Satarcha Salman movie: 'सातारचा सलमान' गाण्यासाठी हेमंत ढोमेनं आक्ख गावच रंगवून काढलं.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satarcha Salman movie title song out director hemant dhome coloured village for this song shooting

Satarcha Salman movie: 'सातारचा सलमान' गाण्यासाठी हेमंत ढोमेनं आक्ख गावच रंगवून काढलं..

Satarcha Salman movie title song : हेमंत ढोमे दिग्दर्शित 'सातारचा सलमान' चित्रपट आता प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा धमाल ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच हेमंत ढोमेने या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा एक किस्सा प्रेक्षकांसोबत शेअर केला आहे.

सुयोग गोऱ्हे, सायली संजीव, शिवानी सुर्वे, अक्षय टांकसाळे, यांच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या ‘सातारचा सलमान’ या गाण्याने प्रत्येकालाच ठेका धरायला लावले. एकंदरच रंगीबेरंगी वातावरण, आजूबाजूला पारंपरिक पोशाखात जल्लोषात नाचणारे गावकरी, सुयोगचा उत्स्फूर्त नाच आणि त्याला इतर कलाकारांनी दिलेली उत्तम साथ एकंदरच सगळं मस्त जुळून आले आहे.

हे गाणे चित्रित करण्यापूर्वी हेमंतच्या डोक्यात काही कल्पना होत्या. मुळात हे गाणे खूपच उत्स्फूर्त, जल्लोषमय असल्याने चित्रीकरणाचा परिसरही त्याला तसाच कलरफूल, उत्साहवर्धक हवा होता.

या चित्रपटाचे बरेच चित्रीकरण हे साताऱ्यातील गावांमध्ये चित्रित झाल्याने तिथे रंगीबेरंगी घरे दिसण्याची तशी शक्यताच नव्हती. अखेर हेमंतने गावाच्या चौकातल्या सगळ्या घरांना वेगवेगळे रंग देण्याचे ठरवले आणि गंमत म्हणजे हेमंतच्या या निर्णयावर गावकऱ्यांनीही संमती दर्शवली.

अगदी गावकरी येऊन येऊन सांगत होते, माझ्या घराला हिरवा रंग द्या, पिवळा रंग द्या. अखेर प्रत्येकाने आपापल्या आवडीनुसार घरांना रंग दिला आणि हेमंतला जे अपेक्षित होते, ते गाण्यात उतरले. आजही साताऱ्यातील केंजळ या गावात गेल्यावर ही रंगीबेरंगी घरे पाहायला मिळतात.

या चित्रपटात मकरंद देशपांडे, आनंद इंगळे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. प्रकाश सिंघी, टेक्सास स्टुडिओज निर्मित, सुरेश पै सहनिर्मित, रिलायन्स एन्टरटेनमेंट प्रदर्शित 'सातारचा सलमान' हा चित्रपट येत्या ३ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.