स्वप्निल राजशेखरचा नवा अवतार

सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

घरातच अभिनयाचं बाळकडू लाभलेल्या अभिनेता स्वप्निल राजशेखर यांनी आजवर विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. यापैकी काही कायम स्मरणात राहणाऱ्या ठरल्या आहेत. नायक, खलनायक तर कधी चरित्र व्यक्तिरेखांमध्ये दिसणारे स्वप्निल राजशेखर ‘माझा एल्गार’ या आगामी मराठी चित्रपटात पुन्हा एका नव्या रूपात दिसणार आहेत. दिग्दर्शक मिलिंद कांबळे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘माझा एल्गार’ची निर्मिती सौरभ आपटे यांनी केली असून, सद्गुरू फिल्म्सच्या बॅनरखाली श्रीकांत आपटे हा चित्रपट प्रस्तुत करीत आहेत. १० नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मुंबई : घरातच अभिनयाचं बाळकडू लाभलेल्या अभिनेता स्वप्निल राजशेखर यांनी आजवर विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. यापैकी काही कायम स्मरणात राहणाऱ्या ठरल्या आहेत. नायक, खलनायक तर कधी चरित्र व्यक्तिरेखांमध्ये दिसणारे स्वप्निल राजशेखर ‘माझा एल्गार’ या आगामी मराठी चित्रपटात पुन्हा एका नव्या रूपात दिसणार आहेत. दिग्दर्शक मिलिंद कांबळे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘माझा एल्गार’ची निर्मिती सौरभ आपटे यांनी केली असून, सद्गुरू फिल्म्सच्या बॅनरखाली श्रीकांत आपटे हा चित्रपट प्रस्तुत करीत आहेत. १० नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटाने स्वप्निलला पुन्हा एकदा त्याच्या अभिनयाचा कस लावणारी भूमिका दिली आहे. स्वप्निलने यात एका महंताची भूमिका साकारली असून, वरवर पाहता जनतेच्या हिताची कामं करणारा हा महंत खरं तर या चित्रपटाचा खलनायक आहे. गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडणं आणि आध्यात्मिकतेच्या नावाखाली बुवाबाजी करणं हा महंत महाराजचा खरा धंदा असतो. या व्यक्तिरेखेला स्वप्निल राजशेखर योग्य न्याय देऊ शकेल असं वाटलं आणि त्यांनी होकार दिल्याने मनाजोगत्या कलाकारासोबत काम करण्याचं समाधान लाभल्याचं दिग्दर्शक मिलिंद कांबळे सांगतात. या भूमिकेसाठी स्वप्निल यांनी वेगळा गेटअप केला आहे. पांढरा पोषाख, कमरेला उपरणं, लांब केस, कपाळावर सूर्यरूपी कुंकू, गळ्यामध्ये रूद्राक्षांच्या माळा, दोन्ही हातांच्या बोटांमध्ये अंगठ्या, हाती जपमाळा अशा अवतारात स्वप्निल या चित्रपटात दिसणार आहे. वाचिक अभिनयासोबतच नेत्रअभिनयाद्वारे स्वप्निलने या व्यक्तिरेखेत गहिरे खलनायकी रंग भरण्याचा प्रयत्न केला आहे.

ऐश्वर्या राजेश, यश कदम, अमोल रेडीज, अर्चना जोशी, ऋचा आपटे, गंधार जोशी, प्रफुल्ल घाग, राजकिरण दळी, गोपाळ जोशी, सचिन सुर्वे, नितीन जाधव, पूजा जोशी, वैदेही पटवर्धन, डॉ भगवान नारकर आदि कलाकारांनी या चित्रपटात विविध भूमिका साकारल्या आहेत.  दिग्दर्शक मिलिंद कांबळे यांनीच ‘माझा एल्गार’ चित्रपटाची कथा लिहीली असून, पटकथा आणि संवाद चेतन किंजळकर यांनी लिहिले आहेत. १० नोव्हेंबरला ‘माझा एल्गार’ प्रदर्शित होणार आहे.

Web Title: swapnil rajshekhar new avatar in marathi movie esakal news