6 पेक्षाही कमीच गुण 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

पालकांनी आपल्या पाल्याला समजून घेण्याची गरज आहे. "6 गुण' या चित्रपटामध्ये हाच विषय मांडण्यात आला आहे.

मुलांवरील अभ्यासाचे दडपण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. पालकांच्या मुलांकडून अपेक्षाही वाढलेल्या आहेत. या स्पर्धेच्या युगात ही मुले आपापल्या परीने अभ्यास करीत आहेत. आपल्या बुद्धिकौशल्यानुसार गुण मिळवीत आहेत. परंतु पालकांच्या वाढलेल्या अपेक्षांमुळे कधी कधी हीच मुले तणावाखाली वावरत आहेत.

खरे तर, पालकांनी आपल्या पाल्याला समजून घेण्याची गरज आहे. "6 गुण' या चित्रपटामध्ये हाच विषय मांडण्यात आला आहे. सरस्वती सरवदे (अमृता सुभाष) आपला मुलगा विद्या (आर्चित देवधर) याच्यासह देवगड तालुक्‍यातील मिठमुंबरी गावात राहत असते. विद्याचे वडील (सुनील बर्वे) शास्त्रज्ञ असतात. ते परदेशात एका प्रोजेक्‍टवर काम करण्यासाठी गेलेले असतात. विद्या आदर्श विद्यालयात शिकत असतो. अभ्यासात तो हुशार असतो. शाळेत त्याचा नेहमीच पहिला नंबर येत असतो. त्याची आई कडक स्वभावाची आणि शिस्तीची असते. सातत्याने विद्याच्या मागे अभ्यासाचा तगादा ती लावीत असते. त्यामुळे विद्या केवळ पुस्तक एके पुस्तकामध्ये अडकलेला असतो. बाहेरच्या जगाची त्याला फारशी माहिती नसते. त्याला कुणी मित्र-मैत्रिणी नसतात. अशा वेळी त्याच शाळेत राजू (अजिंक्‍य लोंढे) हा हरहुन्नरी मुलगा येतो. याच शाळेत शिकणाऱ्या बबन खोत (सिद्धेश परब), बंडोपंत (कपिल रेडकर) वगैरे मुलांशी त्याची मैत्री होते. अभ्यासात तो हुशार असतोच; शिवाय बाहेरील स्पर्धेची त्याला जाणीव असते. मग राजू आणि विद्यामध्ये लागलेली स्पर्धा आणि विद्याच्या आईला येणारे दडपण वगैरे वगैरे बाबी या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.

किरण गावडे यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. सध्याच्या पालकांची मुलांकडून वाढलेली अपेक्षा आणि मुलांवर त्याचे येणारे दडपण या चित्रपटात किरण गावडे यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कलाकारांचा अभिनय आणि सुरेश देशमानेची सिनेमॅटोग्राफी वगळता या चित्रपटात फारसे काही आहे, असे म्हणता येणार नाही. सुनील बर्वे आणि अमृता सुभाष यांची रुपेरी पडद्यावरील केमिस्ट्री छान जुळलेली आहे. ते दोघेही अनुभवी कलाकार आहेत आणि आपल्या लौकिकाला साजेसा अभिनय त्यांनी केला आहे.

आपल्या मुलावर अतीव प्रेम करणारी; तसेच त्याला आपल्या धाकात ठेवणारी कडक शिस्तीची आई, असे भूमिकेचे बेअरिंग अमृताने योग्यरीत्या सांभाळले आहे. अमृताने अशा प्रकारच्या आईची व्यक्तिरेखा बहुधा पहिल्यांदाच साकारली असावी असे वाटते. आर्चित देवधरसह अन्य मुलांनी चोख कामगिरी केली आहे. विशेष बाब म्हणजे अजिंक्‍य लोंढे या चित्रपटात भाव खाऊन गेला आहे. दिग्दर्शक किरण गावडे यांनी या सर्व मुलांकडून चांगले काम काढून घेतले आहे.

कोकणातील लोकेशन्स सिनेमॅटोग्राफर सुरेश देशमानेने आपल्या कॅमेऱ्यामध्ये छान टिपलेले आहे. मात्र या चित्रपटाचा एकूणच विषय पडद्यावर मांडताना विस्कळितपणा झालेला आहे. त्यामुळे चित्रपट पाहताना उत्सुकता वाढत नाही. चित्रपटाच्या पूर्वार्धात काहीच फारसे होताना दिसत नाही. प्रणव रावराणे आणि अतुल तोडणकर यांच्या व्यक्तिरेखांवर अधिक काम होणे आवश्‍यक होते. ते झालेले दिसत नाही. संकलनही ढिसाळ झालेले आहे. खरे तर मुलांवर अभ्यासाचे मोठे दडपण आहे. अशा वेळी पालकांनी आपल्या अपेक्षांचे ओझे त्यांच्यावर अधिक न लादता त्यांना समजून घेणे अपेक्षित आहे... हे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे खरा; परंतु हा प्रयत्न तोकडा पडलेला आहे. हा चित्रपट मनाला फारसा भिडत नाही आणि पटतही नाही. 

 

Web Title: school matahi movie saha gun amruta subhash sunil barve