श्रीदेवीसमोर भरणार इंग्लिश विंग्लिशचा अवखळ क्लास

टीम इ सकाळ
गुरुवार, 29 जून 2017

झी मराठीवरील चला हवा येऊ द्या च्या मंचावर बॉलीवुडची हवा हवाई गर्ल अवतरणार आहे. आपल्या आगामी मॉम चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी श्रीदेवीने थुकरटवाडीची वाट धरली होती. यावेळी तिच्या सोबत तिचे पती आणि या चित्रपटाचे निर्माते बोनी कपूर आणि सहअभिनेता नवाझुद्दिन सिद्दीकी हे सुद्धा उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी श्रीदेवी खास मराठमोळ्या अवतरात म्हणजे नऊवारी साडीत आली होती. येत्या सोमवारी आणि मंगळवारी म्हणजेच ३ आणि ४ जुलैला रात्री ९.३० वा. हे दोन्ही भाग प्रसारित होणार आहेत.

मुंबई : झी मराठीवरील चला हवा येऊ द्या च्या मंचावर बॉलीवुडची हवा हवाई गर्ल अवतरणार आहे. आपल्या आगामी मॉम चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी श्रीदेवीने थुकरटवाडीची वाट धरली होती. यावेळी तिच्या सोबत तिचे पती आणि या चित्रपटाचे निर्माते बोनी कपूर आणि सहअभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी हे सुद्धा उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी श्रीदेवी खास मराठमोळ्या अवतरात म्हणजे नऊवारी साडीत आली होती. येत्या सोमवारी आणि मंगळवारी म्हणजेच ३ आणि ४ जुलैला रात्री ९.३० वा. हे दोन्ही भाग प्रसारित होणार आहेत.

ऐंशी आणि नव्वदचं दशक ज्या अभिनेत्रींनी गाजवलं त्यात अग्रस्थानी असणारं नाव म्हणजे श्रीदेवी. सदमा, चांदनीमधील संवेदनशील भूमिका असो की चालबाजमधील बिनधास्त भूमिका या तेवढ्याच सक्षमपणे सांभाळणारी अभिनेत्री अशी तिची ओळख. लग्नानंतर काही काळ अभिनयापासून दुर गेलेल्या श्रीदेवीने दोन वर्षांपूर्वी आलेल्या इंग्लीश विंग्लीश चित्रपटातून सिनेसृष्टीत पुनरागमन केलं आणि आता मॉम या चित्रपटातून ती परत एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या निमित्ताने श्रीदेवी चला हवा येऊ द्या च्या मंचावर आली होती. यावेळी थुकरटवाडीच्या मंडळीने सादर केलेल्या नागिन चित्रपटाच्या स्किटवर श्रीदेवीने खळखळून हसत दाद दिली. याशिवाय इंग्लीश विंग्लीश सारखा मराठी बिराठीचा क्लासही या मंचावर भरविण्यात आला आणि त्यानेही उपस्थितांना खळखळून हसविले.

यावेळी नवाझुद्दीन सिद्दीकीचा मराठीचा आगळा वेगळा वर्ग घेण्यात आला ज्यात त्यानेही धम्माल उडवून दिली. याशिवाय पोस्टमन काकाने एका पत्रातून एका मुलीच्या आपल्या आईप्रतीच्या भावना वाचून दाखवल्या आणि ते ऐकून श्रीदेवीही हळवी झाली. प्रेक्षकांना ही सगळी धमाल येत्या सोमवारी आणि मंगळवारी प्रसारित होणा-या भागांत बघायला मिळणार आहे.

Web Title: shridevi in CHYD