
Subodh Bhave: कोण आहे सुबोध भावेच्या आयुष्यातील 'फुलराणी'?..'त्या' अभिनेत्रीचं नाव घेत सुबोध झाला भावूक
Subodh Bhave: सुबोध भावे, प्रियदर्शनी इंदलकर यांच्या 'फुलराणी' सिनेमाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. फुलराणी लवकरच महाराष्ट्रात रिलीज होणार आहे. पण रिलीजआधीच फुलराणीची हवा सगळीकडे झालीय.
ती फुलराणी नाटकावर आधारीत हा सिनेमा आहे. या सिनेमाची सगळे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. भक्ती बर्वे यांनी नाटकात प्रमुख भूमिका साकारली होती. फुलराणी सिनेमानं रिलीज आधीच परदेशातही आपला डंका वाजवला. सॅन फ्रान्सिस्कोच्या बे एरियातील 'फुलराणी' चा पहिलाच शो हाऊसफुल झाला.(Subodh Bhave Phulrani Marathi Movie )

परदेशात फुलराणी फुलली आता महाराष्ट्रात फुलराणीला कसा प्रतिसाद मिळणार याची सर्वांना उत्सुकता आहे. 'ती फुलराणी' हे मूळ नाटक पु.ल.देशपांडे यांनी जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या पिग्मॅलियन या नाटकाचे केलेले मराठी रूपांतरण आहे.
या नाटकात भक्ती बर्वे यांनी मंजुळाची भूमिका साकारली. भक्ती बर्वेनंतर प्रिया तेंडुलकर, सुकन्या कुलकर्णी, अमृता सुभाष, हेमांगी कवी यांनी मंजुळाची भूमिका साकारली. आता सिनेमाच्या माध्यमातून प्रियदर्शनी इंदलकर मंजुळाची भूमिका साकारणार आहे.
सिनेमाच्या प्रमोशन निमित्तानं सुबोध भावेनं दिलेल्या मुलाखतीत आपल्या आयुष्यातील फुलराणीचं नाव घेत त्यामागचं भावूक कारण देखील शेअर केलं आहे, सुबोधला एका मुलाखतीत प्रश्न विचारला गेला की,'तुझ्या आयुष्यात अनेक फुलराण्या आल्या असतील त्यांच्याविषयी काय सांगशील?'
तेव्हा सुबोध उत्तराला सुरुवात करतान काहीसा भावूक झालेला दिसला आणि म्हणाला, ''माझ्या आयुष्यातील फुलराणी स्मिता तळवलकर आहे. तिनं माझ्या पडत्या काळात मला सावरलं. माझ्याकडे काम नव्हतं. काही प्रोजेक्ट्समधून मला काढलं होतं. तेव्हा मी तिच्याकडे गेलो. आणि तिच्या कुशीत अक्षरशः रडून मन मोकळं केलं. तिनं मला म्हटलं,सुबोध जोपर्यंत ही स्मिता तळवलकर जिवंत आहे तोपर्यंत तू घाबरायचं नाहीस''.
सुंबोध पुढे म्हणाला,''त्यानंतर तिनं मला २४ तास ,१२ महिने काम दिलं असं नाही. पण माझ्या प्रत्येक कठीण प्रसंगात तिनं दिलेली साथ,धीर माझ्यासाठी मोठा आधार ठरला. आणि आज मी इथे आहे''.
आज स्मिता तळवलकर हयात नसल्या तरी त्यांच्या नाटक,मालिका,सिनेमांच्या आठवणीच्या रुपानं आपल्यासोबत आहेत.
तर सुबोध भावेचा 'फुलराणी' देखील आता प्रदर्शित होतोय,तेव्हा लवकरच कळेल 'फुलराणी' सारख्या दिग्ग्ज कलाकृतीला टीमनं आपल्या नव्या प्रयोगातून किती न्याय दिला आहे.