'गाडीत हनुमान चालीसा वाचत होतो आणि..', सोनू निगमनं सांगितला पाकिस्तानातील हैराण करणारा किस्सा Sonu Nigam | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sonu Nigam

Sonu Nigam: 'गाडीत हनुमान चालीसा वाचत होतो आणि..', सोनू निगमनं सांगितला पाकिस्तानातील हैराण करणारा किस्सा

Sonu Nigam: सोनू निगमची हनुमानावर नितांत श्रद्धा आहे. तो कोणतंही महत्त्वाचं काम तडीस नेण्याआधी हनुमान चालीसा वाचतो. एका मुलाखतीत सोनू निगमला विचारलं होतं की, 'हनुमान चालीसा वाचायचे काय फायदे आहेत?'.

यावर सोनू निगमनं उत्तर दिलं होतं की, ''हनुमान चालीसामध्ये एक शक्ती सामावलेली आहे. मी याविषयी एक गोष्ट आजपर्यंत कोणाला सांगितलेली नाही. ही गोष्ट आहे १० एप्रिल २००४ दरम्यानची''.

''आम्ही पाकिस्तानमध्ये होतो. तिथे कॉन्सर्ट होता. मी नेहमी शोज आधी हनुमान चालीसा वाचून जायचो. जियो टीव्हीनं तो कॉन्सर्ट आयोजित केला होता. त्यांच्या बसमध्ये मी प्रवास करत होतो. सगळ्या लोकांचे त्या गाडीवर लक्ष होते. कारण त्यांना मला पहायचं होतं''.

सोनू निगमनं आपल्या आवाजात हनुमान चालीसा वाचली आहे. त्यानं एकदा सांगितलं होतं की त्यानं आपल्या आईमुळे दर मंगळवारी मंदीरात देवाच्या दर्शनासाठी जायला सुरुवात केली होती. सोनू निगम आपल्या शोज आधी नेहमी हनुमान चालीसा वाचतो कारण यात खूप शक्ती दडली आहे असं तो मानतो.

त्यानं एका मुलाखती दरम्यान हनुमान चालीसाचे फायदे सांगितले होते इतकेच नाही तर सोबत एक हैराण करणारा किस्साही उदाहरण देत सांगितला होता.

ही घटना तेव्हाची आहे जेव्हा पाकिस्तानमध्ये तो एक शो करायला गेला होता आणि बॉम्ब ब्लास्टमध्ये मरता मरता वाचला होता. आपला स्वतःचा आणि कुटुंबाचा जीव वाचवण्याचं क्रेडिट तो हनुमान चालीसाला देतो.

सोनू निगम म्हणालेला की,'' शो जिथे होता तिथे आम्ही जवळपास पोहचलो होतो. आणि अचानक आवाज आला. सगळीकडे हाहाकार माजला. आमच्या जवळ उभ्या असलेल्या गाडीचा चुरा झाला होता. बोललं जातं की तिथे एक माणूस उभा होता त्यांचं डोकं धडापासून वेगळं होत दुसरीकडे पडलं होतं''.

''बॉम्बब्लास्ट करण्यात आलाय हे एव्हाना आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं होतं. त्यावेळी माझं सगळं कुटुंब त्या बॉम्बस्फोटातून वाचलं होतं. मला तेव्हा सांगितलं की तेव्हा आमची बसही उडवली जाणार होती पण त्यावेळी रिमोटचं बटण दाबलं गेलं नाही. तेव्हा मला मात्र जे कळायचं ते कळालं. कारण गाडीत बसून माझं हनुमान चालीसा वाचणं चालू होतं''.

सोनू निगमनं याआधी एका मुलाखतीत सांगितलं होतं की त्याची आई लहानपणापासून त्याला हनुमान चालीसा वाच म्हणून मागं लागायची..आईमुळेच आपण दर मंगळवारी मंदिरात जाऊ लागलो आणि हनुमान चालीसा वाचू लागलो असंही तो म्हणाला होता.

हनुमान चालीसाला सोनू निगमनं आपला आवाज दिला आहे. तो म्हणाला की,'' ज्यावेळी मी हनुमान चालीसा गात होतो तेव्हा मला माझी आई जवळ असल्याचा भास होत होता. हनुमान चालीसाला माझा आवाज देत मी एकप्रकारे माझ्या आईला श्रद्धांजली वाहिली आहे''.