ऑन स्क्रीन : अतरंगी रे : प्रेमाचा उत्कंठावर्धक त्रिकोण

अक्षय कुमार, धनुष आणि सारा अली खान या तीन कलाकारांभोवती या चित्रपटाचे कथानक फिरणारे आहे. या चित्रपटाची कथा बिहार. चेन्नई आणि दिल्लीत घडणारी आहे.
atrangi re movie
atrangi re moviesakal
Summary

अक्षय कुमार, धनुष आणि सारा अली खान या तीन कलाकारांभोवती या चित्रपटाचे कथानक फिरणारे आहे. या चित्रपटाची कथा बिहार. चेन्नई आणि दिल्लीत घडणारी आहे.

निर्माते व दिग्दर्शक आनंद एल. राय यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला चांगली कथाबीजे असलेले चित्रपट दिलेले आहेत. अगदी नवख्या कलाकारापासून स्टार्स कलाकारांबरोबर त्यांनी काम केले आहे. विशेष म्हणजे, लव्ह ट्रॅंगल कथांमध्ये ते चांगलेच माहीर आहेत. ‘अतरंगी रे’मध्ये त्यांनी तोच फॉर्म्युला वापरला आहे, परंतु त्याला वेगळी ट्रिटमेंट दिली आहे. या कथानकाची मांडणी त्यांनी उत्तम केली आहे. त्याच्या सोबतीला प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांच्या सुरेल संगीताची साथ लाभलेली आहे.

अक्षय कुमार, धनुष आणि सारा अली खान या तीन कलाकारांभोवती या चित्रपटाचे कथानक फिरणारे आहे. या चित्रपटाची कथा बिहार. चेन्नई आणि दिल्लीत घडणारी आहे. बिहार येथे राहणारी रिंकू सूर्यवंशी (सारा अली खान) सज्जाद अलीच्या (अक्षय कुमार) प्रेमात पडलेली असते. सज्जाद हा जादूगार असतो आणि तो लोकांचे मनोरंजन करीत असतो. रिंकूचे सज्जादवर जिवापाड प्रेम असल्याने ती एकवीस वेळा घरातून पळून जाण्याचा प्रयत्न करते, परंतु प्रत्येक वेळी तिचा प्रयत्न फसलेला असतो. कारण तिच्या घरातील सदस्य तिला पकडून आणतात. तिच्या अशा वारंवार पळून जाण्याच्या प्रयत्नामुळे तिची नानी (सीमा विश्वास) कमालीची संतप्त झालेली असते. कोणत्याही परिस्थितीत आता रिंकूचे लग्न लावले पाहिजे असे ती आणि अन्य सदस्य विचार करतात. त्याच वेळी बिहारमध्ये मेडिकलचे शिक्षण घेण्यासाठी आलेल्या विशू (धनुष) नावाच्या एका विद्यार्थ्याला पकडून आणतात आणि जबरदस्तीने त्या दोघांचे लग्न लावून देतात. खरे तर विशूचे एका मुलीवर प्रेम असते आणि काही दिवसांनी त्यांची एंगेजमेंट असते. विशूला हे लग्न मान्य नसते तर रिंकूलादेखील हे लग्न नको असते. अशाही परिस्थितीमध्ये ते दोघे दिल्लीला जातात. तेथे पोहोचल्यानंतर आपण आपापल्या मार्गाने जायचे असे ते ठरवितात आणि नंतर कोणत्या आणि कशा घडामोडी होतात हे या चित्रपटात उत्तमरीत्या मांडण्यात आलेले आहे. निर्माते व दिग्दर्शक आनंद एल. राय यांनी हा चित्रपट थिएटरात प्रदर्शित न करता ओटीटीवर प्रदर्शित केला आहे. अक्षय कुमार, सारा अली खानबरोबर ते पहिल्यांदाच काम करीत आहेत त धनुषबरोबर त्यांनी रांझणामध्ये काम केले आहे. या चित्रपटात या तिन्ही कलाकारांनी कमालीचा अभिनय केला आहे.

तरीही सारा अली खानचे कौतुक अधिक करावे लागेल. रिंकूची चुलबुली आणि काहीशी नटखट भूमिका तिने बेमालुमपणे साकारली आहे. एकीकडे आपले जबरदस्तीने झालेले लग्न आणि दुसरीकडे असलेले जिवापाड प्रेम अशा द्विधा मनःस्थितीत सापडलेल्या रिंकूच्या भूमिकेतील बारकावे तिने पडद्यावर उत्तम रेखाटले आहेत. विशूच्या मित्राची भूमिका आशिष वर्माने साकारली आहे आणि तीदेखील लक्षवेधक अशी भूमिका आहे. हिमांशू शर्मा आणि आनंद एल राय यांनी लिहिलेल्या या चित्रपटाला कलाकारांच्या धारदार अभिनयाची उत्तम साथ लाभली आहे. ए. आर. रेहमान यांच्या उत्तम संगीताची साथ ही या चित्रपटाची आणखीन एक जमेची बाब आहे. यातील ‘चकाचक...’ हे गाणे आधीच लोकप्रिय ठरलेले आहे. कथेत इमोशन्स आणि ड्रामा भरलेला आहे. चित्रपटाचा पूर्वार्ध काहीसा ताणलेला दिसतो. तेथे दिग्दर्शक काही अंशी कमी पडलेला दिसतो. दिग्दर्शकाने खुसखुशीत असा आगळावेगळा प्रेमाचा त्रिकोण मांडलेला आहे. हा प्रेमाचा त्रिकोण उत्कंठावर्धक असाच झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com