'शुभ लग्न सावधान'चा पार पडला ट्रेलर सोहळा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 सप्टेंबर 2018

दादर येथे पार पडलेल्या या दिमाखदार ट्रेलर सोहळ्याचा उपस्थितांनी मनमुराद आस्वाद घेतला. सुबोध भावे आणि श्रुती मराठे यांची मध्यवर्ती भूमिका असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर 'लग्न' या विषयावर फिरतो. लग्नाबद्दलचे विविध लोकांचे मतमतांतरे यात आपल्याला पाहायला मिळतात.

अगदी एका उत्सवाप्रमाणे साजरा होत असलेल्या या लग्नसोहळ्यावर आधारित 'शुभ लग्न सावधान' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पल्लवी विनय जोशी निर्मित आणि समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित येत्या 12 ऑक्टोबरला प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला.

दादर येथे पार पडलेल्या या दिमाखदार ट्रेलर सोहळ्याचा उपस्थितांनी मनमुराद आस्वाद घेतला. सुबोध भावे आणि श्रुती मराठे यांची मध्यवर्ती भूमिका असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर 'लग्न' या विषयावर फिरतो. लग्नाबद्दलचे विविध लोकांचे मतमतांतरे यात आपल्याला पाहायला मिळतात. शिवाय, ट्रेलरच्या सुरवातीलाच एक ख्रिश्चनधर्मीय लग्नदेखील यात आपणास दिसून येत आहे. तसेच, लग्नापासून दूर पळत असलेल्या नायकाची प्रेमाबद्दलची परिभाषादेखील यात पाहायला मिळते. एकंदरीतच, हा ट्रेलर पाहताना, 'शुभ लग्न सावधान' हा सिनेमा संपूर्णतः कौटुंबिक मनोरंजक चित्रपट असल्याची जाणीव होते.

shubha lagna savdhan

डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत, विद्याधर जोशी, किशोरी आंबिये, किशोर प्रधान, प्रतीक देशमुख, रेवती लिमये, सतीश सलागरे, प्राची नील अशी कलाकारांची मोठी फळी या सिनेमात आपल्याला बघायला मिळणार आहे. विवाहोत्सुकांना आपलासा करणारा हा सिनेमा, कार्यकारी निर्माते अभय शेवडे यांच्या संकल्पनेतून आकारास आला आहे. तसेच या सिनेमास तृप्ती पुराणिक व त्यांच्या स्टुडियो एलिमेंटस्ने निर्मिती सहाय्य केले आहे. सहनिर्मात्यांची धुरा अरुंधती दाते, श्रीनिवास जांभेकर, विद्या संदीप तुंगारे आणि तुषार कर्णिक यांनी सांभाळली आहे. नवरात्रीच्या धामधुमीत संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असलेला 'शुभ लग्न सावधान' हा चित्रपट कुटुंबियांसोबत पाहायला जाण्यास प्रेक्षकदेखील नक्कीच आतुर झाले असतील, हे निश्चित !


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shubha lagna savdhan trailer launched program