शाहरुख-आमीर-सलमान... एकाच वर्षात दाणकन आदळले! 

शनिवार, 22 डिसेंबर 2018

एक काळ असा होता, जेव्हा शाहरुख खान, आमीर खान आणि सलमान खान या तिघांच्या फक्त नावावर चित्रपट 'हिट' होत असे.. ही परिस्थिती कायम राहिलेली नाही, याचीच जाणीव 2018 या वर्षाने या तिघांना आणि त्यांच्या लक्षावधी चाहत्यांना करून दिली आहे. 

मुंबई : एक काळ असा होता, जेव्हा शाहरुख खान, आमीर खान आणि सलमान खान या तिघांच्या फक्त नावावर चित्रपट 'हिट' होत असे.. ही परिस्थिती कायम राहिलेली नाही, याचीच जाणीव 2018 या वर्षाने या तिघांना आणि त्यांच्या लक्षावधी चाहत्यांना करून दिली आहे. 

सलमान खान आणि 'सुपरहिट' हे समीकरण सुरू झालं 2009 च्या 'वॉंटेड'पासून! तेव्हापासूनच्या सलमानच्या बहुतांश चित्रपटांना बॉक्‍स ऑफिसवर दणदणीत प्रतिसाद मिळाला. 'दबंग', 'रेडी', 'बॉडीगार्ड', 'एक था टायगर', 'दबंग-2', 'बजरंगी भाईजान', 'सुलतान', 'टायगर जिंदा है' या चित्रपटांना भरभरून यश मिळाले. दरम्यानच्या काळातील 'जय हो', 'किक'ला इतर चित्रपटांइतका प्रतिसाद मिळाला नसला, तरीही त्यांची बॉक्‍स ऑफिसवरील कमाई चांगली होती. 

Shahrukh Aamir Salman

पण 2017 मध्ये आलेला 'ट्युबलाईट' आणि 2018 मध्ये आलेला 'रेस-3' या दोन्ही चित्रपटांवर सडकून टीका झाली. सलमानची जादू ओसरत चालली आहे, हे या दोन चित्रपटांच्या प्रतिसादावरून दिसून आले. 

आमीर खानने 'परफेक़्शनिस्ट' हे बिरुद मिरविताना वर्षाला फारतर एकच चित्रपट हे धोरण ठेवले. त्यामुळे अगदी 'लगान'नंतर आमीर खानने काळजीपूर्वक चित्रपटनिवड करून प्रतिमा आणि फॅन फॉलोईंग जपले. त्यामुळेच 'लगान', 'दिल चाहता है', 'रंग दे बसंती', 'फना', 'तारें जमीन पर', 'गझनी', 'थ्री इडियट्‌स', 'तलाश', 'धूम-3', 'पीके', 'दंगल' असे सुपरहिट चित्रपट दिले. यापैकी 'धूम-3'मधील त्याच्या कामगिरीवर टीका झाली असली, तरीही या चित्रपटाने भरपूर कमाई केली. पण गेल्याच महिन्यात दिवाळीच्या मुहूर्तावर झळकलेल्या 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान'ला आमीरच्या कट्टर चाहत्यांनीही नाकारले. 

'किंग खान' शाहरुखला 2013 नंतर बॉक्‍स ऑफिसवर यशाची चव चाखता आलेली नाही. रोहित शेट्टीच्या 'चेन्नई एक्‍सप्रेस'नंतरचे शाहरुखचे बहुतांश चित्रपट फ्लॉप झाले आहेत. त्यानंतर शाहरुखने 'हॅप्पी न्यू इयर', 'दिलवाले', 'फॅन', 'डिअर जिंदगी', 'रईस' आणि 'जब हॅरी मेट सेजल' हे चित्रपट केले. त्यापैकी 'फॅन'मधील त्याची दुहेरी भूमिका आणि 'डिअर जिंदगी'मधील संयमी, पोक्त भूमिकेचे कौतुक जरूर झाले; पण चित्रपटांना फारसे यश मिळाले नाही. त्यामुळे शाहरुखला 'झिरो'कडून प्रचंड आशा होत्या. पहिल्याच दिवशी समीक्षक आणि अनेक चाहत्यांच्या नकारात्मक प्रतिसादामुळे 'झिरो'ही बॉक्‍स ऑफिसवर शाहरुखच्या यशाचा दुष्काळ संपवू शकेल की नाही, याबद्दल आता शंका उपस्थित होऊ लागली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shahrukh Aamir Salman can not give blockbuster anymore