निरागस सनी 

sunny pawar
sunny pawar

"लायन' या ऑस्ट्रेलियन दिग्दर्शकाच्या पहिल्याच चित्रपटाला ऑस्करमध्ये नामांकन मिळालं. या चित्रपटाला पुरस्कार जरी मिळाला नसला, तरी या चित्रपटात काम केलेल्या मुंबईतील कालिना परिसरात राहणाऱ्या आठ वर्षांच्या सनी पवारचं जगभर कौतुक झालं. सनी पवार नुकताच ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात आपली छाप पाडून भारतात परतला आहे. त्याबद्दल त्याच्या मुंबईतील घरी रंगलेल्या या खास गप्पा- 

तू नुकताच अमेरिकेहून आला आहेस, तिथे तू कोणाकोणाला भेटलास? 
- मी तिथे अनेक जणांना भेटलो. त्यात माझे सहकलाकार देव पटेल, निकोल किडमॅन आणि इतर हॉलीवूड स्टार्सनाही भेटलो. माझ्या आवडत्या डब्लूडब्लूएफ स्टार्सनाही भेटलो. 

अमेरिकेत तू कुठे कुठे फिरलास? 
- लॉंस एन्जेलिस, डिस्नेलॅंड, हॅरीपॉटर लॅंड अशा अनेक ठिकाणी फिरून आलो. हे सगळं मी पहिल्यांदाच बघत होतो. त्यामुळे मला खूपच मजा येत होती. माझे बाबाही माझ्याबरोबर होते. त्यांनाही माझ्यामुळे सगळीकडे फिरायला मिळालं. याचा मला खूपच आनंद झाला. 

तुला ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला जाऊन कसं वाटलं? 
- मला खूपच मजा आली. मला पुरस्कार जरी मिळाला नसला, तरी मला एवढी मोठी संधी मिळाली, त्यामुळे समाधानी आहे. 

देव पटेलबरोबर तुझी खास मैत्री झाली आहे, त्याबद्दल सांग? 
- मला त्यांनी नेहमी सांभाळून घेतलं. त्यांच्याकडून मी अभिनय शिकलो आणि देवदादाला हिंदी येत नाही. मी त्याला हिंदी बोलायला शिकवलं. आता त्याला थोडं थोडं हिंदी बोलायला येतं. 

तुला या चित्रपटात काम करण्याची संधी कशी मिळाली? 
- एअर इंडिया मॉडेल स्कूल या माझ्या शाळेतून आम्हाला अंधेरीला ऑडिशन देण्यासाठी पाठवलं होतं. तिथे माझी ऑडिशन घेतली गेली. अनेक राज्यांतून खरं तर आधीच ऑडिशन झाल्या होत्या. पण दिग्दर्शक गार्थ डेविस यांना त्यांच्या मनाप्रमाणे कोणीही मुलगा मिळाला नव्हता. पण जेव्हा त्यांनी माझी ऑडिशन घेतली तेव्हा त्यांनी लगेचच माझं सिलेक्‍शन केलं. 

ऑडिशन देण्यासाठी गेला होतास तेव्हा तिथं काय घडलं? 
- खरं तर मला मी ऑडिशन देतोय हे माहितीच नव्हतं. खेळीमेळीत सगळं पार पडलं. त्यांनी मला काही छोट्या-छोट्या गोष्टी करायला सांगितल्या होत्या. मला आधीपासूनच नकला करायची आवड आहे. त्यामुळे मी लगेचच त्यांनी सांगितल्याप्रमाणे करून दाखविलं. 

जेव्हा तुला आणि तुझ्या घरी कळलं की तुला एका इंग्रजी चित्रपटात काम करायला मिळणार आहे तेव्हा तुला कसं वाटलं? 
- मला खूपच आनंद झाला होता. माझ्या आईला तर विश्‍वासच बसत नव्हता, की मी एवढी मोठी भरारी घेतली आहे. माझ्या घरच्यांना माझा खूप अभिमान वाटला. 

तू या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी कुठे कुठे फिरलास? अनुभव कसा होता? 
- मी कोलकाता, इंदौर, ऑस्ट्रेलियामध्ये फिरलो. ऑस्ट्रेलिया मध्ये सिडनी, तसंच कांगारू पाहायलाही गेलो होतो. माझे दिग्दर्शक इंग्रजी भाषा बोलायचे. मला तेवढं इंग्रजी येत नसल्याने मी त्यांच्याशी साईन लॅंग्वेजमध्ये बोलायचो. ते मला म्हणायचे की, दु:खी असल्याची भावना मनात आण आणि मनापासून डायलॉग बोल. हे सगळं ते माझ्याशी साईन लॅंग्वेजमध्ये बोलायचे. आणि काही नाहीच समजले तर दुभाषाची मदत घेतली जायची. माझे डायलॉग हे हिंदीमध्येच होते. त्यामुळे मला चित्रपटात काम करताना काहीही अडचण आली नाही. शूटिंग संपेपर्यंत आणि आता ऑस्करला जाताना माझे बाबा सतत माझ्याबरोबरच होते. त्यामुळे मला अजिबात कसली काळजी नव्हती. 

तुझ्या आई-बाबांना काय वाटतंय या क्षणी? 
- माझ्या बाबांना आणि आईला खरंच खूप आनंद झाला आहे. ऑस्करला अमेरिकेत जाऊन माझे बाबा खूप खूश होते. आई माझ्याबरोबर तिकडे येऊ शकली नाही. पण तिने मला नेहमीच सपोर्ट केला आहे. अजूनही माझ्या घरच्या कोणीच हा चित्रपट पाहिलेला नाही. आता सगळे मिळूनच आम्ही हा चित्रपट पाहायला जाणार आहोत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com