esakal | आशालता वाबगावकर यांचा गायिका ते नायिका एक यशस्वी जीवनप्रवास
sakal

बोलून बातमी शोधा

ashalata wabgaonkar

अभिनेत्री आशालता वाबगावकर यांनी पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे गाण्याचे प्राथमिक शिक्षण घेतले. ते घेत असताना आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर त्यांनी काही कोंकणी गाणीही गायली. त्याशिवाय आशालता कल्याणजी-आनंदजी यांच्या वाद्यवृंदातून त्या मुख्य गायिका होत्या.

आशालता वाबगावकर यांचा गायिका ते नायिका एक यशस्वी जीवनप्रवास

sakal_logo
By
संतोष भिंगार्डे

मुंबई- ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचा जन्म २ जुलै १९४१ चा. त्या मूळच्या गोव्याच्या. मुंबईतच त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण झाले. गिरगावातील ‘सेंट कोलंबो हायस्कूल’ ही त्यांची शाळा. तेव्हाच्या अकरावी मॅट्रिकनंतर त्यांनी काही काळ मंत्रालयात नोकरीही केली. त्याच वेळी नोकरी सांभाळून कला शाखेतून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले. ‘नाथीबाई दामोदर ठाकरसी’ महिला विद्यापीठातून त्यांनी ‘मानसशास्त्र’ विषयात ‘एमए’ केले.  

हे ही वाचा: सुशांतने मृत्युच्या ५ दिवस आधी बहीण मितूला केला होता SOS कॉल, म्हणाला 'ते लोक मला मारुन टाकतील'    

पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे गाण्याचे प्राथमिक शिक्षण घेतले. ते घेत असताना आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर त्यांनी काही कोंकणी गाणीही गायली. त्याशिवाय आशालता कल्याणजी-आनंदजी यांच्या वाद्यवृंदातून त्या मुख्य गायिका होत्या. मुकेश, हेमंतकुमार आदींबरोबर त्यांनी गाणी गायली आहेत. त्यांच्या  घरी नाट्य, संगीत कला असे कोणतेही वातावरण नव्हते. त्यामुळे आधी शिक्षण पूर्ण कर आणि मग तुझी कला जोपास असे त्यांना घरून सांगण्यात आले होते. शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी करत असतानाच नाटकात काम करायची संधी मिळाली. 

‘धी गोवा हिंदू असोसिएशन’ने राज्य नाटय़ स्पर्धेसाठी ‘संगीत संशयकल्लोळ’ या नाटकातील ‘रेवती’च्या भूमिकेसाठी त्यांची  निवड केली. पुढे त्यांनी ‘धी गोवा’चीच ‘संगीत शारदा’ आणि ‘संगीत मृच्छकटीक’ ही दोन नाटके राज्य नाटय़ स्पर्धेसाठी केली आणि ते करत असतानाच त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली. त्यानंतर आशालता वाबगावकर यांनी केलेले ‘मत्स्यगंधा’ हे संगीत नाटक त्यांच्या आयुष्यातील दिशा बदलणारे ठरले. या नाटकात त्यांनी गायलेली ‘गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफेकळी’, ‘अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा’ ही नाट्यपदे खूप गाजली. मत्स्यगंधा नंतर त्यांनी नाटक पूर्णवेळ करायचे असे ठरवून नोकरी सोडली.

पुढे ‘धी गोवा हिंदू असोसिएशन’, ‘चंद्रलेखा’, ‘मुंबई मराठी साहित्य संघ’, ‘माऊली प्रॉडक्शन’, ‘कलामंदिर’, ‘आयएनटी’ आदी नाटय़संस्थांमधून त्यांनी कामे केली, आजवर पन्नासहून अधिक नाटके त्यांनी केली. या सर्व नाटकांचे मिळून पाच हजारांहून अधिक प्रयोग त्यांनी केले. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘मदनाची मंजिरी’, ‘गारंबीचा बापू’, ‘गुडबाय डॉक्टर’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘स्वामी’, ‘गरुडझेप’, ‘तुज आहे तुजपाशी’, ‘हे बंध रेशमाचे’, ‘विदूषक’, ‘ही गोष्ट जन्मांतरीची’, ‘भावबंधन’, ‘गुंतता हृदय हे’, ‘छिन्न’, ‘देखणी बायको दुसऱ्याची’ ही त्यांची काही गाजलेली नाटके. पु. ल. देशपांडे यांनी दूरदर्शनसाठी केलेल्या ‘वाऱ्यावरची वरात’मध्येही त्यांनी महत्वाची भूमिका साकारली.  ‘सावित्री’, ‘उंबरठा’, ‘पुढचं पाऊल’, ‘माहेरची साडी’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘एकापेक्षा एक’, ‘आत्मविश्वास’ आणि अन्य अशा अनेक मराठी चित्रपटाही त्यांनी काम केले आहे.मराठी नाटक आणि चित्रपटांबरोबरच त्यांनी हिंदी चित्रपटाचा पडदाही गाजविला.

दोनशेहून अधिक हिंदी चित्रपटांत त्यांनी काम केले आहे. बासू चॅटर्जी यांचा ‘अपने पराये’ हा त्यांचा पहिला चित्रपट.  ‘अपने पराये’ या चित्रपटानंतर आशालता यांची हिंदीतील कारकीर्द सुरू झाली. पुढे ‘अंकुश’, अग्निसाक्षी’, ‘नमक हलाल’, ‘शराबी’, ‘कुली’, ‘निकाह’, ‘चलते चलते’, तवायफ, ‘आज की आवाज’, ‘वो सात दिन’, ‘पसंद अपनी अपनी’, ‘मंगल पांडे’, दिल ए नादान, ‘ये तो कमाल हो गया’, ‘तेरी मॉंग सितारोंसे भर दू’, ‘मरते दम तक’, ‘घायल’ ‘शौकिन’ आदी सुमारे २०० हून अधिक हिंदी व मराठी चित्रपटांत त्यांनी काम केले आहे. तसेच तीन कोंकणी आणि एका इंग्रजी चित्रपटातही त्यांनी काम केले आहे. याचप्रमाणे त्यांच्या ‘महाश्वेता’, ‘पाषाणपती’ तसेच ‘जावई विकत घेणे’, ‘कुलवधू’ या काही गाजलेल्या मालिका आहेत. 

संपादन- दिपाली राणे-म्हात्रे  

singer to actress life journey of late ashalata wabgaonkar  
 

loading image