छोट्या पडद्यावरही येतील महामालिका! 

small screen maha episode
small screen maha episode

भारतात जेव्हा खासगी वाहिन्या नव्यानं सुरू झाल्या, तेव्हा भारतात मालिकांची निर्मिती सुरू व्हायला अवकाश लागेल आणि तोवर परदेशी चॅनेलवरच्या मालिकाच डब करून दाखवल्या जातील, असं समजलं जात होतं; पण अपेक्षेहून कमी वेळात मालिकांची निर्मिती सुरू झाली. मोठ्या पडद्याला समांतर अशी छोट्या पडद्याची इंडस्ट्री निर्माण झाली. आता चलती सुरू होऊ पाहातेय ती अतिछोट्या पडद्याची. खास या पडद्यासाठी असलेल्या वेबसीरिज आपल्याकडे नुक्‍त्या कुठे सुरू होऊ पाहताहेत... पण परिस्थिती अशी आहे की इथेही महामालिका येऊ शकतात. 


छोट्या पडद्यावर प्राईम टाईमला मालिकांची प्रचंड गर्दी आहे; पण या मालिकांमध्ये अनेकदा तोचतोचपणा फार असतो. अनेकांनी "हटके' मालिका निर्मितीच्या प्रयत्नात "फटके' खाल्ले आहेत. कारण त्यांच्या विषय हाताळणीवर अनेक बंधनं येतात. त्यामुळेच की काय, त्याच सास-बहू ड्राम्यातून या मालिकांना मोकळा श्‍वास घेणेही जमत नाही. 
छोट्या पडद्यावरच्या मालिका पाहायच्या तर त्यांची वेळ गाठावी लागते. त्यामुळे या मालिका मोबाईलवर, इंटरनेटवर उपलब्ध करून देण्याचा पर्याय शोधण्यात आला. अनेक वाहिन्या मोबाईलवर उपलब्ध होऊ लागल्या असल्या, तरी मोठ्या टीव्हीवर दिसणार तेच या अतिछोट्या पडद्यावर दाखवण्यापेक्षा वेगळं काही देण्याचं प्रयत्न होऊ लागले आणि वेबसीरिज जन्माला आल्या. (अर्थात मालिकाही होत्या आणि आहेतच; पण त्यांची वेळ तुमच्या सोईची... कधीही कोठेही!) 
अर्थातच, हे प्रकरण आपल्याकडे आता आता येऊ लागलेय. परदेशात त्या आधीच आल्यात लोकप्रियही झाल्यात. भारतातल्या इंटरनेटसॅव्ही तरुण पिढीने त्या उचलूनही धरल्यात. 
गेल्या वर्षभरात भारतात अनेक वेब सीरिज आल्यात. या सर्व वेब सीरिजनी अगदी लिव्ह इन रिलेशनशिपपासून ते हिपहॉपपर्यंत अनेक विषय हाताळले. या वेब सीरिजना मिळणारा प्रतिसाद पाहून अनेक निर्मात्यांना भारतीय तरुण पिढीला नेमकं काय हवं आहे? हे गणित समजलं (असं वाटतंय!) आणि आता अनेक नवीन वेब सीरिज सुरू होत आहेत. 
जुन्या वेब सीरिज मधल्या तरुणांना आवडलेली वेब सीरिज म्हणजे "पर्मनंट रूममेट'. ही एक लव्ह स्टोरी आहे; पण थोडी वेगळीच. "लव बाईट्‌स' ही पण अशीच एक लव्ह स्टोरी आहे; ज्यामध्ये एक जोडपं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहे. समाजाचा एका लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्याविषयीचा दृष्टिकोन दाखवतो आणि त्याबद्दल प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतात. "बॅंग बाजा बारात' ही अशी एक वेब सीरिज आहे, ज्यामध्ये दोन वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे दोघे प्रेमात पडल्यानंतर लग्न करायचा विचार करतात; पण खरी गंमत घडते ती त्यांचे पालक एकमेकांना भेटतात तेव्हा. ही कथा वरवर "2 स्टेट्‌स' या चित्रपटाच्या कथेसारखी वाटली तरी हाताळणीची पद्धत वेगळी आहे. अर्थात, वेब सीरिज आणि चित्रपट या दोन वेगवेगळ्या माध्यमांचा फरक आहेच. "गर्ल इन अ सिटी' या वेब सीरिजचा विषयही वेगळा आहे. डेहराडूनसारख्या शहरात राहणारी मुलगी फॅशन डिझायनिंगसाठी मुंबईत येते. मुंबईचा वडापावही माहीत नसलेली ही मिरा मुंबईत हळूहळू कशी रूळते आणि शहराच्या प्रेमात पडते, ही कथा अगदी सोप्या मांडणीत आहे. "बेक्‍ड' अशी एक वेब सीरिज आहे, ज्यामध्ये दिल्ली विद्यापीठातील चार जण स्वत:चं हॉटेल सुरू करण्याचं ठरवतात आणि प्रत्येक वेळी स्वत:ला कोणत्यातरी संकटात पाडून घेतात. त्यांचा हा स्ट्रगल "बेक्‍ड' या वेब सीरिजमध्ये दाखविला आहे, तर "पिचर' या वेब सीरिजमध्ये दाखविण्यात आलाय आपल्या नोकरीला कंटाळलेल्या चार मित्रांचा प्रवास. चौघे स्वत:चा बिझनेस चालू करायचे ठरवतात आणि त्यांच्या आयुष्यात काय बदल घडतात? कसे ते प्रत्येक परिस्थितीला सामोरे जातात? हे या वेब सीरिजमध्ये दाखविले आहे. 
विक्रम भट्ट यांची "माया' ही वेब सीरिज तर सुरू होऊन अनेक दिवस झाले असूनही प्रेक्षकांना आवडतं आहे. या विषयासारखा विषय खरंतर हाताळणं फारच अवघड होतं; परंतु विक्रम भट्ट यांनी ते सोपं करून दाखविलं आहे. 
याचप्रमाणे "आय-डोन्ट वॉच टीव्ही' ही ग्लॅमरस दुनियेमागची कथा सांगणारी, तर "हिप हॉप होमलॅंड' ही माहितीपटासारखी हिपहॉपचं वाढतं विश्‍व सगळ्यांसमोर आणणारी वेब सीरिज आहे. "ऑल अबाऊट सेक्‍शन 377' ही एलजीबीटी राईट्‌स संदर्भातील वेब सीरिज आहे. "आयशा, माय व्हर्च्युअल गर्लफ्रेंड', "हॅप्पी टू बी सिंगल', "आलिशा', "चायनिज भसड' यांसारखे वेगळे विषय हाताळणाऱ्या वेब सीरिज आहेत. 
तरुणांना आवडतील, अशा विविध प्रकारच्या वेब सीरिज सध्या आपल्याला दिसत आहेत. येत्या वर्षात प्रेक्षकांना वेब सीरिजची मेजवानीच मिळणार आहे. वायआरएफ फिल्मस्‌कडून निर्मिती होत असलेली "डर 2.0' ही वेब सीरिज "डर' या शाहरूख खानच्या चित्रपटातील पात्रे पुन्हा जिवंत करणार आहे. ही पाच भागांची सीरिज असणार आहे. "मेड इन हेवेन' ही वेगळ्याच विषयावर असणारी वेब सीरिज झोया अख्तर आणि रीमा काटगी टायगर बेबी प्रोडक्‍शनच्या बॅनरखाली घेऊन येत आहेत. वेडिंग प्लॅनर्सच्या आयुष्यातील कथा या वेब सीरिजमध्ये दाखविण्यात येणार आहे. एकता कपूरच्या बालाजी बॅनरखाली (अल्ट बालाजी) अनेक वेब सीरिज येत आहेत, त्यामध्ये "करले तू भी महोब्बत' ही राम कपूर आणि साक्षी तन्वर या हीट जोडीला घेऊन बनवलेली लव्ह स्टोरी आहे. एका वेब सीरिजमध्ये "एअरलिफ्ट' फेम निमरत कौर आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. अजूनही या वेब सीरिजचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. "रोमिल- जुगल' ही एक वेगळीच प्रेमकथा दाखवणारी लव्ह स्टोरी शेक्‍सपिअरच्या रोमिओ-जुलिएटवर आधारित आहे; पण यात विशेष म्हणजे एक पंजाबी मुलगा आणि एक तमिळ ब्राह्मण मुलगा यांची लव्ह स्टोरी दाखविण्यात येणार आहे. "डेव डीडी' या वेब सीरिजमध्ये एक हटके प्रयोग म्हणजे एका देवदास मुलीची कथा दाखविण्यात येणार आहे. तिच्या लव्ह लाईफभोवती ही कथा फिरणार आहे. त्याचप्रमाणे राजकुमार राव सुभाषचंद्र बोसांची भूमिका करत असलेली एक वेब सीरिज येणार आहे. अद्याप त्याचे नाव जाहीर झालेले नाही. आणखी "वन्स अपॉन नाईट व्हेन दे मेट', "ब्रो कोर्ट', "अनटॅग' अशा काही नवीन वेब सीरिज 2017 या वर्षात येऊ घातल्या आहेत. 
या वेब सीरिज अगदी सहज उपलब्ध होत असल्यानं तरुणांचा त्यांना उत्तम प्रतिसाद लाभतो. ते पाहून अनेक निर्मिती कंपन्यांनी आपला मोर्चा डिजिटल प्लॅटफॉर्मकडे वळवला आहे. सध्यातरी या वेब सीरिज अगदी लिमिडेट भागांच्या असतात, त्यामुळे टीव्ही मालिकांसारखी लांबण लावलेली नसल्याने विषय हा जेवढ्यास तेवढा राहून मनोरंजनही होतंय आणि योग्य प्रकारे लोकांसमोर तो मांडलाही जातोय. टीव्ही मालिकांसारखा तो भरकटत जात नाही. 
हळूहळू या वेब सीरिजचे प्रस्थ वाढत आहे. काही वेब सीरिजची लांबी वाढतं आहे, त्यामुळे उद्या कदाचित वेब सीरिजमध्येही महामालिका आल्यास आश्‍चर्य वाटायला नको. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com