चित्रडोसा : रजनीकांत यांच्या सुपर रहस्याचा शोध… 

अप्पा बळवंत, मुंबै
Friday, 24 January 2020

अर्थात साऊथच्या चित्रसंस्कृतीचे झेपेल तितके रसग्रहण

चित्रडोसा 

आपुल्या चित्रपटसृष्टीत हंड्रेड क्रोर क्लब नामक एक गोष्ट बहुचर्चित आहे. 
हे आम्ही हिंदी चित्रपटसृष्टीबद्दल बोलत आहोत हं. आपुल्या महन्मंगल मराठी फिल्लम इंडस्ट्रीबाबत नव्हे. त्यांच्याबाबत कोणी असे काही बोलत आहे असे साधे गॉसिप जरी कुणी पसरविले ना, तरी अनेक मराठी प्रोड्युसरांस फेफरे येईल. तेव्हा ही वार्ता केवळ बॉलिवूडाबाबतची आहे हे समजून जावे. तेथे सतत बातम्या येतात, की अमुक खानाचा चित्रपट हंड्रेड क्रोर क्लबी दाखल झाला नि तमुक कुमाराने शंभर कोटीचा बिज्नेस केला. काही मध्यमवर्गीय लोकांस त्याचे फारच बॉ कौतुककवळे.

चित्रडोसा : 'दी थलपती!'

Image result for rajinikanth

आम्हांस मात्र त्याचे काही म्हणता काही वाटत नाही. पूर्वी असे काही कोटीबिटीतले आकडे वाचले की आम्हांसही जरा बिचकायला व्हायचेच. वीस हजाराच्या वेतनचिठ्ठीवर ज्यांचे निम्मे स्थावर-जंगम आयुष्य सरलेले असते, अशा आमुच्यासारख्या पोटार्थी पत्रकारू-नारूंना ही एकावरची साताठ पूज्ये जड जाणारच. पण काही वर्षांपूर्वी विनोद राय नामक एक आकडेशास्त्री क्याग नामक संस्थेचे प्रमुख होते पाहा. त्यांनी एके सुसमयी एक असा काही आकडा प्रसृत केला, की ज्यावर नेमकी किती शून्ये आहेत हे आजही आम्हांस सांगता येणार नाही. माध्यमांचेही डोळे विस्फारले होते, कित्येक उपसंपादक तर तेव्हा हवालदिल झाले होते, की बॉ पेपराच्या आठ कॉलमात हा आकडा कसा काय बसवायचा? आणि आमुचे रायबाबू मोशाय सांगत होते, की तेवढ्या एका वर किती तरी शून्य रकमेचा घोटाळा झाला आहे आपुल्या देशी. ते सारे याचि डोळां पाहिले आणि तुम्हांस सांगतो आकड्यांबाबतचे अवघे भय शून्य शून्य झाले. वाटले, लाखो कोटीचे आकडे काय हवेतून तर येतात! 
त्यामुळेच बॉलिवूडातील हंड्रेड क्रोर क्लब वगैरे बाता आम्हांस तरी अर्थशून्य वाटतात. आणि तसेही बघा, येथील खान आणि कुमार आणि मंडळींस ज्या शंभर कोटींच्या कमाईने जन्नत नसीब झाल्यासारखे वाटते, तेवढी कमाई आमुचे परमप्रिय महानायक श्री श्री रजनीकांत तर चित्रपट रिलिज होण्याआधीच करून जातात. हाय काय अन् नाय काय! 

Image result for rajinikanth

त्यांच्या परवाच्याच दरबारचे उदाहरण घ्या. हा चित्रपट चित्रपटगृहांत अवतरला तेव्हा त्याच्यासमोर किती तगडे प्रतिस्पर्धी होते! आमचे महाराष्ट्राचे जावयबापू रा. रा. महेशबाबू यांचा सरिलेरू निक्केव्वरू होता. रा. रा. अल्लू अर्जुन यांचा अला वैंकुटपुरमल्लू होता. महाराष्ट्राचे आणखी एक जावयबापू रा. रा. अजय देवगण यांचा तान्हाजी होता. झालेच तर जेएनयूची मौनराणी सुश्री दीपिका पाडुकोण यांचा छपाक होता. पण छाप सोडली ती रजनीकांत यांच्या दरबारनेच. दहा दिवसांत दोनशे क्रोर. आहात कुठे?

आता रजनीबाबूंचे हे का वय आहे महेशबाबू आणि अल्लू अर्जुनाशी पंगा घेण्याचे? या वयात माणसे कशी छान निवृत्त होतात वा स्वेच्छानिवृत्ती घेतात. नातवंडांकडून स्मार्ट फोनची फंक्शने शिकून घेऊन सकाळी पाच वाजल्यापासून गुड मॉर्निंगादी संदेशांची चित्रे फॉरवर्डून अवघ्या ग्रुपजनांस वात आणतात. परंतु आमुचे रजनीबाबू. ते अजूनही हिरोच. तेही ढिशुम् ढिशुम् वगैरे करणारे. 

चित्रडोसा : साऊथचे चित्रपट - एक पाहणे…

आता तसे पाहिल्यास या चित्रपटसृष्टीत अनेकांस नाही येत आपुल्या वयाचा अंदाज. प्रखर प्रकाशझोतात कुणासही अंधारल्यासारखेच होते म्हणा. त्यामुळे होते काय, की आपले अंकलस्वरूप संपून आपला कधीच ग्रॅम्पा झाला आहे हे त्यांना कळतच नाही. ते आपले विग लावून कोंबडे उडवत बसतात. आपुल्या मायमराठी फिल्लम इंडस्ट्रीत तर ही साथ अंमळ ज्यादाच. (तिथं म्हंजी कसं आस्तं ना भौ, की ज्या वयात मान्सानं कन्यादान करायचं आस्तं, त्या वयात आपलं ते हिरो कालिजच्या दारात बोटावर वही फिरवावी तसा कलिजा फिरवित हिरविनीच्या मागती गूळ काढीत हिंडताना दिसतं. बरं दिस्तं का ते? महागुरू सिंड्रोमच म्हणायचा तो. असो.) पण रजनीबाबूंच्या बाबतीत वयाचा प्रश्नच येत नाही. 

Image result for rajinikanth

आम्हांस तर असा दाट संशय आहे, की या शिवाजीराव गायकवाडांच्या चेन्नैतील घराच्या भिंतीसाठी आमुचे जयराज साळगावकर वेगळेच कालनिर्णय काढत असावेत. आपुली हजार वर्षे झाली म्हणजे ब्रह्मदेवाच्या क्यालेंडराचे एक पान उलटते म्हणतात. रजनीबाबूंस काळाचा तोच न्याय लागू होत असावा. त्याशिवाय का या वयातही हे सद्गृहस्थ हिरो बनतात आणि लोक ते आनंदाने चालवून घेतात? 

खरेच असे का होत असावे? हुबेहूब आरर्केंच्या कॉमन मॅनप्रमाणे डोक्यावर टक्कल आणि कानावर भुरभुरणारे केस, पिकलेली दाढी, चेह-यावर वांगाचे डाग अशा एरवीच्या अवतारात वावरणारे रजनीबाबू अजूनही सुपरस्टार कसे काय असू शकतात बॉ? हे काय बरे केमिकल असावे? 

गेल्या पंधरा दिवसांपासून याच एका प्रश्नाच्या उत्तरात आम्ही आहोत. त्याकरीता आम्ही आमुचे लहान व मोठे असे दोन्ही मेंदू एवढे शिणवले आहेत, की तेवढ्यात, अच्छे दिन आले म्हणतात ते कुठे आहेत? किंवा राहुल गांधीजी परदेशात जातात ते नेमके कुठे व कशाला? किंवा माजी मामुं देवेंद्रजी फडणवीसजी हे चायनीज मोबाईलच्या साऊंडसारखे का बरे भासतात? किंवा झालेच तर अजितदादाजी पवार हे पक्षनिष्ठेबाबत बोलतात तेव्हा तमाम राष्ट्रवादी जन्तेस आपण सभा पाहतो की चला हवा येऊ द्याचा एपिसोड असे का बरे वाटते? अशा अनेक गहनगूढ यक्षप्रश्नांचे जबाब आम्हांस मिळाले असते. पण रजनीकांत यांच्या सुपरसुपरस्टारपणाचे रहस्य काही अजूनही नेमके चिमटीत येत नाही. 

Image result for rajinikanth

असे तर नसेल, की आमुचे देशीपटांत अतिमानव नाहीत. एक होऊन गेला. त्याचे नाव शक्तीमान. परंतु सुपरमॅन, बॅटमॅन प्रभृतींच्या समोर आपला तो शक्तीमान म्हणजे अगदीच गावठी गंगाधर. आणखी एक क्रिश होऊन गेला. पण त्यात जान नव्हती. तो अगदीच हृतिक रोशन होता.  

या अतिमानवांत ती मौज नव्हती. आणि त्यामुळेच तर आपण सर्वांनी मिळून रजनीकांत महोदयांच्या लेखी अतिमानव तर कल्पिला नसेल ना? अन्यथा, त्यांनी जमिनीवर पाय आदळताच धरणीकंप होणे, धुळीचे वादळ उठणे हे आपण कसे सहन केले असते? अन्यथा, पानटपरीवरचा प्लास्टिकचा लायटर हे सिगारेट शिलगावण्याचे उत्तम साधन म्हणून जगप्रसिद्ध असताना, हवेत सिगारेट भिरकावून पिस्तुलाच्या गोळीने ती तंतोतंत शिलगावणे हे लई भारीपणाचे असते, असे आपण कसे मानून घेतले असते? पण केवळ अतिमानवी वा अर्ध-अतिमानवी असण्यातच रजनीकांत यांचे सुपरसुपरस्टारपद सामावलेले आहे? पण मग त्यांच्या चित्रपटांतील राजकारणाचे काय? 
पाहायला हवे. 

balwantappa@gmail.com


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Special Article on Rajinikant smile in Chitradosa column