नृत्यामुळे जगणे सुंदर... 

चिन्मयी खरे 
शनिवार, 29 एप्रिल 2017

आनंदी असलो की आपल्याला नाचावंसं वाटतं आणि नाचताना आनंद मिळतो. हा नृत्य सोहळा अनुभवण्यासाठी 29 एप्रिलला आंतराष्ट्रीय नृत्य-दिन साजरा केला जातो. यानिमित्त प्रसिद्ध डान्सर आणि कोरिओग्राफर ज्यांनी बॉलिवूड डान्समध्ये एक नवी लाट आणली; त्या शामक दावर यांच्याशी केलेली ही बातचीत - 

आनंदी असलो की आपल्याला नाचावंसं वाटतं आणि नाचताना आनंद मिळतो. हा नृत्य सोहळा अनुभवण्यासाठी 29 एप्रिलला आंतराष्ट्रीय नृत्य-दिन साजरा केला जातो. यानिमित्त प्रसिद्ध डान्सर आणि कोरिओग्राफर ज्यांनी बॉलिवूड डान्समध्ये एक नवी लाट आणली; त्या शामक दावर यांच्याशी केलेली ही बातचीत - 

डान्सर म्हणून मान मिळणं किती कठीण गेलं? 
- खरं तर आपल्या देशात पुरुष असो किंवा स्त्री; ती नृत्य करत्येय हे पचायचं नाही. स्त्रियांनाही डान्स वगैरे शिकण्याची तशी परवानगी नव्हतीच. त्यातून क्‍लासिकल असेल तर ठीक; पण वेस्टर्न डान्स फारच कमी स्त्रिया शिकायच्या. माझ्याबाबतीत फार वाईट नाही; पण सुरुवातीच्या काळात एक पुरुष डान्स करतो हे लोकांना पचायला फार अवघड गेलं. कारण आपल्या देशात पूर्वी तशीच विचारसरणी होती. पण हळूहळू परिस्थिती बदलत गेली. आता मला खूप अभिमान वाटतो की एक डान्सर म्हणून मला मान-सन्मान मिळतोय. 

हे डान्सचे वेड कसं लागलं आणि यातच करियर करायचं कसं ठरवलंत? 
- मी डान्समध्ये करियर करायचं, असं कधी ठरवलंच नव्हतं. मला कोरिओग्राफी काय असते हेसुद्धा माहीत नव्हतं. मला फक्त लोक डान्स कोरिओग्राफी करतात हे माहीत होतं. पण माझ्या आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट ठरला तो म्हणजे मी जेव्हा एका क्‍लासला गेलो, तिथे मी डान्सचे, अभिनयाचे, आवाजाचे वर्कशॉप्स केले. तेव्हा मला कळलं की कोरिओग्राफी काय असते. मी त्या गोष्टी पाहिल्या आणि केल्या, कोरिओग्राफीही केली. मला ते सगळं आवडू लागलं. मी पहिल्यांदा फ्रीस्टाईल कोरिओग्राफी केली होती. त्यानंतर मी भारतात आलो आणि डान्स शिकवायला सुरुवात केली. मला अनेक लोकांनी नाकारलंही. पण त्या गोष्टीचा मला फायदा झाला. कारण आता मला माहीत आहे की नाकारलं जाणं म्हणजे काय असतं. त्यामुळे मी लोकांना आता मदत करतो आणि ज्यांनी मला नाकारलं होतं त्यांना आता माझा डान्स आवडतोय. 

तुम्ही कोणते डान्स फॉर्म शिकला आहात? 
- मी जॅज, हिपहॉप, कंटेपररी हे नृत्यप्रकार शिकलो आहे. पण आता सध्या मी माझ्या स्वत:च्या स्टाईलकडे जास्त लक्ष देतोय. मी माझी एक वेगळी स्टाईल निर्माण केली आहे "शामक स्टाईल' या नावाने ती ओळखली जाते. गेली 15 वर्षं ही स्टाईल खूप प्रसिद्ध झालीय. "शामक स्टाईल' हे नावच पडलं. कारण लोक चित्रपटात डान्स पाहून म्हणायचे की, हा शामकचाच डान्स असेल. आम्हाला शामकचा डान्स आवडतो. अशा तऱ्हेने ही वेगळी स्टाईल मी निर्माण केली. या स्टाईलमध्ये मी एवढी वर्षं जे शिकलो आहे त्या सगळ्याचे मिश्रण आहे. यात तुम्हाला जास्त भारतीय स्टेप्स, लोकनृत्यातील काही स्टेप्स, कंटेपररी, जॅज या सगळ्या स्टाईल्सचं मिश्रण पाहायला मिळेल. पण या सगळ्यात "मी' हा फॅक्‍टर महत्त्वाचा आहे. मी केलेली कोरिओग्राफी ही वेगळ्या प्रकारची असून लोकांना ओळखता येते. पण माझ्या आयुष्यात मला एक खंत आहे की, मी भारतीय शास्त्रीय नृत्य शिकलो नाही. पण मी नृत्यातील अनेक दिग्गजांबरोबर काम केलंय. त्यामुळे त्यांच्यापासून मला प्रेरणा मिळते, मी त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकतो आणि ते सर्व शिकून मी माझं वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे. 

आजकालच्या भारतीय तरिणांना पाश्‍चात्त्य नृत्यप्रकारांची जास्त क्रेज आहे. तुमचा अनुभव काय सांगतो? 
- माझ्यासाठी डान्स हा डान्स आहे. मग तो कोणत्याही प्रकारचा का असेना. भारत तर नृत्यासाठी एक खूप मोठं व्यासपीठ आहे. भारतात संगीत आणि नृत्य या दोन प्रमुख कला मानल्या जातात. भारतात तुम्ही कुठेही बघा, कोणत्याही आनंदाच्या प्रसंगी नृत्य केलं जातं. त्यामुळे इथे कोणताही डान्सफॉर्म हा नेहमीच स्वागतार्ह आहे. मला असं वाटतं की सगळे नृत्यप्रकार हे देवाचं देणं आहे आणि आपण त्याचा मान ठेवला पाहिजे. 

लोकांनी नृत्य का शिकायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? 
- डान्स ही एक थेरपी आहे, असं मला वाटतं. माझ्या क्‍लासमध्ये अशी अनेक मुलं येतात; ज्यांना खूप समस्या आहेत. ते माझ्या क्‍लासमध्ये येऊन खूप सुधारतात. त्यांच्यामध्ये स्वत:बद्दल एक आत्मविश्‍वास निर्माण होतो. जी मुलं व्यसनांच्या आहारी गेली आहेत ती मुलंसुद्धा डान्समुळे सुधारलेली मी पाहिली आहेत. डान्समुळे त्यांना ती सगळी व्यसनं सोडायची प्रेरणा मिळते. डान्स हे तणावमुक्ती करण्याचं एक माध्यम आहे. आम्ही अशा व्यसनांच्या आहारी गेलेल्या मुलांना शोधतो आणि त्यांना डान्स शिकवतो. डान्स आयुष्यातला आनंद मिळवून देणारी एक उत्तम थेरपी आहे. त्यामुळे लोकांनी कोणता ना कोणता नृत्यप्रकार जरूर शिकावा, असं मला वाटतं. 

Web Title: shiamak davar interview