Street Dancer 3D Review: डान्सची कमाल पण, अभिनयामध्ये खाल्ला मार !

Street Dancer 3D movie review
Street Dancer 3D movie review

मुंबई : "एबीसीडी' आणि "एबीसीडी 2' या दोन्ही चित्रपटांना चांगले यश मिळाले. त्यामुळे त्याचाच पुढील भाग "स्ट्रीट डान्सर 3 डी' हा चित्रपट. खरं तर दोन्ही भागांना यश मिळाल्यामुळे तिसऱ्या भागात काय असणार याची उत्सुकता साहजिकच होती; परंतु जेवढी उत्सुकता ताणली गेली होती तेवढी अपेक्षा हा चित्रपट पूर्ण करीत नाही. चित्रपटाची कथा क्‍लायमॅक्‍स धक्का देणारा असला आणि काही तरी सांगणारा असला तरी फारशी उत्सुकता राहात नाही. नृत्याचे वेगवेगळे आविष्कार, सोबतीला लंडनमधील काही नयनरम्य लोकेशन्स तसेच संगीत याच बाजू या चित्रपटाच्या जमेच्या आहेत. सहेज (वरुण धवन) हा आपल्या कुटुंबीयांबरोबर लंडन येथे राहात असतो. पण तो मूळचा भारतीय असतो. त्याचा मोठा भाऊ इंदर (पुनीत) हा नृत्यामध्ये चांगलाच निपुण असतो. एका स्पर्धेमध्ये नृत्य करीत असताना त्याला दुखापत होते आणि तो पुन्हा कधीच नृत्य करू शकत नाही. साहजिकच आपल्या भावाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सहेज पुढे सरसावतो. तो भारतात येऊन पैसे गोळा करतो आणि स्वतःचा मोठा स्टुडिओ उभारतो. इंदरची संपूर्ण स्ट्रीट डान्सर टीम पुन्हा एकत्र येते.

याच लंडन शहरात पाकिस्तानी डान्सर्सची एक टीम असते. रूल ब्रेकर असे तिचे नाव. त्यामध्ये इनायत (श्रद्धा कपूर) ही मुख्य असते. दोन्ही डान्सर्सची टीम जेव्हा जेव्हा एकत्र भेटतात तेव्हा तेव्हा एकमेकांशी भिडतात. मात्र चित्रपटातील अण्णाची (प्रभु देवा) एन्ट्री संपूर्ण कथानकाला कलाटणी देणारी ठरते. तो दोन्ही टीमना एकत्र येण्याचा आणि डान्सची मोठी स्पर्धा जिंकण्याचा सल्ला देतो. मग पुढे काय होते...अण्णाचे नेमके ध्येय काय असते...सहेज आपल्या भावाचे स्वप्न पूर्ण करतो का..इनायतची त्याला साथ लाभते का...वगैरे प्रश्‍नांसाठी हा चित्रपट पाहावा लागले. दिग्दर्शक रेमो डिसूझाने या चित्रपटाद्वारे नृत्याला वेगळा आयाम दिला आहे. एका वेगळ्या स्टेजवर त्याने हा चित्रपट नृत्याद्वारे नेऊन ठेवला आहे. कारण यातील डान्सच्या स्टेप्स डोळ्यांची पारणे फेडणाऱ्या आहेत. वरुन धवन आणि श्रद्धा कपूरने केलेला डान्स पाहता क्‍या बात है असेच म्हणावे लागेल.

प्रभु देवाबद्दल काय सांगावे. त्यांची तर यामध्ये पीएचडी आहे. सगळ्याच कलाकारांनी छान कामे केली आहेत. कोरिओग्राफी उत्तम आहे. विजय कुमार अरोरा यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे. नृत्याच्या विविध स्टेप्स त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात छान टिपल्या आहेत. चित्रपटात देशभक्ती, समाजसेवा असे सगळेच मुद्दे घेण्यात आले आहेत. चित्रपटातील संगीत ही जमेची बाजू आहे. "मुकाबला... ' हे गाणे पैसा वसूल. मात्र चित्रपटाची लांबी खूप आहे. त्यामुळे बोअर व्हायला होते. चित्रपटाचा पूर्वार्ध काहीसा धीमा झाला आहे. हा चित्रपट नृत्यप्रधान आहे आणि नृत्यातून कथा सांगताना कथेचा पोत कुठे तरी हरवला असल्यासारखे वाटते. एकूणच सांगायचे तर नृत्याची आवड असलेल्यांना हा चित्रपट नक्कीच आवडेल.

- अडीच स्टार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com