Swapnil Joshi: शेवट कधीच सोपा नसतो.. 'तो' सीन आणि स्वप्नील जोशीची भावनिक पोस्ट.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Swapnil Joshi shared an emotional post on last day scene of tu tenva tashi marathi serial on zee marathi

Swapnil Joshi: शेवट कधीच सोपा नसतो.. 'तो' सीन आणि स्वप्नील जोशीची भावनिक पोस्ट..

Swapnil Joshi: मराठीतला सुपरस्टार म्हणून स्वप्निल जोशी सर्वप्रचलित आहे. त्याच्या मालिका असतो किंवा चित्रपट त्यात प्रेम हे असणारच, आणि सुपरहिट होणारच असं एक समीकरणच आहे.

स्वप्निल म्हणजे रोमॅंटिक हिरो..चॉकलेट बॉयच म्हणूया नं त्याला. 'मुंबई पुणे मुंबई', 'दुनियादारी', 'तु ही रे', 'मितवा' असे कित्येक चित्रपट त्याने गाजवले. 'एका लग्नाची गोष्ट' सारखी मालिका अजूनही प्रेक्षक विसरू शकले नाहीत.

अशीच त्याची एक मालिका सध्या झी मराठीवर सुरू आहे. ती म्हणजे 'तु तेव्हा तशी..' या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं. एक आगळी वेगळी प्रेम कथा या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळाली. याच मालिकेतील एक सीन शूट होत असतानाचा व्हिडिओ स्वप्नीलने शेयर केला आहे. सोबतच आपल्या भावनाही त्याने व्यक्त केल्या आहेत. त्याची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

(Swapnil Joshi shared an emotional post on last day scene of tu tenva tashi marathi serial on zee marathi)

लीव्ह इन रिलेशनशिप आणि वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावर मिळालेलं प्रेम असं आशयसूत्र असणाऱ्या 'तु तेव्हा तशी' या मालिकेने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. या मालिकेत स्वप्नील जोशी सौरभ पटवर्धन या भूमिकेत होता. तर शिल्पा तुळसकर अनामिका दीक्षित या भूमिकेत होत्या. दोघांची ही हटके लव्हस्टोरी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली. पण आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

नुकताच मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित झाला. त्याच्याच चित्रीकरणाचा एक व्हिडिओ स्वप्नीलने शेयर केला आहे. या व्हिडिओ मध्ये दिसत आहे की सगळेच कलाकार भावूक झालेले आहेत. तर आता स्वप्नीलने देखील आपल्या भावना पोस्ट शेयर करत व्यक्त केल्या आहेत.

या पोस्टमध्ये स्वप्नीलने लिहिलंय की, 'शेवट कधीच सोपा नसतो! आज रात्री T3 (तु तेव्हा तशी) संपत आहे.  या मालिकेतील शेवटचा शॉट माझ्या कारकिर्दीतील सर्वात कठीण शॉट्सपैकी एक होता. ते तांत्रिकदृष्ट्या कठीण होते म्हणून नाही, तर संपूर्ण युनिट तिथे उभं राहून आम्हाला पाहत होतं. सगळ्यांच्या डोळ्यात त्यावेळी आनंदाश्रू होते.''

''इथे  तयार झालेले बंध आणि हे आनंदाश्रू! आमचे संपूर्ण युनिट आणि आमचं 'झी'चं कुटुंब. यावेळी सर्वांचे डोळे पाणावले होते. आम्ही आमच्या कामाला घरचच कार्य  समजतो! आणि आम्हाला त्याचा अभिमानही वाटतो. कारण आम्ही एकत्र राहतो. आम्ही एकत्र हसतो. आम्ही एकमेकांवर प्रेम करतो. आता मालिका संपणार असल्याने आम्ही रोज भेटणार नसलो तरी आम्ही नेहमीच या कुटुंबाचा एक भाग असू!'' अशा भावना स्वप्नीलने व्यक्त केल्या आहेत.


स्वप्नीलची ही  पोस्ट वाचून चाहते देखील भावुक झालेले पाहायला मिळालं आहे. त्यांनी अशाच कमेंट केल्या आहेत. स्वप्निलच्या या पोस्टवर चाहत्यांनी 'मिस यु पट्या', 'आम्ही या मालिकेला मिस करू' अशा कमेंट केल्या आहेत.


तू तेव्हा तशी या मालिकेत पट्या आणि मिस अनामिकाची अनोखी लव्ह स्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. कॉलेजमध्ये एकमेकांवर प्रेम करणारे अनामिका आणि पट्या अनेक वर्षांनी एकमेकांना भेटतात आणि पुन्हा नव्यानं एकमेकांच्या प्रेमात पडतात अशी त्यांची लव्हस्टोरी पाहायला मिळाली होती. स्वप्निलने सौरभ तर मिस अनामिका ही भूमिका अभिनेत्री शिल्पा तुळसकरने साकारली होती. मालिकेत स्वप्निल जोशी आणि  शिल्पा तुळसकर सोबतच सुहास जोशी, अभिज्ञा भावे, रूमानी खरे, स्वानंद केतकर हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते. आता आजपासून मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.