लघुपटाद्वारे उलगडणार कुसुमाग्रजांचे साहित्य-सामाजिक विश्व!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

कुसुमाग्रज यांच्या साहित्य, सामाजिक, नाटक या तिन्ही अंगांचा वेध या लघुपटात घेण्यात येणार आहे. या लघुपटातील नाटकांच्या प्रवेशांचे चित्रिकरण बुधवारी यशवंत नाट्यमंदिर येथे पार पाडले. 

मुंबई : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचे कार्य भावी पिढीला ज्ञात व्हावे या करिता कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक व राज्य सांस्कृतिका कार्य विभाग यांच्या संयुक्त विभागाच्या वतीने लघुपटाची निर्मिती केली आहे. कुसुमाग्रज यांच्या साहित्य, सामाजिक, नाटक या तिन्ही अंगांचा वेध या लघुपटात घेण्यात येणार आहे. या लघुपटातील नाटकांच्या प्रवेशांचे चित्रिकरण बुधवारी यशवंत नाट्यमंदिर येथे पार पाडले. 

सुप्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी या लघुपटाचे दिग्दर्शन करत आहे. हा लघुपट नाशिक येथील कुसुमाग्रज स्मारक येथील जीनव दर्शन दालनात सादर करण्यात येणार आहे, या वर्षीच्या अखेरपर्यंत या लघुपटाचे काम पूर्ण होईल, असे कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे सल्लागार सदस्य विलास लोणारे यांनी सांगितले. ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, ज्येष्ठ प्रकाशक रामदास भटकळ, ज्येष्ठ साहित्यिका अरुणा ढेरे यांच्या प्रकट मुलाखती या लघुपटात आहेत. तसेच कुसुमाग्रज यांच्या कविता ज्येष्ठ साहित्यिक  व कलाकार या लघुपटामध्ये सादर करणार आहेत. पहिल्यांदाच कुसुमाग्रज यांचे समाजिक कार्य या लघुपटातून लोकांसमोर येईल.

कुसुमाग्रज लिखित ययाती, वीज म्हणाली धरतीला,  कौंतेय, देवयानी, मी मुख्यमंत्री, दूरचे दिवे या नाटकांतील काही प्रवेश या लघुपटात सादर करण्यात येत आहे. यातील देवायानी नाटकाचा प्रवेश अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि गिरिजा ओक यांनी सादर केला आहे. यामध्ये गिरिजा यांनी पहिल्यांदाच स्वतःच्या आवाजात गाणे म्हटले आहे. कौंतेयमधील प्रवेशामध्ये कर्णाची भूमिका प्रसाद ओक तर कुंतीची भूमिका अभिनेत्री प्रतिक्षा लोणकर यांनी साकारली आहे. दूरचे दिवेमध्ये अभिनेता सुनील बर्वे, समिधा गुरव, वीज म्हणाली धरतीलामध्ये राजश्री ठाकूर, आनंद जोशी व मी मुख्यमंत्रीमध्ये सुबोध भावे भूमिका करत आहेत. या सर्व नाट्य प्रवेशांचे चित्रिकरण यशवंत नाट्यमंदिक येथे पार पडले. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, मधु मंगेश कर्णिक, कुसुमाग्रज स्मारक समितीचे अध्यक्ष हेमंत टकले, सल्लागार लोकेश शेवडे उपस्थित होते.

समग्र शिरवाडकर या लघुपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. प्रशांत दळवी आणि प्रतिष्ठानच्या टीमने खूप संशोधन करुन या लघुपटासाठी पटकथा तयार केली. कुसुमाग्रज यांची शाळा, कॉलेज, घर, नाशिकचा सहवास, साहित्य, सामाजिक कार्य या सर्वांचा वेध लघुपटात घेण्यात येत आहे. ही सर्व प्रक्रिया प्रदीर्घ आहे. अभ्यास पूर्ण हे काम करावे लागणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.
- चंद्रकांत कुलकर्णी, दिग्दर्शक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Short film on Kusumagraj V V Shirwadkar