होरपळ...

tabbu
tabbu

चौकटीतली ‘ती’ - सुनील देशपांडे, सिने अभ्यासक
‌उत्तर प्रदेशमधील जातीय दंग्याच्या भडक्यात घरादारासह स्वतःच्या आई-वडिलांना जिवंत जळताना पाहावं लागलेली कोवळ्या वयाची मुमताज... त्या अघटितानं सुन्न झालेली. त्यापुढचं तिचं आयुष्य जणू या वणव्याचीच तिला पदोपदी आठवण करून देणार असतं... दहशतीच्या सावटाखाली सारी वस्ती घर सोडून मुंबईला निघून जाते, त्यात मुमताजही असते. खरं तर शहर सोडायची तिची इच्छा नसते; पण एकुलता एक आधार असलेला तिचा इरफान मामू बळजबरीनं तिला रेल्वेमध्ये चढवतो अन् तिच्या जगण्याची दिशाच बदलून जाते. मामूसोबत ती मुंबईला पोचते. ओळखीच्या माणसामार्फत झोपडपट्टीत राहण्यापुरती जागा मिळते. त्याच ओळखीतून मामू तिला एका डान्स बारमध्ये नोकरीसाठी घेऊन जातो. तो असतो ‘चांदनी बार’. स्त्री देहाच्या खुलेआम प्रदर्शनाचा; खरं तर देहव्यापाराचा मुक्त परवाना असलेला बिअर बार!

या डान्स बारमध्ये मुमताजला कामाला लावण्याचा मामूचा उद्देश असतो. मुमताज याला तयार नसते, पण मामू गोड बोलून तिला राजी करतो. कल्पनाही केली नसेल अशा एका वेगळ्या जगात तिचा प्रवेश होतो. सुरुवातीला बारमध्ये थिल्लर फिल्मी गाण्यांवर नाच करणं मुमताजला कठीण जातं. मुळात तो ‘नाच’ नसतोच. हिंदी सिनेमातल्या एखाद्या मादक गाण्यावर शरीराच्या अश्लील हालचाली केल्या की झाला बारमधला नाच! पण मुमताजला तेही शिकावं लागतं. संध्याकाळ झाली की चेहऱ्याला रंग फासून, भडक कपडे घालून बारमध्ये नाचायला जायचं, रात्री उशिरापर्यंत काम करून घरी परतायचं, हा दिनक्रम हळूहळू तिच्या अंगवळणी पडतो. आयतं खायची सोय झाल्यानं मामू कामचुकार बनतो. तेही चाललं असतं, पण - हाच मामू एकदा तिच्या असहायतेचा फायदा घेऊन तिच्यावर बलात्कार करतो आणि ती उद्ध्वस्त होते.

ज्याच्यावर विश्‍वास टाकला त्या मामूकडूनच हे पाशवी कृत्य घडल्यानं मुमताजचा चांगुलपणावरचा विश्‍वासच उडतो. बारमधल्या इतर मुलींची कथाही तिच्यापेक्षा वेगळी नसते. प्रत्येक मुलगी नात्यातल्याच कुणा ना कुणाकडून फसवली गेल्याचं त्यांच्या बोलण्यातून तिला कळतं. मामूचा चेहरा बघण्यापेक्षा बारमध्ये नाचलेलं बरं, हा विचार करून ती या व्यवसायात रुळते. चांगलं रंगरूप असलेली मुमताज ‘चांदनी बार’चं आकर्षण ठरते. या बारला नियमितपणे भेटी देणारा पोत्या सावंत हा कुख्यात गुंड मुमताजवर भाळतो. ती त्याला प्रतिसाद देत नाही, पण तिच्यावर फिदा झालेला पोत्या तिच्या प्राप्तीसाठी कोणत्याही थराला जायला तयार असतो. मुमताजवर खुद्द तिच्या मामानं अत्याचार केल्याचं पोत्याला कळतं, तेव्हा तिरीमिरीत तो मामूचा कोथळाच बाहेर काढतो. तिच्याशी लग्न करून तिला तो कायमची घरी घेऊन जातो. डान्स बारमधून सुटका झाल्यानं चांदनी सुखावते. पोत्याच्या संसारात ती रममाण होते. दोन मुलांची आई बनते.

मोठा अभय आणि धाकटी पायल. मुलांवर गुन्हेगारी जगाची सावली पडू न देता त्यांना शिक्षण देऊन मोठं बनवायचं तिचं स्वप्न असतं. पुन्हा दुर्दैव आड येतं. पोत्याचा उपद्रव वाढू लागल्यानं पोलिस त्याला निरनिराळ्या गुन्ह्यांत अडकवतात आणि एका ‘एन्काउंटर’मध्ये त्याचा ‘गेम’ करतात. मुमताज आणि तिची मुलं उघड्यावर येतात. घर चालवण्यासाठी ती पुन्हा एकदा ‘चांदनी बार’चा रस्ता धरते. वय वाढल्यामुळं तिला ‘बार गर्ल’ऐवजी वेट्रेस म्हणून काम मिळतं. याही धावपळीत ती मुलांकडं कटाक्षानं लक्ष ठेवत असते. तरीदेखील तिचा मुलगा अभय अजाणतेपणी गुन्हेगारीच्या चक्रात अडकून पोलिसांच्या तावडीत सापडतो. त्याला सोडविण्याकरिता लागणारी रक्कम उभी करण्यासाठी मुमताजला पुन्हा देहविक्रीचा आसरा घ्यावा लागतो. मुलगी पायलसुद्धा आईच्या नकळत ‘चांदनी बार’मध्ये नाचते आणि मिळालेले पैसे आईच्या हातात देते. अभय सुटून येतो खरा; पण काहीही अपराध नसताना गुन्ह्यात अडकवल्यानं तो मनानं उद्ध्वस्त होतो. कोठडीतल्या वास्तव्यात त्याच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोन मुलांना तो बाहेर आल्यानंतर पिस्तुलानं गोळ्या झाडून संपवतो. मुमताजच्या स्वप्नांची राखरांगोळी होते. अभय गुन्हेगारीच्या वाटेनं निघून जातो.

पायल ‘चांदनी बार’मध्येच डान्सर होते आणि मुमताज? ज्यांना कसलंही अस्तित्व नाही अशा शेकडो स्त्रियांच्या कळपात तीही सामील होते. आपल्या मुलांमध्ये तिनं उज्ज्वल भवितव्याची किरणं पाहिलेली असतात. प्रत्यक्षात त्यांच्यामध्ये स्वत:चाच भूतकाळ बघणं तिच्या नशिबी येतं...

डान्स बारबरोबरच मुंबईतलं गुन्हेगारी विश्‍व, वेश्या व्यवसाय या मुद्द्यांवर जळजळीत भाष्य करणाऱ्या मधुर भांडारकर दिग्दर्शित ‘चांदनी बार’ (२००१) या चित्रपटातली ही दुर्दैवी मुमताज साकारली होती अभिनेत्री तबू हिनं. या भूमिकेसाठी तिला अभिनयासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, यातच सारं आलं. निरागस, निष्पाप मुमताजचा दुर्दैवाकडून अधिक दुर्दैवाकडे होणारा प्रवास तबूनं ज्या संयतपणे पडद्यावर साकारला त्याला तोड नाही. बार गर्ल म्हणून काम करताना मुमताजचं सुरुवातीचं नवखंपण आणि नंतर आलेलं सराईतपण, मुलाला सोडविण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तिची अगतिकता, या व अशा अनेक छटा प्रत्ययकारीपणे दाखवत तबूनं या भूमिकेवर स्वतःचं नाव कोरलं...

जाता जाता... गेल्या वर्षभर ‘मैत्रीण’ या पानावर प्रसिद्ध होत आलेल्या ‘चौकटीतली ती’ या सदराची या लेखाबरोबरच सांगता होत आहे. पडद्यावरच्या ‘चौकटी’त वावरतानाच ‘चौकटीबाहेर’ जाऊन भूमिकेवर ठसा उमटवणाऱ्या नायिकांचा वेध घेणं हा या सदरामागचा उद्देश होता. त्या दृष्टीनं निवडक नायिकांवर लिहिता आलं. त्या निमित्तानं या चित्रपटांच्या पुन्हा: प्रत्ययाचा आनंद घेता आला, याबद्दल ‘सकाळ’ परिवाराचे मनापासून आभार. सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com