'इंतजार' चांगल्या भूमिकेचा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 मे 2017

"बुनियाद' या लोकप्रिय दूरदर्शन मालिकेनंतर "लव का है इंतजार' या मालिकेतून प्रथमच महत्त्वाच्या भूमिकेत पदार्पण करणाऱ्या सोनी राझदान यांच्याशी साधलेला हा संवाद- 

"बुनियाद' या लोकप्रिय दूरदर्शन मालिकेनंतर "लव का है इंतजार' या मालिकेतून प्रथमच महत्त्वाच्या भूमिकेत पदार्पण करणाऱ्या सोनी राझदान यांच्याशी साधलेला हा संवाद- 

"लव का है इंतजार' या मालिकेतून तब्बल 11 वर्षांनंतर टीव्ही मालिकांकडे तुम्ही वळला आहात. तुम्हाला या मालिकेत काम करावेसे का वाटले? 
- मी 2008 मध्ये मालिकेत काम केले होते, पण अशी महत्त्वाची भूमिका मी मालिकेत 11 वर्षांनीच करतेय. या मालिकेची कथा आणि भूमिकेने मला आकर्षित केले होते. म्हणून खरे तर ही मालिका स्वीकारली. 

मालिकेतील तुमची भूमिका नेमकी आहे तरी कशी? 
- ही भूमिका मी आतापर्यंत केलेल्या भूमिकांपेक्षा खूपच वेगळी आहे. खूप नव्या सेटअपमध्ये मी राजामाताची भूमिका निभावली आहे. त्यांचा हा एक चांगला पैलू आहे, की त्या मॉडर्न असल्या तरी कुटुंबाची मूल्ये आणि पारंपरिक गोष्टी यांना महत्त्व देतात. आपण फक्त जीवनाच्या प्रवाहाबरोबर वाहत जातो. त्यामध्ये आपण एक गोष्ट करत नाही, ती म्हणजे स्वत:लाच आव्हान करणे. आपल्या आजूबाजूचे वातावरण बदलणे. मी सध्या फक्त तेच करते आहे. मी जास्त विचार करत नाहीय. काही ठरविण्यात किंवा योजना आखण्यात वेळ घालवत नाहीय. फक्त प्रवाहाबरोबर वाहत चालले आहे. 

सध्या मालिका आणि वेबसीरिजमध्ये काम करताय, पण इतकी वर्षं होता कुठे? 
- मालिका करणे माझ्यासारखीला शक्‍य नाही. मुळात ज्या गोष्टींवर माझा विश्‍वास नाही, त्या गोष्टी करायला आवडत नाही. ज्या दुनियेशी माझा काही संबंध नाही, त्याविषयी मी काहीही बोलत नाही. ज्या भूमिकेला म्हणावी तशी खोली नाही, ती भूमिका मला स्वीकारायला आवडत नाही. त्यामुळेच मी टीव्हीपासून दूर राहिले आणि जेव्हा या मालिकेविषयी मला विचारण्यात आले, तेव्हा मला ही मालिका आणि भूमिका भावली म्हणून परतण्याचा निर्णय घेतला. 

भारतीय टेलिव्हिजनवरील मालिकांचे विषय, दर्जा यांमध्ये काही बदल झालेत असे तुम्हाला वाटते का? 
- हो, असे मला वाटते. सध्या बदल करण्याचा प्रयत्न नक्कीच होतोय. नवीन विषय हाताळले जात आहेत ही चांगलीच गोष्ट आहे. मी असे म्हणेन, की ही वेळ चांगली आहे, पण आपल्याला यापेक्षा जास्त प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपल्याला जोखीम उचलावी लागेल आणि काही तरी वेगळा विचार करायला हवा. प्रेक्षकांना काय आवडते हे लक्षात घेऊन काम केले की ते अधिक या मालिकांकडे वळतील. मला असे वाटते, की टीआरपीच्या खेळामुळे टीव्ही मालिकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. चित्रपट खूप पुढे गेले आहेत, पण टीव्ही मालिका मात्र अजूनही त्याच पठडीत अडकल्या आहेत. विविध विषय जरी हाताळले जात असले, तरी ते दिसून येत नाहीत, पण आपला विकास नक्कीच झाला आहे. 

कीथ आणि संजिदा शेख यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता? 
- एकदम मस्त. त्यांच्याबरोबर काम करायला खूप मजा येतेय. आम्ही एकमेकांबरोबर आता चांगले मिसळलो आहोत आणि एकमेकांबरोबर खूप मजाही करतो. हा खूप मोठा सुखद अनुभव आहे. 
 

Web Title: soni Razdan interview