प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांची प्रकृती गंभीर, दोन्ही किडन्या...| Shyam Benegal | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shyam Benegal

Shyam Benegal : प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांची प्रकृती गंभीर, दोन्ही किडन्या...

Shyam Benegal bollywood director Kidneys fail 88 years : भारतीय चित्रपट विश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या प्रकृती अस्वास्थ्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक असून आता त्यांना डायलिसीसवर ठेवण्यात आले आहे. त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

आपल्या वेगळ्या धाटणीच्या दिग्दर्शनासाठी ओळखल्या गेलेल्या श्याम बेनेगल यांची ओळख काही भारतापुरती सीमित नाही. तर जगभरातील विविध मानाच्या चित्रपट महोत्सवांमध्ये त्यांचे चित्रपट दाखवले गेले आहेत. भारतामध्ये ज्या दिग्दर्शकांनी समांतर चित्रपटाची चळवळ सुरु केली त्यामध्ये श्याम बेनेगल यांचे नाव आघाडीनं घ्यावे लागेल. चित्रपट हाच ध्यास आणि चित्रपट हाच श्वास या ध्येयानं श्याम बेनेगल यांनी या क्षेत्रामध्ये आपल्या नावाचा वेगळा ठसा उमटविला आहे.

Also Read - नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

केवळ चित्रपटच नाहीतर भारत एक खोज सारखी मालिका असो किंवा संविधानाच्या निर्मितीवर तयार केलेला माहितीपट असो या सगळ्याला अभ्यासकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. जगभरातील चित्रपट विषयक अभ्यासक्रम शिकवणाऱ्या संस्थांमध्ये श्याम बेनेगल यांचे नाव अगत्यानं घेतले जाते. तिथे त्यांचे चित्रपट अभ्यासक्रमाचा भाग आहेत.

बेनेगल यांच्या प्रकृती अस्वास्थ्याविषयी ऐकताच अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. सध्या डॉक्टरांनी त्यांना सक्त विश्रांतीचा सल्ला दिला आहे. वयाच्या ८८ व्या वर्षी देखील बेनेगल हे कार्यरत असल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना किडनीच्या विकारानं त्रस्त केले आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळल्याचे सांगण्यात आले आहे.

बेनेगल यांच्या प्रकृतीबाबत दैनिक भास्करनं दिलेल्या माहितीनुसार, सध्या बेनेगल यांच्यावर राहत्या घरीच उपचार सुरु आहेत. बेनेगल यांच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास, त्यांचा मुजीब - द मेकिंग ऑफ ए नेशन हा चित्रपट शेख मुजीबुर्रहमान यांच्या आयुष्यावर आधारित आहे. त्याचे पोस्टर काही दिवसांपूर्वी व्हायरल करण्यात आले आहे.