राज यांचा आवडता जेम्स बाँड 'शॉन कॉनरी'

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 1 November 2020

ऑगस्टमध्ये कॉनेरी यांनी वयाची 90 वर्षे पूर्ण केली होती. त्यांच्यानंतर आलेल्या जेम्स बाँड अभिनेत्यांनाही त्यांनी मार्गदर्शन केले. त्या दशकातल्या प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणा-या कॉनेरी यांचा चाहतावर्गही लाखोंच्या घरात होता.

मुंबई - आपल्या वक्तृत्वासाठी जसे राज ठाकरे प्रसिध्द आहेत तसेच साहित्य, संगीत, चित्रपट याविषयांवरील त्यांची रसिकताही सर्वश्रृत आहे.  जगातील अनेक उत्तमोत्तम चित्रपटांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. त्या विषयावर त्यांचे वाचनही सुरु असते. अशा साहित्य, चित्रपट, संगीताच्या क्षेत्रात मुशाफिरी करणा-या राज यांनी आपल्या आवडत्या बाँड अभिनेत्याला श्रध्दांजली वाहिली आहे. त्याबद्दलची एक पोस्ट त्यांनी नुकतीच व्टिटरवर शेयर केली आहे. 

शनिवारी जेम्स बाँड ची भूमिका करणारे अभिनेते शॉन कॉनरी यांचे निधन झाले. इयान फ्लेमिंग लिखित जेम्स बाँड  चित्रपटांतील पहिला बॉड म्हणून त्य़ांचे नाव घेतले जाते. जगभरातल्या प्रेक्षकांना त्यांच्या बाँडपटांनी वेड लावले होते. जेम्स बाँडच्या एकूण सहा चित्रपटांमध्य़े त्यांनी काम केले. त्यांना त्यांच्या अभिनयातील कौशल्याबद्दल 2000 मध्ये राणी एलिझाबेथ यांच्याकडून गौरविण्यात आले होते.

या अभिनेत्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी श्रध्दांजली वाहिली आहे. ते म्हणाले, ' 'गॉडफादर' म्हणलं की मार्लन ब्रँडो यांचाच चेहरा जसा डोळ्यासमोर येतो तसं जेम्स बॉण्ड म्हणलं की बॉन्डपटांच्या चाहत्यांना शॉन कॉनरीच आठवतात. शीतयुद्धाच्या काळात इयान फ्लेमिंग ह्यांच्या पुस्तकातील ‘जेम्स बॉण्ड’ हा लोकप्रिय होणं हे स्वाभाविक होतं पण त्या नायकाचं पुस्तकातलं अस्तित्व प्रतिमेच्या विश्वात शॉन कॉनरी ह्यांनी अधिक उत्कट केलं, ठळक केलं. 

शॉन कॉनरी यांनी ६ बॉन्डपट केले पण त्या बॉण्डपटातील जेम्स बॉण्ड त्यांनी इतका घट्ट रुजवला की त्यामुळे पुढे जेम्स बॉण्ड साकारणाऱ्या प्रत्येक नटाची दमछाक झाली. कधीही सूर्य न मावळण्याची वलग्ना करणाऱ्या ब्रिटिश साम्रज्याचा सूर्य दुसऱ्या महायुद्धानंतर मावळतीला लागला आणि अशा वेळेस जागतिक राजकारणात ब्रिटनचं महत्व उत्तरोत्तर कमी होत असताना किमान प्रतिमा पातळीवर ब्रिटन ही महासत्ता आहे हा भास कायम ठेवण्यात ‘इयान फ्लेमिंग’ यांच्या प्रतिभेतून उतरलेला आणि ‘शॉन कॉनरी’ ह्यांच्या प्रतिमेतून उभा राहिलेला ‘जेम्स बॉण्ड’ कारणीभूत आहे.

प्रतिभा आणि प्रतिमेच्या संगमाच्या जोरावर एखाद्या देशाची सॉफ्ट पॉवर निर्माण होणं आणि ती अनेक दशकं टिकणं हे जगातील दुर्मिळ उदाहरण असावं. असे राज यांनी म्हटले आहे. 

 

Image

शॉन कॉनरींना पडद्यावर पाहताना प्रेक्षकाला स्वतःच्यातल्या मर्यादा, उणिवा जाणवत राहतात पण तरीही मी पण मर्त्य माणूस आहे, सगळे लोभ, मोह हे मला पण सुटले नाहीत, हे दाखवत त्यांनी ‘जेम्स बॉन्ड’ला वास्तवाच्या जगात घट्ट रोवून उभं केलं, हे शॉन कॉनरी यांचं यश. आणि म्हणूनच आजही माझे सगळ्यात आवडते बॉण्ड नट हे शॉन कॉनरीच आहेत. शॉन कॉनरी यांच्या स्मृतीस माझी विनम्र श्रद्धांजली,” अशी भावना राज यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

ऑगस्टमध्ये कॉनेरी यांनी वयाची 90 वर्षे पूर्ण केली होती. त्यांच्यानंतर आलेल्या जेम्स बाँड अभिनेत्यांनाही त्यांनी मार्गदर्शन केले. त्या दशकातल्या प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणा-या कॉनेरी यांचा चाहतावर्गही लाखोंच्या घरात होता. 25 ऑगस्ट 1930 रोजी स्कॉटलंड मधील एडिनबर्ग येथे जन्म झालेल्या कॉनेरी यांच्या  Dr No (1962), From Russia With Love (1963), Goldfinger (1964), Thunderball (1965), You Only Live Twice (1967), Diamonds Are Forever (1971), and Never Say Never Again (1983) या सात बाँडपटातील   भूमिका अजरामर आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sean Connery My favorite james bond said Raj Thackeray