच्याशी लग्न करते का, या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी हा चित्रपट पाहावा लागेल.

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी मराठीचा हिंदी रिमेक करताना मूळ कथेचा पोत कुठे हरवणार नाही याची काळजी पुरेपूर घेतली आहे. या चित्रपटातील अॅक्शनपेक्षा संवाद अधिक दमदार आहेत. चित्रपटात ते अधिक ठाशीव वाटतात. अभिनयाच्या आघाडीवर सलमान खानने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका आपल्या स्टाईलने रंगविली आहे. परिस्थितीने गांजलेल्या तसेच प्रामाणिक आणि आपल्या तत्त्वावर ठाम असणाऱ्या राहुलच्या वडिलांची भूमिका सचिन खेडेकर यांनी उत्तम उभी केली आहे. महेश मांजरेकर यांचे पात्रही परिस्थितीमुळे ओझे वाहणारे असले, तरी त्यांच्या संवादातून खूप गोष्टी समजत जातात. महिमा मकवानने राहुलच्या प्रेयसीची भूमिका साकारताना गहिरे रंग भरलेले आहेत. बाकी सगळ्या कलाकारांनी आपापले काम चोख केले असले, तरी अधिक कौतुक करावे लागेल ते आयुष शर्माचे. ‘लवरात्री’ या चित्रपटानंतर त्याचा हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्याच्या डोळ्यातून प्रकट होणारे हावभाव लाजबाब. एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा ते अट्टल गुन्हेगार हे बेअरिंग त्याने छान पकडले आहे. चित्रपटातील गाणी उत्तम आहेत. विशेष करून ‘भाई का बर्थ डे...’ हे गाणे छान रंगलेले आहे. चित्रपटाचा पूर्वार्ध काहीसा संथ झालेला आहे. चित्रपटातील संवाद दमदार असले, तरी मारधाड, गोळीबारीमध्ये कुठेतरी हरवल्यासारखे वाटतात.

शहरांचा विकास होत असताना आजूबाजूच्या शेतकऱ्याच्या जमिनी कवडीमोल भावाने विकत घेतल्यानंतर त्यांची काय दशा होते, त्यांची मुले कशी देशोधडीला लागतात, हेच या चित्रपटातून मांडण्यात आले आहे. तहीही मराठी ‘पॅटर्न’ अधिक सरस होता, हेच खरे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com