ऑन स्क्रीन : चंदीगड करे आशिकी : चाकोरीबाहेरचा प्रयत्न

बॉलीवूडमध्ये काही दिग्दर्शक चाकोरीबाहेरचा विचार करतात. नेहमीच्या चौकटीत बसणाऱ्या चित्रपटांपेक्षा काहीसे हटके विचार ते करीत असतात आणि त्याकरिता मोठे धाडसही दाखवितात.
chandigarh kare aashiqui
chandigarh kare aashiquisakal

बॉलीवूडमध्ये (Bollywood) काही दिग्दर्शक चाकोरीबाहेरचा विचार करतात. नेहमीच्या चौकटीत बसणाऱ्या चित्रपटांपेक्षा (Movie) काहीसे हटके विचार ते करीत असतात आणि त्याकरिता मोठे धाडसही दाखवितात. दिग्दर्शक व लेखक अभिषेक कपूर त्यापैकीच एक. ‘काय पो छे’, ‘रॉक ऑन’, ‘केदारनाथ’ असे काही चित्रपट त्याने दिग्दर्शित केले आहेत. आपल्या दिग्दर्शकीय कौशल्य त्याने या चित्रपटांमध्ये दाखविले आहे. परंतु आता आलेल्या ‘चंदीगड करे आशिकी’ (chandigarh kare aashiqui) या चित्रपटाद्वारे त्याने आपले दिग्दर्शकीय कसब दाखविले आहेच शिवाय एका वेगळ्या विषयाला हात घालून धाडसही केले आहे. सामाजिक रीतिरिवाज आणि परंपरा यांना छेद देणारा विषय त्याने या चित्रपटात मांडला आहे. या चित्रपटाची कथा मनू (आयुषमान खुराना) आणि मानवी (वाणी कपूर) या दोन व्यक्तिरेखांभोवती फिरणारी आहे. मनविंदर मुंजाल ऊर्फ मनू हा एक फिटनेस उत्साही आणि बॉडीबिल्डर आहे. जाट लाईक टू फ्लेक्स नावाची जीम त्याच्या मालकीची आहे. तो दरवर्षी G.O.A.T (Gabru of All Time) स्पर्धेत भाग घेत असतो. पण कसं जिंकायचं हे त्याला माहीत नसतं. या मनूचे दोन जुळे मित्र (गौतम शर्मा आणि गौरव शर्मा) असतात.

आपल्या व्यवसायाला पुढे वाढविण्यासाठी ते जीममध्ये झुंबा डान्स शिकविण्यासाठी मानवी ब्रार (वाणी कपूर) आणतात. वाणी झुंबा शिक्षिका बनून तेथे येते आणि सगळ्यांना झुंबाचे धडे देत असते. त्याच वेळी मनू आणि मानवी एकमेकांच्या अधिक जवळ येतात. त्यांच्यामध्ये प्रेम जुळते. त्यांच्या प्रेमाचा प्रवास आता खऱ्या अर्थाने सुरू होणार असतो. मनू मानवीच्या प्रेमात आकंठ बुडालेला असतो आणि ते दोघे लग्न करण्याच्या विचारातही असतात. परंतु त्याच दरम्यान मानवी आपली खरी ओळख मनूला सांगते. ते ऐकल्यानंतर मनू कमालीचा संतापून उठतो. मानवीला हे शहर सोडून जाण्यास तो सांगतो. त्याच्या मनात पश्चातापाची भावना निर्माण होते आणि मग हा गंभीर विषय हळूवारपणे उलगडत जातो. हा चित्रपट शेवटपर्यत खिळवून ठेवणारा असला तरी याचा क्लायमॅक्स फारसा उत्कंठावर्धक आहे असे म्हणता येणार नाही. कारण चित्रपटाचा शेवट काय होणार आहे याची साधारण कल्पना पहिल्यांदाच येते. मात्र या चित्रपटाच्या विषयात नावीन्य आहे आणि अभिषेक कपूरने मोठ्या धाडसाने हा विषय मांडला आहे. आयुषमान खुराना आणि वाणी कपूर या दोन कलाकारांनी संपूर्ण चित्रपट आपल्याच खांद्यावर घेतला आहे. अन्य कलाकार लोणच्याप्रमाणे आहेत. परंतु त्यांनीही मोलाची कामगिरी या चित्रपटात केली आहे.

आयुषमानने आपल्या भूमिकेतील बारकावे छान टिपलेले आहेत. त्याचा लूक आणि त्याचा सहजसुंदर अभिनय नजरेत भरण्यासारखा आहे. त्याने आपली भूमिका कमालीची एन्जॉय केली आहे. परंतु विशेष कौतुक करावे लागेल ते वाणी कपूरचे. वाणीचे आतापर्यंत जे काही चित्रपट आलेले आहेत त्याहीपेक्षा अधिक सकस आणि सरस अशी कामगिरी तिने या चित्रपटात केली आहे. मानवीची हळवी आणि भावनिक अशी भूमिका तिने छान रंगविली आहे. दिग्दर्शक अभिषेक कपूरने समाजातील एका गंभीर विषयावर हलक्याफुलक्या पद्धतीने भाष्य केले आहे. अत्यंत गांभीर्याने आणि संवेदनशीलतेने या विषयाशी संबंधित विविध पैलू त्याने मांडलेले आहेत. खरंतर या विषयातील आपल्याला थोडे फार ज्ञान असेल वा नसेल. परंतु अभिषेकने अत्यंत परिपक्वपणे आणि तोही विनोदी पद्धतीने हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या संवेदनशील विषयाला सुप्रतीक सेन आणि तुषार परांजपे यांच्या पटकथेची आणि संवादांची उत्तम साथ लाभलेली आहे. सिनेमॅटोग्राफर मनोज लोबोने चंडीगड आणि आसपासच्या परिसरातील दृश्ये आपल्या कॅमेऱ्यात छान टिपली आहेत. सचिन-जिगर यांचे संगीत कथेला पोषक असेच आहे. तरीही पूर्वार्ध काहीसा संथ झालेला वाटतो. समाजातील एका गंभीर विषयावर या चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com