
Subhedar: दिवस ठरला! वैऱ्याच्या रक्तानं गड भिजवायला.. या दिवशी येतायत स्वराज्याचे 'सुभेदार'..
Subhedar Marathi Movie News: अभिनेते - लेखक - दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरने (Digpal Lanjekar) शिवराज अष्टकच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांना एक सिनेमॅटिक आदरांजली दिली आहे.
'शेर शिवराज' नंतर दिग्पालचा शिवराज अष्टक मधील पाचवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा म्हणजे सुभेदार. शिवरायांचे शूरवीर मावळे तान्हाजी मालुसरेच्या पराक्रमावर आधारित हा सिनेमा असणार आहे.
(subhedar marathi movie motion poster release)
नुकतंच या सिनेमाचं मोशन पोस्टर रिलीज झालंय. रक्तामंदी उसळं तापता लाव्हा, शिवराय शब्दाची आन आम्हाला, वैऱ्याच्या रक्तानं गड भिजवू, जिंकून नाचवू ध्वज भगवा, आले मराठे आले मराठे, आदी न अंत अश्या शिवाचे (महादेवाचे), मोडीतो वैऱ्याची मुंडकी मोजून, पाच्छाई झोडती असे मराठे, सुभेदार, गड आला पण .... अशा सळसळत्या शब्दांनी अंगावर रोमांच उभे करणारे सुभेदार सिनेमाचं मोशन पोस्टर रिलिज झालंय.
दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त', 'पावनखिंड' आणि 'शेर शिवराज' या शिवराज अष्टकातील चार यशस्वी चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत राष्ट्रीय पातळीवरील रसिकांचेही लक्ष वेधून घेतलं आहे.
'शेर शिवराज' नंतर दिग्पाल लांजेकर शिवकालीन इतिहासाच्या सुवर्णपानांमध्ये दडलेला कोणता अध्याय घेऊन येणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती.
दिग्पालने शिवराज अष्टकातील पाचव्या सिनेमाची घोषणा केल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. आता सुभेदार सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे.
सुभेदार या चित्रपटात तान्हाजी मालुसरे आणि त्यांनी राखलेल्या सिंहगडाची थरारक कथा पहायला मिळणार आहे.
पोटच्या मुलाचं लग्न बाजूला सारून किल्ले कोंढाण्याच्या शिखरावर स्वराज्याचं विजयी तोरण बांधण्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या एका बलाढ्य योद्ध्याचा रोमहर्षक पराक्रम 'सुभेदार'मध्ये अनुभवायला मिळेल.
अभिनेते अजय पुरकर तान्हाजी मालुसरे यांची भूमिका साकारणार आहेत.
जून २०२३ ला सुभेदार सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज आहे. सिनेमाची निश्चित तारीख अजून समोर आली नाही.
या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेता चिन्मय मांडलेकर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणार आहे. तर मृणाल कुलकर्णी जिजाऊ साहेबांची भूमिका साकारणार आहे. दिग्पाल लांजेकरांच्या सुभेदार सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे.