कलापूरचा कधी झालो कळलंच नाही...!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 31 May 2019

शिक्षणासाठी म्हणून कोल्हापुरात आलो आणि कलानगरीचाच होऊन गेलो. आजवर अनेक कामं केली. भविष्यातही आणखी बरेच काही करायचे आहे. संकलनामध्ये जे जे काही सर्वोत्कृष्ट करता येईल, त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहणार आहे. 
- शेखर गुरव

मी मूळचा वैभववाडीचा. त्यामुळं माध्यमिक शिक्षण कोकणातच झालं. पुढील शिक्षणासाठी कोल्हापुरात आलो आणि येथेच करिअर घडवताना कलापूरनं कसं सामावून घेतलं, हे कळलंही नाही. युवा संकलक शेखर गुरव संवाद साधत असतो आणि त्याचा सारा प्रवास उलगडत जातो. 

बारावीपर्यंत राजाराम कॉलेजला शेखरचं शिक्षण झालं. त्यानंतर फिल्ममेकिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करताना त्यानं जाणीवपूर्वक एडिटिंगवर भर दिला. सुरुवातीला निखिल ठक्कर यांच्या स्टुडिओत त्यानं जॉब केला आणि त्यानंतर अभिनेता (कै.) सागर चौगुले यांच्याबरोबर अनेक माहितीपट, लघुपट, जाहिरातींसाठीही काम केलं. आजवर तीनशेहून अधिक कॉर्पोरेट, इंडस्ट्रियल, एज्युकेशनल, राजकीय आणि सामाजिक विषयावर माहितीपटांचं संकलन त्यानं केलं आहे. शासनाच्या पर्यटन विभाग, जलसंपदा विभाग, वन विभाग तसेच महाराष्ट्र पोलिसांवरील विविध माहितीसाठी यांचे माहितीपटाच्या निर्मितीतही त्याचं योगदान मोठं राहिलं. सातशेहून अधिक जाहिराती, तीसहून अधिक लघुपटही त्यानं केलं.

‘स्पॉटलाईट’ ग्रुपतर्फे केलेल्या ‘ट्रॅफिक’ या फिल्मला अनेक बक्षिसंही मिळाली. त्याशिवाय तीन चित्रपटांना सहसंकलक म्हणूनही त्यानं यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली. त्याशिवाय विविध म्युझिक अल्बम्स, जिंगल्स, प्रमोशनल व्हिडिओज्‌, कंपनी प्रेझेंटेशन व्हिडिओज्‌च्या कामातही त्यांचा हातखंडा आहे. निखिल ठक्कर आणि सागर चौगुले यांच्यासोबत केलेल्या कामाच्या अनुभवाची शिदोरी घेऊन त्यानं स्वतःचं व्हिडिओ प्रॉडक्‍शन हाऊस सुरू केलं. ठक्कर, चौगुले यांच्यासह ऐश्वर्य मालगावे, सुरेश पाटील, दादू संकपाळ, हरिष कुलकर्णी, अरुण नाईक आदींसोबत त्यानं कामं केली. ‘अग्निदिव्य’ या नाटकाचे संगीत त्यानं केलं असून, विविध संस्थांच्या नाटक आणि एकांकिकांसाठी त्यानं तंत्रज्ञ म्हणूनही काम केलं आहे. 

शिक्षणासाठी म्हणून कोल्हापुरात आलो आणि कलानगरीचाच होऊन गेलो. आजवर अनेक कामं केली. भविष्यातही आणखी बरेच काही करायचे आहे. संकलनामध्ये जे जे काही सर्वोत्कृष्ट करता येईल, त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहणार आहे. 
- शेखर गुरव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shekhar Gurav Interview in Amhi Kolhapuri