सोनम कपूरचा वैतागून ट्विटरला बाय बाय !

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 ऑक्टोबर 2018

सोनमने काही दिवसांपूर्वी मुंबईतील रस्त्यांबाबत एक पोस्ट लिहीली होती. या पोस्टवरुन तिला सोशल मिडीयावर ट्रोल करण्यात आलं होतं.

अभिनेत्री सोनम कपूर हिने वैतागून ट्विटरपासून जरा लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. 'काही काळासाठी मी माझे ट्विटर अकाउंट बंद करत आहे. इथे खूप जास्त नकारात्मकता आहे.' असं ट्विट सोनमने शनिवारी केलं. 
 

सोनमने काही दिवसांपूर्वी मुंबईतील रस्त्यांबाबत एक पोस्ट लिहीली होती. या पोस्टवरुन तिला सोशल मिडीयावर ट्रोल करण्यात आलं होतं. तिने पोस्टमध्ये लिहीलं होतं, 'मला शहरात पोहोचायला दोन तास लागले. अजूनही मी पोहोचले नाही. रस्ते खराब आहेत आणि प्रदुषणसुध्दा वाढलं आहे. घरातून बाहेर पडणं म्हणजे एखाद्या वाईट स्वप्नासारखं आहे.' 

सोनमच्या या पोस्टवर अनंत वासू नामक एका युजरने सोनमला सुनावणारी प्रतिक्रिया दिली. 'तुमच्यासारखे लोक सार्वजनिक वाहनांचा किंवा कमी इंधन लागणाऱ्या गाड्यांचा वापर करत नाही. तुझ्या आलिशान गाड्या केवळ 3 ते 4 किमी प्रतिलीटर मायलेज देतात हे तुला माहित आहे का? तुझ्या घरातील 10 ते 12 एसीसुद्धा जागतिक तापमानवाढीसाठी जबाबदार आहेत. त्यामुळे सर्वांत आधी तू तुझ्यापासून होणारं प्रदूषण कमी कर.’ असा सल्ला त्या युजरने दिला होता.
 

अनंत वासू च्या कमेंटने सोनम भडकली आणि त्याच्या या कमेंटला तिने उत्तर दिले, 'तुझ्यासारख्या पुरुषांमुळे महिला सार्वजनिक वाहनांचा वापर करण्यास घाबरतात. कारण त्यांना छेडछाडीची भीती असते.'  
 

सोनमने दिलेल्या या उत्तरावर वासू यांनी तिला कोर्टात खेचण्याची धमकी दिली आहे. 'तुझ्या या वक्तव्याविरोधात मी तुला कोर्टातही खेचू शकतो. कारण मला देशाच्या संविधानावर पूर्ण विश्वास आहे.' अशा शब्दात वासूने सोनमला खडसावलं.
 

नेटकऱ्यांनीही यावरुन सोनमला चांगलच ट्रोल केलं आहे. काळवीट शिकारप्रकरणी सलमान खानची पाठराखण करणारं ट्विट केल्यावरुनही नेटकऱ्यांनी सोनमला धारेवर घेतलं होतं. वारंवार होणाऱ्या ट्रोलिंगला वैतागून सोनमने अखेर काही दिवस ट्विटरला बाय बाय करण्याचा निर्णय घेतला आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sonam kapoor quits twitter because of trolling